कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व समस्या न्याय्य पद्धतीने सोडविल्या जात आहेत : डॉ.जितेंद्र सिंग
Posted On:
13 MAY 2020 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2020
केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ या विभागांचे मंत्री डॉ. जितेंद्र प्रधान यांनी आज इंटरअॅक्टीव्ह व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे कार्मिक आणि प्रशिक्षण, प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण तसेच निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण या तिन्ही विभागांच्या विभागीय अधिकारी पदापर्यंतच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. कोविड-19 जागतिक महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत घेतली गेलेली ही अशा प्रकारची पहिलीच बैठक आहे.
बैठकीच्या सुरुवातीलाच, मोदी सरकार आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे हित जपण्याप्रती वचनबद्ध आहे असे ठाम प्रतिपादन करीत सिंग यांनी सरकारने नेहमीच अत्यंत संवेदनशीलतेने त्यांच्या कल्याणाचा विचार केला आहे असे सांगितले. कोविड-19 विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांना पाठींबा दर्शवत सर्व विभागांसाठी वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम करण्याची अत्यंत सशक्त व्यवस्था राबविली जात आहे, ज्याद्वारे फक्त 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयांचे कामकाज चालविले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. कार्यस्नेही वातावरण निर्मितीसाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे हे उत्तम उदाहरण आहे असे ते म्हणाले. अशा परीक्षेच्या घडीला, इतर कर्मचारी वर्गाला संकटात न टाकता सर्व वरिष्ठ अधिकारी स्वतः पहिल्या फळीत काम करून समर्थपणे परिस्थिती हाताळत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून सर्व विभागांची कार्यक्षमता वाढल्याचे दिसून येत आहे आणि कोणत्याही विभागातील कार्यसंस्कृतीला धक्का लागलेला दिसून आला नाही याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
देशभर लागू झालेला लॉक डाऊन एकदा उठवला गेला की त्यानंतर सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या रखडलेल्या पदोन्नतीसह सर्व समस्या सहानुभूतीपूर्वक आणि न्याय्य पद्धतीने सोडविल्या जातील अशी ग्वाही सिंग यांनी या बैठकीत उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला दिली. खरेतर, याआधीच म्हणजे या वर्षी, जानेवारी महिन्यातच 400 पेक्षा जास्त पदोन्नतीसाठीचे आदेश जारी केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वास्थ्य आणि आरोग्याविषयी माहिती घेणे तसेच त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या संवेदनशीलतेने सोडविणे हा, नव्या कार्यसंस्कृतीला अनुसरून घेतलेल्या या बैठकीचा मुख्य उद्देश होता असे सिंग यांनी सांगितले. कार्मिक मंत्रालयाने इतर मंत्रालयांसाठी या काळात कार्यरत राहण्यासाठीचे निकष जारी केले असून इतर मंत्रालये देखील त्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी अशाच प्रकारच्या बैठका आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा डॉ. जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केली.
* * *
M.Jaitly/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1623629)
Visitor Counter : 217
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam