आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात क्षयरोग रुग्णांची काळजी विनाअडथळा घेण्याची आरोग्य मंत्रालयाची राज्य/केंद्रशासित प्रदेशांना सूचना
Posted On:
24 APR 2020 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2020
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून, कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत, (एनटीईपी) जनहितार्थ सर्व सुविधा सुरु राहतील तसेच या रुग्णांचे विनाअडथळा निदान आणि काळजी घेण्यात येत आहे याची खात्री करून घ्यायला सांगितले आहे.
सर्वसमावेशक निर्देशांमध्ये नव्याने निदान झालेल्या किंवा सध्या उपचार सुरु असलेल्या अशा सर्व क्षयरोग रुग्णांना एक महिन्याचे औषध एकाचवेळी देण्याचे सांगितले आहे. यात औषध-प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांसह सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील क्षयरोगाच्या रुग्णांचा समावेश आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी याची खात्री करुन घ्यावी की, ओळखपत्र असलेल्या किंवा नसलेल्या रूग्णांना उपचारांसाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून त्यांना त्यांच्या सोयीनुसार आरोग्य सुविधा केंद्रांवर औषधे मिळतील.
पुढे, निर्देशांमध्ये असेही म्हटले आहे की, क्षयरोगाचा रुग्ण आरोग्य सुविधा केंद्रामध्ये जाण्यास असमर्थ असला तर जिथे शक्य आहे तिथे औषधे रुग्णाला घरपोच पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. कोविड-19 साथीचा आजार आणि लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा विचार करून मंत्रालयाने पुरेशा प्रमाणात औषधांची खरेदी केली असून औषधांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध आहे.
क्षयरोग निदान आणि उपचार सेवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे कार्यरत आहेत. क्षयरोगाच्या रुग्णांना कोविड-19 पासून स्वतःचे रक्षण करण्याचे आणि त्यांचे क्षयरोगावरील उपचार चालू ठेवावे याविषयी सल्ले देण्यात येत आहेत. कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात रुग्ण आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोत्तम प्राधान्य दिले जात आहे. त्याशिवाय सर्व रूग्णांना यासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास त्यांना क्षयरोग टोल फ्री क्रमांक (1800-11-6666) यावर संपर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“न्यूज एंड हायलाईट” या सदरांतर्गत (www.tbcindia.gov.in) संकेतस्थळावर निर्देश/सल्ले अपलोड केले आहेत.
B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617911)
Visitor Counter : 272
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam