PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


इतर राज्यांमध्ये अडकलेल्या लोकांची तसेच स्थलांतरित मजुरांची आंतरराज्यीय वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

Posted On: 29 APR 2020 7:58PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 29 एप्रिल 2020

इतर राज्यांमध्ये अडकलेल्या लोकांची तसेच स्थलांतरित मजुरांची आंतरराज्यीय वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. या सर्व लोकांची निघताना आणि पोहोचल्यावर आरोग्य मंत्रालयाच्या निकषांप्रमाणे वैद्यकीय चाचणी होईल तसेच गंतव्यस्थळी आल्यानंतर त्यांना गृह/संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्यात आज दूरध्वनीद्वारे संभाषण  झाले. कोविड-19 संदर्भातल्या सध्याच्या जागतिक परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली. जागतिक ऐक्य आणि सहकार्य,पुरवठा साखळी अबाधित राखणे आणि सहकार्यात्मक संशोधन कार्याचे महत्व यावर दोन्ही नेत्यांनी एकमत दर्शवले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या देशभरातील सभासदांशी संवाद साधला. या क्लबने PM  CARES फंडासाठी 9.1 कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल तसेच विविध मुख्यमंत्री मदत निधींसाठी 12.5 कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल डॉ हर्षवर्धन यांनी त्यांचे आभार मानले. कोट्यावधी लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात, वैद्यकीय साधने आणि संरक्षक उपकरणे देण्यातही लायन्स क्लब देत असलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि समर्पित कोविडयोद्धे, हितसंबंधीय अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोविड-19 च्या लढ्यात विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या सचिव प्रीती सुदान, यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  चर्चा केली. कोविड-19 चे व्यवस्थापन आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि इतर संबंधित विषयांबाबत त्यांनी माहिती घेतली. GIS डॅशबोर्ड, कोविड-19 पोर्टल आणि RT-PCR संदर्भातील अॅप यांच्या कामाविषयी यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सर्व राज्यांनी आरोग्य सेतू अॅपची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी, कारण या अॅपमुळे लोकांना कोविडच्या धोक्याबाबत स्वयंमूल्यांकन करता येते, आणि त्याचा प्रतिबंध करण्यात सरकारला मदत मिळेल, असे सुदान यांनी सांगितले.

बिगर-कोविड आजारांसाठीच्या आवश्यक वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, यावरही आरोग्यसचिवांनी भर दिला. डायलीसीस, कर्करोग उपचार, गर्भवती महिला, हृदयरोगी अशा गंभीर आजार किंवा तातडीची वैद्यकीय सेवा आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची योग्य ती वैद्यकीय काळजी घेतली जावी, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जनतेच्या आसपास असलेल्या सेवा सुरळीत सुरु राहतील, याची राज्यांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

कोविड-19 च्या व्यवस्थापनाविषयी बोलताना आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गवा म्हणाले की रुग्णांच्या नमुन्यांचे संकलन आणि त्यानुसार फॉर्म भरणे ही कामे अत्यंत जबाबदारी आणि चिकाटीने करणे आवश्यक आहे. RT-PCR चाचण्यांविषयक अॅप आता सुरु झाले असून त्याचा त्वरित वापर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्यांना देण्यात आली.  

आतापर्यंत देशात 7,695 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर सध्या  24.5%. इतका आहे. तसेच, देशभरात सध्या कोविडचे एकूण 31,332 रुग्ण आहेत.

 इतर अपडेट्स :

  • कोविड-19 चा देशभरात उद्रेक होऊ लागल्यानंतर देशात लागू झालेल्या लॉकडाऊननंतर, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषीकामे मार्गी लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या लॉकडाऊनच्या काळात, आपल्या 69 शेतकरी गटांनी एकत्र येत आपला 8.5 कोटी रुपयांचा शेतमाल थेट ग्राहकांना विकून थेट विपणनाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रातील कोविड 19 च्या सद्यस्थितीची माहिती  नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मनपाची माहिती देणारा डॅश बोर्ड विकसित करण्यात आला आहे.
  • वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील विविध निर्यात संवर्धन परिषदांशी (ईपीसी) चर्चा केली. गोयल म्हणाले की कोविडनंतरच्या युगात जागतिक पुरवठा साखळीमध्ये लक्षणीय बदल होणार आहे आणि भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांनी जागतिक व्यापारामध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलण्याकडे लक्ष द्यायला हवे.
  • चोवीस तास संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेताना रुग्णालयातील आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा संसर्ग होण्याचा धोका आहे. कदाचित नवीन मित्र, एचसीएआरडी याच्या मदतीमुळे धोक्याची पातळी कमी होऊ शकेल. हॉस्पिटल केअर असिस्टिव्ह रोबोटिक डिव्हाइस अर्थात एचसीएआरडी हे रोबोटिक उपकरण आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांपासून शारीरिक अंतर राखण्यास मदत करू शकते.
  • अन्न प्रक्रिया उद्योगाचा सध्याचा दृष्टीकोन आणि लॉकडाऊन नंतरच्या परिस्थितीत उद्योगाच्या गरजांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)  आणि त्याच्या सदस्यांबरोबर  व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
  • कोविड केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी 28 एप्रिल 2020 ला राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, आसाम, ओदिशा, गोवा, नागालॅड, मिझोरम आणि मेघालयचे माहिती तंत्रज्ञानमंत्री बैठकीला उपस्थित होते.
  • एखाद्या प्रसंगी त्वरित विचार करण्याची गरज असताना मध्य रेल्वेने चिपळूण येथील  एका हृदयविकार असलेल्या रुग्णाला अत्यावश्यक औषधे मुंबईहून पाठवायला  मदत केली.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह, राज्यांचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून बैठक घेतली. 22 राज्यांचे शिक्षणमंत्री आणि 14 राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांचे सचिव या बैठकीत सहभागी झाले होते. शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अनिता करवाल देखील यावेळी उपस्थित होत्या. 
  • कोविड-19 च्या प्रतिकारासाठी देशात विकसित करण्यात येत असलेल्या लसी, जलद चाचणी आणि RT-PCR निदान किट्सच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य आणि कुटुंबकल्याण तसेच भूविज्ञान मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यामध्ये   जैवतंत्रज्ञान विभाग, आणि त्याच्या स्वायत्त संस्था तसेच BIRAC आणि BIBCOL हे सार्वजनिक उपक्रम(PSU) यांनी या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.
  • पहिल्या आभासी पीटर्सबर्ग हवामान संवादामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, "आज ज्याप्रमाणे संपूर्ण जग एकत्रितपणे नवीन कोरोना विषाणू साठी लस शोधण्यामध्ये व्यस्त आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे खुले स्रोत म्हणून पर्यावरण तंत्रज्ञान असले पाहिजे जे परवडणार्‍या किंमतीवर उपलब्ध असावे ज्याची जगाला गरज आहे”.

महाराष्ट्र अपडेट्स

  • 728 नव्या केसेससह महाराष्ट्रातील कोविड-19 रुग्णसंख्या 9,318 झाली आहे. राज्यात 369 मृत्यू झाले आहेत आणि 1,388 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 70 बसेस रवाना केल्या आहेत. हे विद्यार्थी आयआयटी तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कोटा येथे राहत होते.
  • राज्यात कोरोना  रुग्ण आढळून येत असलेल्या मालेगाव शहराला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सायंकाळी भेट दिली. उपचार करणारी यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेसोबत त्यांनी चर्चा करून कोरोनामुक्तीसाठी 'मिशन मालेगाव' यशस्वी करण्याचा निर्धार केला.

DJM/RT/MC/SP/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619355) Visitor Counter : 220