आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती

Posted On: 11 APR 2020 8:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

भारत सरकारने देशात कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत.त्यावर अतिशय उच्च स्तरावरून देखरेख केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्वांनी कोविड-19 च्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार  व्यक्त केला.

भारत सरकार कोविड-19 च्या विरोधात संघर्ष करण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत असून नियोजनबद्ध पद्धतीने या आपत्तीला तोंड देत आहे. पीपीई( वैयक्तिक वैद्यकीय संरक्षक पोशाख), एन95 मास्क, टेस्टिंग किट्स, औषधे आणि व्हेंटिलेटर्स यांचा देशभरात कोणत्याही राज्यात तुटवडा भासू नये याची काळजी घेतली जात आहे. कोविड-19 रुग्णांची योग्य काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर पूर्णपणे कोविड19 वर उपचार करणारी समर्पित रुग्णालये जलदगतीने स्थापन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळीवरील या रुग्णालयांची संख्या पुढीलप्रमाणे:

  • डेडिकेटेड कोविड सुविधा केंद्रांची संख्या: 586
  • विलगीकरण खाटा: 1,04, 613
  • आयसीयू खाटा: 11, 836

आघाडीवर राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयाकडून कोविड-19 रुग्णांवरील उपचारांसंदर्भात वेबिनारच्या मालिकांचे आयोजन करण्यात येत आहे. या वेबिनारचे वेळापत्रक सातत्याने https://www.mohfw.gov.in. यावर अद्ययावत  करण्यात येत आहे.

तसेच आयुष मंत्रालयाने श्वसनसंस्थेचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक्षमतेत वाढ करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत आणि त्यांचा समावेश देशभरात विषाणू प्रतिबंधासंदर्भात जिल्ह्यांच्या आकस्मिक योजनांमध्ये करावा, असे प्रस्तावित केले आहे. ही मार्गदर्शक तत्वे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

कोविड-19 चा सामना करण्यासाठी अनेक जिल्ह्यांकडून नावीन्यपूर्ण उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे.

कोविड-19 चा संसर्ग झालेला सर्वात पहिला समूह ज्या ठिकाणी आढळला त्या आग्रा येथे समूह प्रतिबंध धोरणाचा अवलंब करण्यात आला. राज्य, जिल्हा प्रशासन आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या स्मार्ट सिटीच्या कंमाड आणि कंट्रोल रुमचे रुपांतर वॉर रुममध्ये करून परस्परांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय राखला. समूह प्रतिबंध आणि प्रादुर्भाव प्रतिबंध योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने उद्रेकाची केंद्रे निश्चित केली, पॉझिटिव्ह पुष्टी झालेल्या प्रकरणांची स्थाने नकाशावर आरेखित केली आणि जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या सूक्ष्म योजनेनुसार त्या ठिकाणी कृती दले तैनात केली.

अतिशय सक्रिय सर्वेक्षण आणि प्रतिबंध योजनेच्या माध्यमातून हॉट स्पॉट्सचे व्यवस्थापन करण्यात आले. उद्रेक केंद्रापासूनच्या तीन किलोमीटरच्या त्रिज्येच्या आतील भाग निर्धारित करण्यात आला तर पाच किलोमीटरचा बफर झोन प्रतिबंध क्षेत्र म्हणून निर्धारित करण्यात आला. या प्रतिबंध क्षेत्रात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा वापर करण्यात आला आणि 1248 पथके तैनात करण्यात आली. प्रत्येक पथकामध्ये एएनएम/ आशा/एडब्लूडब्लू सह दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. घरोघरी तपासणीच्या माध्यमातून 9.3 लाख लोकांपर्यंत ही पथके पोहोचली. त्या व्यतिरिक्त पहिल्या संपर्काचा अतिशय प्रभावी पद्धतीने त्वरेने माग काढण्यात आला. याशिवाय सक्रिय सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून विलगीकरण, चाचण्या आणि स्थायी उपचार केंद्रांची उभारणी करण्यावर भर देण्यात आला. त्यासोबतच गरजू लोकांना अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राखण्यावर आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यावर लक्ष ठेवण्यात आले. नागरिकांना घरपोच वस्तू पुरवण्यात आल्या आणि ई-पास सुविधेमुळे अत्यावश्यक सामग्री आणि सेवांची वाहतूक सुरळीत राहिली.  हे सर्व करत असतानाच नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांच्या सातत्याने संपर्कात राहण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला. लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी केंद्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आणि समन्वयीत प्रतिसादासाठी बहुकार्यकुशल पथके स्थापन करण्यात आली.

आग्र्याने अवलंब केलेल्या या समूह प्रतिबंध धोरणाची माहिती एक सर्वोत्तम उपाय म्हणून इतर राज्यांनाही दिली जात आहे.

कालपासून भारतात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये 1035 रुग्णांची भर पडली आहे आणि त्यामध्ये 855 सक्रिय प्रकरणे आहेत. आजपर्यंत 239 मृत्यू झाले आहेत आणि 642 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. देशात आतापर्यंत पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 7447 झाली आहे.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.mohfw.gov.in/.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवता येतील.

कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री). राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.

*****

G.Chippalkatti/S.Patil/P.Kor


(Release ID: 1613440) Visitor Counter : 165