पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात लस,औषध संशोधन ,निदान आणि चाचणी याबाबत कृती दलाची बैठक
Posted On:
05 MAY 2020 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2020
लसीचा विकास,औषध संशोधन,निदान आणि चाचणी या बाबतीत भारताच्या प्रयत्नांच्या सद्य स्थितीचा पंतप्रधानांनी सविस्तर आढावा घेतला. भारतीय लस कंपन्या दर्जा, उत्पादन क्षमता आणि जागतिक मान्यतेसाठी प्रसिध्द आहेत. याव्यतिरिक्त, ते लस विकास संशोधनाच्या प्रारंभिक टप्प्यात नवप्रवर्तक म्हणून पुढे आले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय शिक्षण आणि स्टार्ट अप्सही या क्षेत्रात अग्रेसर आहेत. 30 पेक्षा जास्त भारतीय लसी कोरोना लसीच्या विकासाच्या विविध टप्प्यात आहेत, त्यापैकी काही चाचणीच्या टप्प्यात आहेत.
त्याचप्रमाणे, औषधांच्या विकासामध्ये तीन दृष्टिकोन विचारात घेतले जात आहेत. एक, विद्यमान औषधांचे पुनरुत्थान. या प्रकारात किमान चार औषधांचे संश्लेषण आणि तपासणी सुरु आहे. दोन, नवीन औषधे आणि मॉलेक्युलसचा विकास प्रयोगशाळेच्या पडताळणीसह उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणकाशी जोडण्यात आला आहे. तीन, सामान्य विषाणू-रोधक गुणधर्मांसाठी वनौषधींचे अर्क आणि उत्पादनांची तपासणी केली जात आहे.
निदान आणि चाचणीमध्ये, अनेक शैक्षणिक संशोधन संस्था आणि स्टार्ट-अप्स यांनी आरटी-पीसीआर दृष्टीकोन आणि अँटीबॉडी शोधण्यासाठी नवीन चाचण्या विकसित केल्या आहेत. याव्यतिरिक्त, देशभरातील प्रयोगशाळांना एकमेकांशी जोडून या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांची क्षमता व्यापक प्रमाणात वाढवण्यात आली आहे. सध्याच्या गरजा पूर्ण करून चाचणीसाठी अभिकर्मक आयात करण्याच्या समस्येचे निराकरण भारतीय स्टार्ट अप्स आणि उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. या क्षेत्रात मजबूत दीर्घकालीन उद्योगाच्या विकासावर सध्या भर दिला जात आहे.
पंतप्रधानांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये वेगवान परंतु कार्यक्षम नियामक प्रक्रियेसह शिक्षण , उद्योग आणि सरकार यांच्या असामान्य एकत्रित प्रयत्नांची दखल घेण्यात आली. पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली की याप्रकारचा समन्वय आणि वेग मानक संचलन प्रक्रियेमध्ये अंतर्भूत करायला हवा. आपत्तीच्या प्रसंगी जे शक्य आहे ते आपल्या वैज्ञानिक कामकाजाच्या नियमित पद्धतीचा एक भाग बनावा यावर त्यांनी भर दिला.
औषध संशोधनात संगणक विज्ञान, रसायनशास्त्र आणि जैवतंत्रज्ञातील चाचणीशी जोडण्याची सूचना केली. हॅकेथॉनमधील यशस्वी उमेदवारांना स्टार्ट अप्सद्वारे. पुढील विकास आणि संशोधनासाठी निवडले जाऊ शकते.
पंतप्रधान म्हणाले की भारतीय वैज्ञानिक मूलभूत ते उपयोजित विज्ञानापर्यंत अभिनव आणि मूळ पद्धतीने उद्योगाबरोबर एकत्र आले आहेत ही आनंदाची बाब आहे. अशा प्रकारचा अभिमान, कल्पकता आणि उद्देशाची जाणीव यांचे वर्चस्व पुढील वाटचालीत आपल्या दृष्टिकोनावर कायम राहायला हवे. तरच आपण विज्ञानामध्ये अनुयायी नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक बनू शकतो.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621363)
Visitor Counter : 232
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada