आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

Posted On: 24 APR 2020 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने, श्रेणीबद्ध आणि प्रगतीशील उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी संवाद साधला. लॉकडाऊन संबंधित नियमावली आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे अनुभव आणि प्रयत्नांची माहिती सरपंचांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितली. आपल्याला संकटकाळीच खरा धडा मिळतो आणि आजच्या परिस्थितीने आपल्याला दिलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आपण स्वयंपूर्ण होण्याची गरज! असे पंतप्रधान म्हणाले. ग्रामपंचायतीनी त्यांच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत कराव्यात आणि कोरोनासाठी "आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

कोविड-19 च्या व्यवस्थापनाबाबत केलेली कारवाई तसेच सज्जतेविषयी, आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून संवाद साधला. आतापर्यंत राज्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी सर्व राज्यांचे आभार मानले. तसेच, ज्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे, रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी कमी आहे आणि जिथे मृत्यूदर अधिक आहे, अशा जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. 

सर्व राज्यांनी निरीक्षण, घरोघरी जाऊन कोविडचे रुग्ण आहेत का याची तपासणी, रुग्णांचे लवकर निदान, रुग्णांवर योग्य उपचार आणि योग्य वैद्यकीय व्यवस्थापन या सगळ्यावर भर द्यावा आणि मृत्यूदर कमी करावा, अशी विनंती डॉ हर्षवर्धन यांनी राज्यांना केली. कोविडबाबत असलेला अवाजवी भयगंड आणि डॉक्टरांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक अशा सर्व बाबी थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी स्वतः लक्ष द्यावे असेही त्यांनी म्हंटले आहे.  त्याआधी, डॉ हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत देखील सहभाग घेतला. यावेळी कोविड विरुद्धच्या लढाईतील भारताच्या आजवरच्या प्रयत्नांची माहिती दिली. भारताचा कोविड व्यवस्थापनाचा लढा सामुदाय सहभाग  आणि कंटेनमेंट चे प्रयत्न या दोन तत्वांवर चालतो आहे, असे त्यांनी सांगितले. 

आजपर्यंत देशात गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांमध्ये आणखी तीन जिल्ह्यांची भर पडली असून आता असे एकूण 15 जिल्हे झालेले आहेत. या यादीत भर पडलेल्या जिल्ह्यांची नावे: दुर्ग आणि राजनांदगांव छत्तीसगड आणि शिवपुरी जिल्हा, मध्यप्रदेश. आणखी, 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील, ज्या जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत नवे रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांची संख्या आता 80 झाली आहे.

@CovidIndiaSeva या ट्वीटर हैडल वरुन देखील कोविड19 विषयक अद्ययावत माहिती आणि इतर संबंधित सार्वजनिक माहिती उपलब्ध आहे, तसेच यावर जनतेच्या प्रश्नांना तज्ञांकडून उत्तरे देखील मिळू शकतात.

आतापर्यंत देशात कोरोनाचे 4,748रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर  20.57 टक्के इतका झाला आहे. कालपासून देशात नव्या 1684 रुग्णांची नोंद झाली.आतापर्यंत देशभरातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या 23,077 इतकी झाली आहे, तर 718 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1617904) Visitor Counter : 206