Posted On:
29 APR 2020 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2020
कोविड-19 साथीच्या रोगाच्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने आणि एकत्रितपणे उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या देशभरातील सभासदांशी संवाद साधला. या क्लबने PM CARES फंडासाठी 9.1कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल तसेच विविध मुख्यमंत्री मदत निधीसाठी 12.5 कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल डॉ हर्षवर्धन यांनी त्यांचे आभार मानले.कोट्यावधी लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात, वैद्यकीय साधने आणि संरक्षक उपकरणे देण्यातही लायन्स क्लब देत असलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि समर्पित कोविडयोद्धे, हितसंबंधीय अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोविड-19 च्या लढ्यात विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या सचिव प्रीती सुदान, यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून चर्चा केली. कोविड-19 चे व्यवस्थापन आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि इतर संबंधित विषयांबाबत त्यांनी माहिती घेतली. GIS डॅशबोर्ड,कोविड-19 पोर्टल आणि RT-PCR संदर्भातील अॅप यांच्या कामाविषयी यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सर्व राज्यांनी आरोग्य सेतू अॅपची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी, कारण या अॅपमुळे लोकांना कोविडच्या धोक्याबाबत स्वयंमूल्यांकन करता येते, आणि त्याचा प्रतिबंध करण्यात सरकारला मदत मिळेल, असे सुदान यांनी सांगितले.
बिगर-कोविड आजारांसाठीच्या आवश्यक वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, यावरही आरोग्यसचिवांनी भर दिला. डायलीसीस, कर्करोग उपचार, गर्भवती महिला, हृदयरोगी अशा गंभीर आजारांच रुग्ण किंवा तातडीची वैद्यकीय सेवा आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची योग्य ती वैद्यकीय काळजी घेतली जावी, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जनतेच्या आसपास असलेल्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु राहतील, याची राज्यांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
कोविड-19 च्या व्यवस्थापनाविषयी बोलताना आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गवा म्हणाले की रुग्णांच्या नमुन्यांचे संकलन आणि त्यानुसार फॉर्म भरणे ही कामे अत्यंत जबाबदारी आणि चिकाटीने करणे आवश्यक आहे. RT-PCR चाचण्यांविषयक अॅप आता सुरु झाले असून त्याचा त्वरित वापर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्यांना देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशात 7695 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 24.5%. इतका आहे. तसेच, देशभरात सध्या कोविडचे एकूण 31,332 रुग्ण आहेत.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in वापरावा.
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com