निती आयोग

‘उचित सामाजिक अंतर हीच आजमितीला उपलब्ध असणारी सर्वात शक्तिशाली लस आहे’:- आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन

Posted On: 30 APR 2020 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  एप्रिल 2020

 

नीती आयोगाने आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्ष वर्धन आणि अशासकीय संस्था व नागरी संघटना यांच्यादरम्यान थेट संवादसत्राचे आयोजन केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

नीती आयोगाच्या 'दर्पण' संकेतस्थळावर नोंदणीकृत असलेल्या सर्व अशासकीय सामाजिक संस्थांनी यात सहभाग घेतला. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (प्रतिनिधी- हरी मेनन), हेल्पेज इंडिया (प्रतिनिधी- मॅथ्यू चेरिअन), टाटा ट्रस्टस (प्रतिनिधी- एच.एस.डी.श्रीनिवास), पिरामल स्वास्थ्य (प्रतिनिधी- अश्विन देशमुख), CYSD (प्रतिनिधी- जगदानंद), प्रयास (प्रतिनिधी- आमोदकांत), रेड क्रॉस (प्रतिनिधी- याहीया अलीबी), सेवा (प्रतिनिधी- छाया भावसार), माण देशी फाऊंडेशन (प्रतिनिधी- प्रभात सिन्हा), सुलभ इंटरनॅशनल (प्रतिनिधी- ललित कुमार), लाल पॅथलॅब्स (प्रतिनिधी- अरविंद लाल), पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (प्रतिनिधी- के.श्रीनाथ रेड्डी), केअर इंडिया (प्रतिनिधी- मनोज गोपालकृष्णन), वर्किंग वूमेन्स फोरम (प्रतिनिधी-नंदिनी आझाद), अक्षय पात्र (प्रतिनिधी- विजय शर्मा) या संस्थांनी यात भाग घेतला.

या सहभागी संस्थांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. उदा- कोविड-19 रुग्ण व लढा देण्यात आघाडीवर असणारे कार्यकर्ते यांना समाजाकडून मिळणारी भेदभावाची वागणूक, ग्रामीण भागातील औषधांचा तुटवडा, इ-परवान्यांसाठी मदत, PPE N-95 मास्कचा अधिक पुरवठा, माहिती-तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची गरज, स्थलांतरितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मदत, डिजिटल पेमेंट, लॉकडाउन संपल्यानंतर अनौपचारिक क्षेत्रातील उद्योजकांना वित्तीय आणि धोरणात्मक सहकार्य, दुर्गम भागात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, हरित क्षेत्रात उत्पन्न मिळवून देणारे कार्यक्रम सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव, ग्रामीण भागासाठी अधिक आरोग्य कर्मचारी, RT-PCR पद्धतीने एकत्रित चाचण्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची क्षमता-बांधणी, विलगीकरण आणि अतिदक्षता सुविधांमध्ये सुधारणा, सामुदायिक सर्वेक्षण, सामुदायिक पोषण इत्यादी.     

आरोग्यमंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी, कोविड-19 शी लढण्यामध्ये सर्व सामाजिक संस्थांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे, कौतुक केले. येत्या काळातही त्यांनी असेच सहकार्य देत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. भारतीय नागरिकांच्या हितासाठी या संस्था घेत असलेल्या परिश्रमांची त्यांनी प्रशंसा केली.

या विषाणूचा चीनमध्ये प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात येताच भारताने वेळेपूर्वीच सावध पावले टाकायला सुरुवात करत, बंदरे व विमानतळांवरील तपासण्यांची सुरुवात केली होती, असे मंत्रिमहोदयांनी स्पष्ट केले.

या आजाराशी लढत देण्यात आघाडीवर असणाऱ्या व्यक्ती व रुग्ण यांना अनुभवास येणाऱ्या सामाजिक पूर्वग्रहाबद्दल डॉ.हर्ष वर्धन यांनी सविस्तर चर्चा केली. आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारने साथरोग कायद्यात सुधारणा केल्याचेही त्यांनी सांगितले.  मात्र,प्रत्येक अडचण कायद्याच्या मदतीनेच सोडवता येत नाही, असे सांगून पूर्वग्रहामुळे निर्माण होत असलेल्या या प्रश्नचा सामना करण्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थांचे साहाय्य मागितले. स्थलांतरित कामगार जेव्हा त्यांच्या गावी परततील, तेव्हा त्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन, सामाजिक संस्थांनी योग्य भूमिका निभवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यांच्या वर्गीकरणाबद्दलही त्यांनी चर्चा केली. 129 जिल्हे हॉटस्पॉट  म्हणून गणले जात असून, जवळपास 297 जिल्हे बाधित असले तरी हॉट स्पॉट नाहीत.   तर 300  पेक्षा जास्त जिल्हे बाधित नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. "रेड झोन मधील भागांत येत्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण ना आढळल्यास त्यास ऑरेंज झोनमध्ये आणण्यास मदत केली जात आहे. तसेच ऑरेंज झोनला ग्रीन झोनमध्ये नेण्यास मदत करण्यात येत आहे. आपला शत्रू देशात नेमका कोठे आहे हे अचूक माहिती असल्याने सर्व शक्तीनिशी त्याचा पाडाव करता येईल" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

PPE व मास्क साठी देशातील 108 उत्पादकांची मदत घेतली जात आहे. व आता 1.5 लाख PPE दररोज तयार होत आहेत. तसेच आता दररोज एक लाखापेक्षा अधिक N95 मास्क तयार केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. या अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा होत असून, राज्यांनाही ते वितरित केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या नैसर्गिक उपायांचाही त्यांनी उल्लेख केला.

कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्यसेतू ॲपचे महत्त्व अधोरेखित करत, डॉ.हर्ष वर्धन यांनी प्रत्येकाला ते डाउनलोड करून घेण्यास प्रोत्साहन दिले. या ॲपमुळे आपणास अत्यावश्यक असे संरक्षण मिळते असे त्यांनी सांगितले. सरकारने ट्विटरच्या मदतीने @CovidIndiaSeva चा प्रारंभ केला असून त्याद्वारे कोणतीही अडचण किंवा कोणताही उपाय सांगण्यासाठी नागरिक थेट सरकारपर्यँत पोहोचू शकतात असे त्यांनी स्पष्ट केले. यामार्फत कमीत कमी वेळात अडचणी सोडवल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

नियमितपणे हात व तोंड स्वच्छ धुणे आणि मास्क घालणे, या सवयीच या आजारापासून तुमचे आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींचे संरक्षण करतील. घरच्या वृद्धांची काळजी घ्या, घरीच राहा, घरून काम करत राहा असा सल्ला त्यांनी दिला. या आजारावर प्रभावी अशी लस मिळेपर्यंत, व्यक्ती-व्यक्तींमध्ये उचित सामाजिक अंतर राखणे आणि राष्ट्रीय पातळीवर लॉकडाउन हीच यावरची सर्वात शक्तिशाली लस आहे.असे डॉ.हर्ष वर्धन यांनी सांगितले.

 

G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1619696) Visitor Counter : 187