शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च प्राथमिक वर्गातील मुलांसाठी आज नवी दिल्ली इथे जारी केले पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्राथमिक वर्गातील मुलांसाठी 16 एप्रिल 2020 रोजी जारी केले पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक

Posted On: 23 APR 2020 6:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 एप्रिल 2020

 

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालक आणि शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमांद्वारे योग्य तऱ्हेने घरीच गुंतवून ठेवण्यासाठी  प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील (इयत्ता सहावी ते आठवी) विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक विकसित केले आहे. उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बनविलेले हे पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत जारी करण्यात आले. प्राथमिक टप्प्यासाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी 16 एप्रिल 2020 रोजी जारी केले होते.

तंत्रज्ञान कौशल्य आणि समाज माध्यमांचे मनोरंजक पद्धतीने ज्ञान देण्यासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी शिक्षकांना या पर्यायी वेळापत्रकाद्वारे मार्गदर्शन मिळणार आहे आणि शिक्षक, पालक, विद्यार्थी घरबसल्या याचा वापर करू शकतात असे निशंक यांनी सांगितले. मोबाईल, रेडिओ, दूरदर्शन, एसएमएस आणि विविध समाज माध्यमांचा याकामी कसा उपयोग करता येईल याचा विचार करून हे वेळापत्रक बनविले आहे. ते म्हणाले की ही वस्तुस्थिती आहे की आपल्यापैकी बर्‍याचजणांच्या मोबाइलमध्ये इंटरनेट सुविधा असू शकत नाही किंवा व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, गूगल इत्यादी समाज माध्यमांची विविध साधने कशी वापरायची ते माहिती नसते. मात्र हे वेळापत्रक या साधनांच्या वापराबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करेल जे नंतर पालक आणि विद्यार्थ्यांना मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे किंवा व्हॉईस कॉलद्वारे मार्गदर्शन करतील. पालकांनी प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक लागू करण्यात मदत करण्याची अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.

लवकरच उर्वरित सर्व वर्ग अर्थात नववी ते बारावी आणि त्यांचे विषय भाग या वेळापत्रकांतर्गत येतील असेही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सांगितले. हे वेळापत्रक दिव्यांग मुलांसह सर्व मुलांची आवश्यकता पूर्ण करेल (विशेष गरजा असणारी मुले) - ऑडिओ पुस्तके, रेडिओ कार्यक्रम आणि व्हिडिओ कार्यक्रमांचा यात समावेश केला जाईल.

अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकातून घेण्यात आलेल्या संकल्पना / धड्याच्या संदर्भात या वेळापत्रकात  मनोरंजक आणि आव्हानात्मक गोष्टी अंतर्भूत असतील आणि या वेळापत्रकात प्रत्येक आठवड्यानुसार  अभ्यासक्रम बनविण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात शिकलेल्या गोष्टी आणि संकल्पनांचे मापन केले जाते. हे मोजमापन करण्याचा हेतू म्हणजे शिक्षक / पालकांना मुलांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करता यावे आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाणे सुलभ व्हावे हा आहे. शिक्षणाच्या फलितावर आधारित या वेळापत्रकाची मांडणी केली असल्यामुळे मुले त्यांच्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पाठ्यपुस्तकांचा वापर करीत कोणत्याही संसाधनातून ते साध्य करू शकतात.

यामध्ये कला शिक्षण, शारीरिक व्यायाम, योग, पूर्व-व्यावसायिक कौशल्ये इत्यादी अनुभवात्मक शिक्षण उपक्रम देखील समाविष्ट आहेत. या वेळापत्रकात सारणी स्वरूपात वर्गनिहाय आणि विषयवार अभ्यासक्रमाची मांडणी केली आहे. या वेळापत्रकात हिंदी इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत या चार भाषांशी संबंधित अभ्यासक्रम समाविष्ट आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमधील ताणतणाव आणि चिंता कमी करण्यासाठीच्या धोरण निश्चितीलाही हे वेळापत्रक मदत करते. या वेळापत्रकात भारत सरकारच्या ई-पाठशाला, एनआरओईआर आणि डीआयडीएचएसए पोर्टलवर उपलब्ध अध्यायनिहाय ई-सामग्रीचा दुवा समाविष्ट आहे.

वेळापत्रकात दिलेले सर्व अभ्यासक्रम हे त्याच प्रकारे किंवा त्याच क्रमाने घेणे अनिवार्य नाही. शिक्षक आणि पालक यातील उपक्रम वेगळ्या मांडणीने, मुलांना ज्यात अधिक स्वारस्य आहे त्या अनुषंगाने ते अधिक आकर्षक पद्धतीने घेऊ शकतात.

स्वयं प्रभा (किशोर मंच) (विनामूल्य डीटीएच चॅनेल 128, डिश टीव्ही चॅनेल # 950, सन डायरेक्ट # 793, जिओ टीव्ही, टाटास्काय # 756, एअरटेल चॅनेल # 440, व्हिडिओकॉन चॅनेल # 477) यासारख्या उपलब्ध टीव्ही चॅनेलद्वारे एनसीईआरटीने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी थेट परस्परसंवादी सत्रे सुरू केली आहेत.

किशोर मंच ऍप (प्ले स्टोअर वरून) आणि यूट्यूब थेट (एनसीईआरटी अधिकृत चॅनेल)  डाउनलोड करता येतो. दररोज - सोमवार ते शनिवार ही सत्रे प्राथमिक वर्गासाठी सकाळी 11:00 ते दुपारी 1   वाजेपर्यंत आणि उच्च प्राथमिक वर्गांसाठी दुपारी 2:00 ते संध्याकाळी 4:00 या वेळेत प्रसारित केली जात आहेत. या थेट सत्रामध्ये दर्शकांशी संवाद साधण्याबरोबरच विषयांच्या अध्यापनासह अन्य उपक्रमांवर भर दिला जातो. एससीईआरटी / एसआयई, शिक्षण संचालनालय, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती, सीबीएसई, राज्य शाळा शिक्षण मंडळे इत्यादींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे वेळापत्रक प्रसारित केले जाईल.

हे वेळापत्रक आमच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि पालकांना ऑनलाईन शिक्षण- संसाधनांचा वापर करुन कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात घरबसल्या अध्यापन करून त्यांची शैक्षणिक कौशल्ये विकसित करण्यास हातभार लावेल.

 

उच्च प्राथमिक वर्गासाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक इंग्रजीमधून बघण्यासाठी इथे क्लिक करा.

 

उच्च प्राथमिक वर्गासाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक हिंदीमधून बघण्यासाठी इथे क्लिक करा.

*****

B.Gokhale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1617521) Visitor Counter : 460