आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जी-20 राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठीच्या प्रयत्नांवर सखोल चर्चा

Posted On: 19 APR 2020 11:46PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2020

 

जी-20 राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सौदी अरेबिया येथे झाली. या बैठकीत डॉ हर्षवर्धन यांनी सर्व राष्ट्रांच्या एकत्रित आणि परस्पर सामंजस्य व सहकार्य यातूनच कोविड-19 चा लढा दिला जाऊ शकेल, या मुद्यावर प्रामुख्याने भर दिला. 19 सदस्य देशांच्या या परिषदेत अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रांस, इंडोनेशिया, इटली, जापान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, इंग्लंड, अमेरिका आणि भारत हे सदस्य देश आहेत. 

सर्व देशांनी ज्या पद्धतीने कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे डॉ हर्षवर्धन यांनी बैठकीच्या सुरुवातीला म्हटले. आज एका जागतिक संकटाचा आपण सामना करतो आहोत, त्याचवेळी, ज्या निसर्गाने आपल्या सगळ्यांना जोडले आहे, त्या निसर्गाकडे परत जाण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, त्याचसोबत, या संकटातून बाहेर पडण्यासाठी एकत्रित ताकद आणि शहाणपण याची सर्वाधिक गरज आहे” असे डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले. याआधीही आपण, आपल्या जनतेच्या आरोग्यावर आलेली संकटे परतवून लावली आहेत, एकत्रित जबाबदारीची जाणीव ठेवत, एकमेकांना मदत केली आहे. आज कोविड-19 च्या संकटाशी लढा देतांनाही त्याच सामंजस्य आणि परस्पर विश्वासाची आम्हाला अपेक्षा आहे. जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियासारखे देश ही परिस्थिती हाताळण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले असले, तरी इतर देश मात्र अद्याप गंभीर  लढा देत आहेत. या आजाराचा जगावर झालेला परिणाम अभूतपूर्व आहे, त्यामुळेच यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य अनिवार्य आहे.”असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  

कोविड-19 च्या भारतातील स्थितीविषयी माहिती देतांना ते म्हणाले, ”आज, म्हणजेच 19 एप्रिलला भारतात लॉकडाऊनचे 25 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आम्ही 3 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवला आहे. या लॉकडाऊन मुळेच कोरोनाच्या संक्रमणाला आळा बसला असून 17 एप्रिलला संसर्गित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 3.4 दिवस इतका होता, जो आता 7.2 दिवसांपर्यंत कमी झाला आहे.”

भारताने कोविड-19 चे संकट हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना ते म्हणाले- की आम्ही पाच स्तरीय उपाय केले आहेत. 1) परिस्थितीबाबत सतत जागृत आणि तत्पर राहणे, 2) लढ्याची पूर्वतयारी आणि संरक्षणाचा दृष्टीकोन, 3) सतत बदलत जाणाऱ्या परिस्थितीनुसार बदलत जाणारा प्रतिसाद, 4) प्रत्येक पातळीवर आंतर-विभागीय समन्वय आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे 5) हा लढा लढण्यासाठी जनचळवळ उभी करणे.”

भारताने हा लढा लढण्यासाठी अंगिकारलेल्या धोरणाविषयी त्यांनी माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 ही हा जागतिक स्तरावरील संसर्गजन्य आजार असल्याचे जाहीर करण्याच्या बरेच आधी भारताने आंतरराष्ट्रीय आरोग्य नियामकांच्या अनुसार, या आजारावर प्रतिबंध घालण्याचे उपाय सुरु केले. 30 जानेवारीला भारतात कोविडचा पहिला रुग्ण आढळला, मात्र त्याच्या 12 दिवस आधीपासून कोविड संसर्ग असलेल्या देशांमधून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानांमधील प्रवाशांची तपासणी सुरु केली होती. 22 मार्चला, जेव्हा भारतात 400 पेक्षा कमी रुग्ण होते, तेव्हाच आम्ही सगळ्या आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घातली आणि 25 मार्च 2020 ला देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला” असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

हा आजार रोखण्यासाठी भारताच्या असलेल्या क्षमतेविषयी बोलतांना ते म्हणाले, “भारताने याआधीही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सार्वजनिक आरोग्याच्या समस्या आणि महामारीचा यशस्वीपणे सामना केला आहे.”  भारताकडे आंतरराष्ट्रीय आरोग्य नियामकांच्या अनुसार, सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन यंत्रणा हाताळण्याची क्षमता आहे.  एकात्मिक आजार निरीक्षण कार्यक्रम, (IDSP),  ही संसर्गजन्य आजारांच्या प्रसाराकडे बारकाईने लक्ष ठेवणारी देशव्यापी यंत्रणा भारताकडे असून त्याचा उपयोग कोविडच्या संकटाचा सामना करताना होत आहे.” असेही त्यांनी सांगितले.

कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांची व्यवस्था आणि व्यवस्थापण वेगळे करण्याचा निर्णय भारताने जाणीवपूर्वक घेतला आहे, जेणेकरून, कोविड आणि इतर आजारांचे रुग्ण परस्परांच्या संपर्कात येऊ नयेत. ज्या सर्व लोकांना कोविडचा संसर्ग होतो, त्यांच्यावर त्यांच्या लक्षणांनुसार, तीन प्रकारच्या रुग्णालयात उपचार केले जातात. सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड केअर सेन्टर्स, मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्यांसाठी कोविड हेल्थ सेन्टर्स आणि गंभीर रुग्णांसाठी कोविड समर्पित रुग्णालये अशी त्रिस्तरीय रचना आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सध्या कोविडवर कुठलेही एक औषध किंवा लस नाही, त्यामुळे भारताने अवैद्यकीय उपचारांवर भर दिला आहे. शारिरीक अंतर राखणे आणि स्वच्छता तसेच श्वसनाच्या आजारांविषयीची दक्षता याकडे लक्ष देण्यात येत आहे. कोविड-19 च्या लसीबद्दल बोलतांना ते म्हणाले, की एकीकडे पारंपारिक साधने वापरुन संक्रमण साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरु असतांनाच, आमचे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स युद्धपातळीवर या आजारावर लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच,रुग्णांची माहिती आणि इतर उपाययोजना करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 

वसुधैव कुटुंबकम”- या भारताच्या पारंपरिक तत्वाचा उल्लेख करतांना, डॉ हर्षवर्धन म्हणाले, ह्या जागतिक आजाराचा प्रादुर्भाव सुरु झाल्याबरोबर एक जबाबदार नेतृत्व स्वीकारत भारताने शेजारी राष्ट्रांना विविध प्रकारे मदत केली आहे. वूहान, डायमंड प्रिन्सेस क्रुझ शिप, इथे अडकेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणले. त्याशिवाय विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांची देखील सुटका केली. तसेच हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा अनेक देशांना पुरवठा केला असेही त्यांनी सांगितले. 

शेवटी, जागतिक आरोग्य अजेंड्याला भारताचा पूर्ण पाठींबा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

U.Ujgare/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1616296) Visitor Counter : 377