पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे देशाला उद्देशून संबोधन

Posted On: 12 MAY 2020 11:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 मे 2020

 

सर्व देशवासीयांना माझा आदरपूर्वक नमस्कार. गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळ अवघे जग कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी लढा देत आहे. या काळात बहुतेक देशांमधील 42 लाख लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली. पावणे तीन लाखापेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतातसुद्धा अनेक कुटुंबांनी आपल्या आप्तांना गमावले आहे. या सर्वांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.

मित्रांनो,

केवळ एका व्हायरसने अवघे जग उद्ध्वस्त केले आहे. जगभरातील कोट्यवधी आयुष्ये या संकटाचा सामना करीत आहेत. अवघे जग जणू काही आयुष्य वाचवण्याच्या युद्धात उतरले आहे. आम्ही असे संकट यापूर्वी पाहिले नाही, ऐकले नाही. खरोखरच, अवघ्या मानव जातीसाठी हे संकट अकल्पित असेच आहे. अभूतपूर्व असे हे संकट आहे. मात्र थकून जाणे, पराभव मान्य करणे, मोडून पडणे, विखरुन जाणे, मानवाला मान्य नाही. सतर्क राहून, अशा प्रकारच्या लढ्याच्या सर्व नियमांचे पालन करून आता आपल्याला बचाव करायचा आहे आणि आगेकूच सुद्धा करायची आहे. आज अवघे जग संकटात असताना आपल्याला आपला संकल्प अधिक दृढ करायचा आहे. आपला संकल्प या संकटापेक्षा निश्चितच विराट असेल.

मित्रांनो,

एकविसावे शतक भारताचे आहे, असे आपण मागच्या शतकापासूनच ऐकत आलो आहोत. कोरोना संक्रमणापूर्वीचे जग आणि जागतिक अर्थव्यवस्था सविस्तर जाणून घेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. कोरोनाच्या संकटानंतर जगात जी परिस्थिती उद्भवली आहे, तीसुद्धा आपण नियमीतपणे पाहत आहोत. हे दोन्ही कालखंड जेव्हा आपण भारताच्या नजरेतून पाहतो, तेव्हा असे वाटते की एकविसावे शतक भारताचे असावे, हे केवळ आपले स्वप्न नाही तर ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.  मात्र ते स्वप्न साध्य करण्याचा, ती जबाबदारी पूर्ण करण्याचा मार्ग कोणता?

जगाची आजची स्थिती पाहता, हे साध्य करण्यासाठी एकच मार्ग आहे, असे दिसून येते, तो म्हणजे स्वावलंबी आत्मनिर्भर भारत. एष: पंथा|, असे आपली शास्त्रे सांगतात. एष: पंथा| अर्थात हाच मार्ग आहे. आत्मनिर्भर भारत.

मित्रांनो,

एक राष्ट्र म्हणून आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत. एवढे मोठे संकट भारतासाठी एक संकेत घेऊन आले आहे, एक संदेश घेऊन आले आहे, एक संधी घेऊन आले आहे. मी एका उदाहरणामधून माझे म्हणणे सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा भारतात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली, तेव्हा आपल्याकडे पी पी ई किट चे उत्पादन घेतले जात नव्हते. एन-95 मास्कचे नाममात्र उत्पादन घेतले जात होते. आजघडीला भारतात प्रतिदिन 2 लाख पी पी ई आणि दोन लाख एन-95 मास्क तयार केले जात आहेत. हे आपल्याला शक्य झाले, कारण भारताने संकटाचे रूपांतर संधीत केले. संकटाचे रूपांतर संधीत करण्याचा भारताचा हा दृष्टिकोन, आत्मनिर्भर भारताचा आपला संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरणार आहे.

मित्रांनो,

आज जगभरात आत्मनिर्भर या शब्दाचा संदर्भ पूर्णपणे बदलून गेला आहे. जागतिक स्तरावर आत्मनिर्भर या शब्दाची व्याख्या बदलते आहे. अर्थकेंद्रित जागतिकीकरण विरुद्ध मानवकेंद्रित जागतिकीकरण असा वाद आज रंगला आहे. भारताच्या मूलभूत चिंतनामधूनच जगाला आशेचा किरण दिसतो आहे. वसुधैव कुटुंबकम हा ज्याचा आत्मा आहे, अशा आत्मनिर्भरतेची पाठराखण भारताची संस्कृती, भारताचे संस्कार करतात.

भारत जेव्हा आत्मनिर्भरतेबाबत बोलतो, तेव्हा आत्मकेंद्रित व्यवस्थेचे समर्थन करत नाही. भारताच्या आत्मनिर्भरतेमध्ये जगाचे सुख, सहकार्य आणि शांतीची काळजी असते. जी संस्कृती जय जगतमध्ये विश्वास ठेवते, जी मनुष्यजातीचे कल्याण चिंतिते, जी पूर्ण जगाला कुटुंब मानते, जी आपल्या  आस्थेमध्ये 'माता भूमिः पुत्रो अहम् पृथिव्यः' या विचाराला प्राधान्य देते, जी पृथ्वीला माता मानते  ती संस्कृती , ती भारतभूमी, जेव्हा आत्मनिर्भर बनते, तेव्हा त्यातून एक सुखी-समृद्ध जगाची शक्यता देखील सुनिश्चित होते. भारताच्या प्रगतीत नेहमीच जगाची प्रगती समाविष्ट राहिली आहे.

भारताच्या उद्दिष्टांचा प्रभाव, भारताच्या कृतीचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. जेव्हा भारत उघड्यावरील शौचापासून मुक्त होतो, तेव्हा जगाचे चित्र पालटून जाते. क्षयरोग असेल, कुपोषण असेल, पोलियो असेल, भारताच्या अभियानांचा प्रभाव जगावर पडतोच पडतो. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ,जागतिक तापमान वाढीविरोधात भारताची भेट आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा पुढाकार मानवी जीवनाला तणावापासून मुक्ती देण्यासाठी भारताची भेट आहे.

आयुष्य आणि मृत्यूची लढाई लढणाऱ्या जगात आज भारताची औषधे एक नवी आशा घेऊन पोहचतात. या उपायांमुळे जगभरात भारताची प्रशंसा होते,तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.

जगाला विश्वास वाटू लागला आहे कि भारत उत्तम कामगिरी करू शकतो, मानवजातीच्या कल्याणासाठी खूप काही चांगले देऊ शकतो.

प्रश्न हा आहे- कि कशा प्रकारे ?

या प्रश्नाचे देखील उत्तर आहे -

130 कोटी देशवासियांचा  आत्मनिर्भर भारताचा संकल्प

मित्रांनो

आपला अनेक शतकांपासून गौरवशाली इतिहास आहे.

भारत जेव्हा  समृद्ध होता,सोन्याची चिमणी असे भारताला म्हटले जायचे, संपन्न होता, तेव्हा नेहमी जगाच्या कल्याणाच्या मार्गावरच  चालला.

काळ बदलला, देश गुलामीच्या जोखडात अडकला, आपण विकासासाठी आसुसलेले होतो. 

आज भारत विकासाच्या दिशेने यशस्वीपणे पाऊल पुढे टाकत आहे, तेव्हाही जगाच्या कल्याणाच्या मार्गावर अटल आहे.

आठवा , या शतकाच्या सुरुवातीला Y2K संकट आले होते.

भारताच्या तंत्रज्ञान तज्ञांनी जगाला त्या संकटातून बाहेर काढले होते.

आज आपल्याकडे साधने आहेत. आपल्याकडे  सामर्थ्य आहे. आपल्याकडे जगातील सर्वोत्तम गुणवत्ता आहे. 

आपण उत्तम उत्पादने बनवू. आपला दर्जा आणखी चांगला करू. पुरवठा साखळी आणखी आधुनिक करू.

हे आपण करू शकतो,आणि आपण नक्की करू.

मित्रांनो

मी माझ्या डोळ्यांनी कच्छ भूकंपाचे ते दिवस पाहिले आहेत. सगळीकडे केवळ ढिगारा होता. सगळे काही उध्वस्त झाले होते. असे वाटायचे कि कच्छ, मृत्यूची चादर ओढून झोपला आहे. त्या परिस्थितीत कुणी विचार देखील करू शकले नसते कि परिस्थिती बदलू शकेल. 

मात्र बघता बघता कच्छ यातून सावरून पुन्हा उभा राहिला. कच्छ पुढे चालू लागला, कच्छ पुढे चालतच राहिला.

हीच आपणा भारतीयांची संकल्पशक्ति आहे. आपण मनाशी ठरवले तर कोणतेही लक्ष्य अशक्य नाही. कोणतीही वाट कठीण नाही.

आणि आज तर इच्छा देखील आहे, मार्ग देखील आहे. तो आहे भारताला आत्मनिर्भर बनवणे.

भारताची  संकल्पशक्ति अशी आहे कि भारत आत्मनिर्भर बनू शकतो.

मित्रांनो ,

आत्मनिर्भर भारताची ही भव्य इमारत, पाच स्तंभांवर उभी असेल.

पहिला  स्तंभ अर्थव्यवस्था:

एक अशी अर्थव्यवस्था जी छोटे छोटे बदल घडवणार नाही तर खूप मोठी झेप घेईल

दुसरा स्तंभ पायाभूत विकास: 

एक असा पायाभूत विकास जो आधुनिक भारताची ओळख बनेल.

तिसरा स्तंभ :

आमची व्यवस्था-एक अशी व्यवस्था, जी गेल्या शतकाच्या पद्धती आणि धोरणे नाही, तर 21 व्या शतकाची स्वप्ने साकार करणाऱ्या तंत्रज्ञान प्रेरित व्यवस्थांवर आधारलेली आहे.

चौथा स्तंभ :

आपली  मनुष्यशक्ती

जगातील सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या लोकशाहीतली सळसळती लोकशक्ती आपली ताकद आहे. स्वयंपूर्ण भारतासाठी हाच आपला उर्जास्त्रोत आहे.

पाचवा स्तंभ :

मागणी

आपल्या अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठ्याच्या साखळीचे जे चक्र आहे, जी ताकद आहे, तिचा संपूर्ण क्षमतेनिशी वापर होणे आवश्यक आहे.

देशात मागणी वाढवण्यासाठी, मागणी पूर्ण करण्यासाठी, आपल्या पुरवठा साखळीतील प्रत्येक हितसंबधीयांनी सशक्त होणे गरजेचे आहे.

आपली पुरवठा साखळी, आपल्या पुरवठ्याची अशी व्यवस्था आपण मजबूत करणार आहोत, ज्यात आपल्या मातीचा गंध असेल, आपल्या कामगारांच्या घामाचा सुगंध असेल.

मित्रांनो ,

कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना, नव्या संकल्पासह, मी आज एका विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करतो आहे.

हे आर्थिक पॅकेज, आत्मनिर्भर भारत अभियानात एक महत्वाचा भाग म्हणून काम करेल.

मित्रांनो,

अलीकडेच, सरकारने कोरोना संकटाशी संबधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या, रिझर्व बँकेने जे निर्णय घेतले होते. आणि आज मी ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा करतो आहे, ते सगळे एकत्रित केले, तर हे जवळपास 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज आहे.

हे पॅकेज भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पनाच्या सुमारे 10 टक्के आहे.

या सर्वांच्या माध्यमातून, देशाच्या विविध वर्गांना, अर्थव्यवस्थेच्या विविध साखळ्यांना, 20 लाख कोटी रुपयांचा आधार मिळणार आहे.

20 लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज, 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला, स्वयंपूर्ण भारत अभियानाला एक नवी गती देईल.

आत्मनिर्भर भारताचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी या पॅकेजमध्ये भूमी, श्रम, रोकड सुलभता आणि कायदे या सर्वांवर भर देण्यात आला आहे.

हे आर्थिक पॅकेज आमचे कुटिरोद्योग, गृहोद्योग, लघु आणी मध्यम उद्योग आपले एमएसएमई क्षेत्र, अशा सर्वांसाठी आहे, जे कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे, जे स्वयंपूर्ण भारताच्या आपल्या संकल्पाचा भक्कम आधार आहेत.

हे आर्थिक पॅकेज, देशाच्या त्या श्रमिकासाठी आहे, त्या शेतकऱ्यासाठी आहे जो कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही ऋतूत  देशबांधवांसाठी अहोरात्र परिश्रम करत असतो.

हे आर्थिक पॅकेज आपल्या देशातील प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या आणि देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या मध्यमवर्गासाठी आहे, हे आर्थिक पॅकेज भारतीय उद्योग जगतासाठी आहे, जो भारताच्या आर्थिक सामर्थ्याला नव्या उंचीवर पोहचवण्यासाठी कृतसंकल्प आहे.

उद्यापासून, पुढचे काही दिवस, आपल्या अर्थमंत्री आपल्याला या  आत्मनिर्भर भारत अभियानाशी संबधित आर्थिक पॅकेजची सविस्तर माहिती देणार आहेत.

मित्रांनो,

स्वयंपूर्ण भारताची निर्मिती करण्यासाठी आता काही धाडसी सुधारणा करण्याची कटीबद्धता घेऊनच देशाने पुढे वाटचाल करणे अनिवार्य झाले आहे.

आपणही अनुभव घेतला असेल की गेल्या 6 वर्षात ज्या सुधारणा झाल्या, त्यांच्यामुळे आज या संकटाच्या काळातही भारताच्या व्यवस्था अधिक सक्षम, अधिक समर्थ दिसत आहेत.

नाहीतर, कोणी विचार केला होता, की भारत सरकार जे पैसे पाठवते, ते पूर्णच्या पूर्ण पैसे गरीबाच्या खिशात, शेतकऱ्याच्या हातात पोचू शकतील?

मात्र हे घडले आहे. ते ही अशावेळी घडले आहे, ज्यावेळी सर्व सरकारी कार्यालये बंद होती, वाहतुकीची साधने बंद होती.

जनधन-आधार-मोबाइल- म्हणजेच JAM च्या या त्रिशक्तीशी संबंधित ही केवळ एकच सुधारणा आहे, ज्याचा परिणाम आपण आता पहिला आहे.  आता या सुधारणांची व्याप्ती आणखी वाढवायची आहे, त्यांना एक नवी उंची द्यायची आहे.

ह्या सुधारणा, शेतीशी संबंधित पूर्ण पुरवठा साखळीत केल्या जातील, जेणेकरुन शेतकरी देखील सक्षम व्हावा आणि भविष्यात जर कोरोनासारखे संकट आले तर त्याचा कृषीक्षेत्रावर कमीतकमी परिणाम व्हावा.

ह्या  सुधारणा, तर्कसंगत करव्यवस्था, सरळ आणि स्पष्ट नियम-कायदे, उत्तम पायाभूत सुविधा, समर्थ आणि सक्षम मनुष्यबळ आणि मजबूत वित्तीय व्यवस्थेच्या निर्मितीसाठी असतील.

ह्या सुधारणा, व्यापाराला प्रोत्साहन देतील, गुंतवणुकीला आकर्षित करतील आणि मेक इन इंडिया चा आपला संकल्प अधिक सशक्त करतील.

मित्रांनो,स्वसामर्थ्य आणि आत्मविश्वास यामुळेच स्वयंपूर्णता शक्य आहे.स्वयंपूर्णता,जागतिक पुरवठा साखळीत तीव्र स्पर्धेसाठीही देशाला सज्ज करते.

भारत प्रत्येक स्पर्धेत विजयी ठरावा, जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका भारताने बजावावी  ही काळाची मागणी आहे.हे जाणून आर्थिक पॅकेज मध्ये यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.यामुळे आपल्या सर्व क्षेत्रांची कार्यक्षमता वाढेल आणि दर्जाही सुनिश्चित होईल.

मित्रहो,

हे संकट इतके मोठे आहे की मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्थाही दोलायमान झाल्या आहेत.

मात्र या परिस्थितीतही देशाने,आपल्या गरीब बंधू-भगिनींनी,संकटाशी संघर्ष करण्याची शक्ती,संयमाच्या शक्तीचे दर्शन घडवले.

विशेष करून फेरीवाले बंधू-भगिनी,ठेला लावणारे श्रमिक  बंधू,घरकामाला जाणारे बंधू-भगिनी या सर्वांनी या काळात मोठा त्याग केला आहे, मोठी तपस्या केली आहे.

यांची अनुपस्थिती जाणवली नाही असे कोण आहे?

आता आपले कर्तव्य आहे त्यांना बळ देण्याचे,त्यांच्या आर्थिक हितासाठी मोठी पावले उचलण्याचे.

हे लक्षात घेऊन गरीब असो,श्रमिक असो,स्थलांतरित मजूर असो,पशुपालक असो,मच्छीमार असो,संघटित किंवा असंघटित क्षेत्रातला असो, प्रत्येक वर्गासाठी आर्थिक पॅकेज मध्ये काही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली जाईल.

मित्रहो,कोरोना संकटाने आपल्याला स्थानिक उत्पादन,स्थानिक बाजारपेठ,स्थानिक पुरवठा साखळीचे महत्व पटवून दिले आहे.संकटाच्या काळात आपल्या मागण्यांची पूर्तता स्थानिकानी केली आहे,स्थानिकने आपल्याला  वाचवले आहे.

स्थानिक ही आपली केवळ गरज नव्हे तर आपली जबाबदारीही आहे.स्थानिक हाच आपण आपल्या  जीवनाचा मंत्र करायला हवा हे आपल्याला काळाने शिकवले आहे. आपल्याला आज जे जागतिक ब्रँड वाटतात ते ही कधीतरी असे स्थानिकच होते.मात्र तिथल्या लोकांनी त्याचा वापर सुरू केला,त्याचा प्रचार सुरू केला,त्याचे ब्रँडिंग केले,त्याचा अभिमान बाळगला तेव्हा ती उत्पादने स्थानिक वरून जागतिक झाली.

म्हणूनच आजपासून प्रत्येक भारतीयाला आपल्या स्थानिक उत्पादनासाठी वाणीचा उपयोग करायचा आहे.स्थानिक उत्पादने खरेदी करण्याबरोबरच त्याचा प्रचारही करायचा आहे. आपला देश असे करू शकतो याचा मला पूर्ण  विश्वास आहे.

तुमच्या  प्रयत्नांनी प्रत्येक वेळी तुमच्या  प्रती असलेली माझी श्रद्धा अधिकच वृद्धींगत केली आहे.

मी मोठ्या अभिमानाने एक गोष्ट आठवतो. मी जेव्हा आपल्याला,देशाला खादी खरेदी करण्याचा आग्रह केला होता.  हातमाग कामगारांना सहाय्य करण्यासाठीही सांगितले होते.आपण पहा,अतिशय कमी काळात, खादी आणि हातमाग, दोन्हींची मागणी आणि विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली.

इतकेच नव्हे तर आपण त्याला मोठा ब्रँडही  केला.अतिशय छोटा प्रयत्न होता,मात्र त्याचा मोठा उत्तम परिणाम साध्य झाला.

मित्रांनो,सर्व तज्ञ,वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कोरोना, दीर्घ काळ आपल्या जीवनाचा भाग राहणार आहे.

मात्र त्याच वेळी आपण आपले जीवन केवळ कोरोनापुरतेच सीमित ठेवू शकत नाही.

आपण मास्कचा वापर करू, सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करू मात्र आपले लक्ष्य कायम ठेवू.

म्हणूनच लॉक डाऊनचा चौथा टप्पा पूर्णतः वेगळा असेल, नव्या नियमांचा असेल.

राज्यांकडून आम्हाला ज्या सूचना मिळत आहेत त्यांच्या आधारावर लॉक डाऊन 4 बाबत आपल्याला 18 मे पूर्वी माहिती दिली जाईल.

नियमांचे पालन करत आपण कोरोनाशी लढाही देऊ आणि पुढेही जाऊ याचा मला पूर्ण विश्वास आहे.

मित्रांनो,

आपल्याकडे म्हटलं आहे' सर्वम आत्म वशं सुखमं 'म्हणजे जे आपल्या नियंत्रणात आहे तेच सुख आहे.स्वयंपूर्णता आपल्याला सुख आणि आनंद देण्या बरोबरच सशक्तही करते. 21 वे शतक भारताचे शतक करण्याची आपली जबाबदारी स्वयंपूर्ण भारताच्या निश्चयानेच पूर्ण होईल. याला 130 कोटी भारतीयांच्या आत्मशक्तीची ऊर्जा  मिळेल.

स्वयंपूर्ण भारताचे  हे युग,आपल्या भारतवासीयांसाठी नवा निश्चय असेल,नवे पर्व ही असेल.

नव्या संकल्प शक्तीने आपल्याला पुढे जायचे आहे.

आचार- विचार कर्तव्य भावनेने प्रेरित असतील,कौशल्याची पुंजी असेल तर स्वयंपूर्ण भारत होण्यापासून कोण रोखू शकेल?

आपण भारताला स्वयंपूर्ण करू शकतो.

आपण भारताला स्वयंपूर्ण करूच.

या संकल्पासह या विश्वासासह मी आपल्याला खूप-खूप शुभेच्छा देतो.

आपण आपल्या आरोग्याची आपल्या कुटुंबाची आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या.

खूप-खूप धन्यवाद.

RT/MC/MP/SK/RA/NC/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623433) Visitor Counter : 615