रसायन आणि खते मंत्रालय

लॉक डाऊन सुरु असताना हिन्दुस्थान इन्सेक्टीसाईड कंपनीला आफ्रिकी देशांमधून मोठ्या ऑर्डर्स मिळण्याची आशा

Posted On: 12 MAY 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 मे 2020

कोविड-19 विषाणू संसर्गामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊन अर्थात संपूर्ण बंदीच्या काळात देशातील कंपन्यांना उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवताना माल वाहतूक आणि इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशी परिस्थिती असताना देखील केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या रसायन तसेच खनिज तेल विभागाच्या अखत्यारीतील हिन्दुस्थान इन्सेक्टीसाईड लिमिटेड (इंडिया) ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी देशभरातील शेतकरीवर्गाला कीटकनाशकांचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. इतकेच नव्हे तर कंपनीला आफ्रिकी देशांकडून डीडीटी या कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणावर मागणी येईल अशी अपेक्षा आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने उत्पादन प्रकल्पात सर्व प्रकारची सुसज्जता ठेवली आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये आफ्रिकी देशांच्या परिसरात हिवतापाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर हिन्दुस्थान इन्सेक्टीसाईड कंपनीने दक्षिण आफ्रिका विकास समुदायातील दहा देशांना पत्र लिहून डीडीटी या कीटकनाशकाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.

लॉक डाऊन च्या काळात देशातील शेतकऱ्यांना कीटकनाशकांचा तुटवडा भासू नये या उद्देशाने कंपनीने डीडीटी टेक्निकल, डीडीटी 50 % डब्लूडीपी, मलाथीयॉन टेक्निकल, हिलगोल्ड इत्यादी कीटकनाशकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले आहे. टोळ धाड नियंत्रण कार्यक्रमासाठी देखील कंपनी मलाथीयॉन टेक्निकल या कीटकनाशकाचे अखंडित उत्पादन करीत आहे. राजस्थान आणि गुजरात राज्यात कृषी मंत्रालय राबवीत असलेल्या टोळ धाड नियंत्रण मोहिमेसाठी हिन्दुस्थान इन्सेक्टीसाईड कंपनी मलाथीयॉन टेक्निकल या कीटकनाशकाचा सतत पुरवठा करीत आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम संचालनालयाने दिलेल्या खरेदीच्या निर्देशांनुसार ओडिशा राज्याला डीडीटी 50 % डब्लूडीपी या कीटकनाशकाचा पुरवठा करण्यात आला आहे.

हिन्दुस्थान इन्सेक्टीसाईड कंपनीच्या कारखान्यात कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य व्यक्तिगत अंतर राखण्याच्या सर्व नियमांचे कडक पालन केले जात आहे, तसेच या बाबतीतील प्रमाणित परिचालन निर्देशांनुसार किमान मनुष्यबळासह हे कारखाने कार्यरत ठेवले आहेत. कारखान्यांच्या सर्व विभागांमध्ये योग्य प्रमाणावर स्वच्छता पाळली जात आहे. कामगारांची काम करण्याची ठिकाणे, निर्मिती यंत्रे तसेच कारखान्यांमध्ये प्रवेश करणारे ट्रक आणि बस यांना वारंवार सॅनिटाईझ केले जात आहे.

 

M.Jaitly/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1623374) Visitor Counter : 233