PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 03 JUN 2020 8:15PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 3 जून 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने हे एक दुरदृष्टीचे ऐतिहासिक पाऊल आहे. इतर महत्वपूर्ण निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. यामध्ये खालील निर्णयांचा समावेश आहे :

  • शेतकऱ्यांच्या हिताचे आणि कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे ऐतिहासिक निर्णय
  • कृषी उत्पादनांची आंतर-राज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूक सुरळीत करण्याविषयीच्या अध्यादेशाला मंजुरी
  • प्रक्रिया उद्योग, समन्वयक, घाऊकबाजार, मोठे किरकोळ व्यापारी आणि निर्यातदारांशी थेट व्यवहार करण्याचे अधिकार शेतकऱ्यांना प्रदान

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

गेल्या 24 तासांत, देशभरात कोविड-19 चे 4,776 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत उपचारानंतर देशात कोविडचे 1,00,303 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर आता 48.31% टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सध्या, देशभरात कोविडचे 1,01,497 सक्रीय रुग्ण आहेत आणि या सर्वांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोनाचा मृत्यूदर 2.80 टक्के आहे.

देशात कोविडच्या नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता वाढली असून सध्या 480 सरकारी आणि 208 खाजगी प्रयोगशाळांमध्ये (एकूण 688 प्रयोगशाळा) चाचण्या सुरु आहेत. आतापर्यंत एकूण, 41,03,233 चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल 1,37,158 चाचण्या करण्यात आल्या.

कोविडच्या व्यवस्थापनासाठी, देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विचार करता, सध्या देशात 952 कोविड समर्पित रुग्णालये असून, त्यात 1,66,332 अलगीकरण खाटा, 21,393 अतिदक्षता सुविधायुक्त खाटा आणि 72,762 ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा उपलब्ध आहेत. 2,391 समर्पित कोविड आरोग्य केंद्र आहेत, ज्यात 1,34,945 अलगीकरण खाटा, 11,027 अतिदक्षता सुविधायुक्त खाटा आणि 46,875 ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा आहेत. केंद्र सरकारने 125.28 लाख एन-95 मास्क आणि 101.54 लाख पीपीई किट्स सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश/ केंद्रीय संस्थांना देण्यात आल्या आहेत.

इतर अपडेट्स:

  • निसर्ग चक्रीवादळाने दुपारी महाराष्ट्र किनारपट्टी ओलांडली. मुंबईत वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना वगळता गंभीर नुकसान झाले नाही. अतितीव्र निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी 12.30 – 2.30 दरम्यान मुंबईच्या आग्नेय दिशेला 75  कि.मी अंतरावर  रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर धडकले.  मुरुड-जंजिरा शहराच्या उत्तरेस, अक्षांश 18.5 एन आणि रेखांश 73.2 ई येथे हे वादळ जमिनीवर धडकले. उत्तर-पूर्व दिशेकडे झालेल्या थोड्या बदलामुळे  मुंबईवर चक्रीवादळाचा परिणाम अपेक्षेपेक्षा खूप कमी  झाला.
  • मात्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना जोरदार वारा, मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र अशा हवामानाचा सामना करावा लागला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागांमध्ये 6-8 फूट उंच  लाटा उसळल्या. रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी निवासी इमारतींच्या गच्चीवर उभारण्यात आलेले पत्र्याचे छप्पर उडून गेले. अलिबागमध्ये ताशी 120-130 किमी वेगाने वारे वाहत होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीज कंपन्यांनी  रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वीजपुरवठा बंद ठेवला होता. रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल सेवेवर परिणाम झाला. अलिबाग येथे 45 मिमी (दुपारी  4 वाजेपर्यंत) तर रत्नागिरी येथे 38 मिमी (दुपारी 4 वाजेपर्यंत) पावसाची नोंद झाली. एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव म्हणाले, रोहा, रेवदंडा आणि श्रीवर्धन भागात अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या मात्र वाहतुकीवर कोणताही  परिणाम झाला नाही.
  • चक्रीवादळामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली होती. एनडीआरएफने महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत  43 तुकड्या तैनात केल्या होत्या. चक्रीवादळ सज्जतेचा नवी दिल्लीत पंतप्रधानांकडून उच्च स्तरावर आढावा घेतला गेला.  महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून  बोलताना पंतप्रधानांनी केंद्राकडून सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली होती. निसर्ग चक्रीवादळ उत्तर पूर्व दिशेने जाईल आणि त्यानंतर आज रात्री चक्रीवादळाची तीव्रता कमी  होईल असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 1.70 लाख कोटी रुपयांच्या निधीमधून केंद्र सरकारने, महिला, गरीब ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना थेट रोख मदत आणि अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजच्या त्वरित आणि प्रभावी अंमलबजावणीकडे केंद्र तसेच राज्य सरकारांचे लक्ष आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 42 कोटी गरजूंना 53,248 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांच्याशी  दूरध्वनीवरून  संवाद साधला. ग्रुप ऑफ सेवनच्या (G-7) अमेरिकेच्या अध्यक्षपदाबाबत आणि या गटाच्या  सध्याच्या सदस्यत्वाचा विस्तार करत भारतासह आणखी महत्वाच्या देशांचा समावेश करण्याचा मनोदय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत होणाऱ्या पुढच्या  जी -7 शिखर परिषदेसाठीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले. कोविड नंतरच्या जागतिक परिस्थितीत येणारे वास्तव लक्षात घेऊन हा मंच विस्तारित करण्याच्या तथ्याची दखल घेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सर्जनशील आणि दूरदृष्टी असलेल्या दृष्टीकोनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली. या प्रस्तावित परिषदेच्या यशासाठी अमेरिका आणि इतर राष्ट्रांसमवेत  काम करण्यात भारताला आनंदच होईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
  • कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या अवघड काळामध्ये विस्तृत प्रमाणावर ऑनलाईन माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचा लाभ घेवून ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाच्यावतीने केवायसी म्हणजेच ‘नो युवर कस्टमर’ या अंतर्गत आपल्या ग्राहकांच्या माहितीचे अद्यतन करण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. दि. 1एप्रिल,  2020 पासून सुरू झालेल्या या सेवेचा लाभ 52.62 लाख ग्राहकांनी दोन महिन्यात घेतला आहे. एप्रिल आणि मे दोन महिन्यात ईपीएफओच्या 39.97 लाख ग्राहकांनी आपल्या आधार क्रमांकाची जोडणी केली. तसेच 9.87 लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाचे अद्यतन आणि जोडणी करून घेतली. तसेच 11.11 लाख फंड ग्राहकांनी आपल्या बँक खात्याला पीएफचे खाते जोडले.
  • केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) देशातील एमएसएमईची व्याख्या आणि निकषांमधील उन्नत सुधारणेची अंमलबजावणी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. नवीन व्याख्या आणि निकष 1 जुलै 2020 पासून अंमलात येतील. 2006 मध्ये एमएसएमई विकास कायदा अस्तित्त्वात आल्यापासून 14 वर्षानंतर आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये 13 मे 2020. रोजी एमएसएमई व्याख्येत सुधारणा करण्यात आली. या घोषणेनुसार, सूक्ष्म उत्पादन आणि सेवा उद्योगांची व्याख्या 1 कोटी रुपये गुंतवणूक आणि  5 कोटी रुपये उलाढाल पर्यंत विस्तारण्यात आली. छोट्या उद्योगांची मर्यादा 10 कोटी  रुपये गुंतवणूक आणि 50 कोटींची उलाढाल तर मध्यम उद्योगांची कमाल मर्यादा 20 कोटींची गुंतवणूक आणि 100 कोटी रुपये  उलाढाल करण्यात आली.
  • केंद्रीय विद्युत तसेच नवीकरणीय आणि पुनर्नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी 3 जून रोजी नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात वीज खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी रियल टाईम व्यवहार मंचाची सुरुवात केली. या मंचामुळे आता भारत, रियल टाईम व्यवहार करणाऱ्या जगभरातील काही निवडक देशांच्या उर्जा बाजारांमध्ये समाविष्ट झाला आहे
  • केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रपट निर्माते, चित्रपट प्रदर्शक संघटना आणि चित्रपट उद्योग प्रतिनिधी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेतली. कोविड-19 मुळे चित्रपट उद्योगाला भेडसावणाऱ्या अडचणींबद्दल चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी ही बैठक आयोजित केली होती, याआधी चित्रपट उद्योगाकडून यासंदर्भात मंत्र्यांना निवेदने पाठविली होती.

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात कोविड-19 च्या 2287 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 72,300 इतकी झाली आहे. यापैकी 38,493 सक्रिय रुग्ण आहेत. हॉटस्पॉट मुंबईत मंगळवारी 1109 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

 

RT/ST/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629173) Visitor Counter : 313