श्रम आणि रोजगार मंत्रालय

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत भविष्यनिर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेच्या (EPS) सभासदांच्या खात्यात  निधी ऑनलाईन जमा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू

Posted On: 11 APR 2020 5:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (EPFO), या केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या वैधानिक संस्थेने सभासदांच्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (EPF) तसेच कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) यात ऑनलाईन पद्धतीने निधी जमा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. कोरोना प्रकोपाशी लढा देताना गरीबांना मदतीचा हात म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 26.3.2020 ला जाहीर केलेल्या अनुदान योजनेनुसार ही मदत देण्यात येत आहे.

यानुसार पात्र उपक्रम/संस्था ईलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न (ECR) भरून  सरकारने जाहीर केलेली ही मदत घेऊ शकतील. जिथे एकूण 100 पर्यंत कर्मचारी असून 90% पेक्षा जास्त कर्मचारी रू 15000/- पेक्षा कमी मासिक मिळकत असणारे आहेत अशा उपक्रम वा संस्था आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने EPF आणि EPS (24% वेतन) च्या ECR मध्ये जमा होणारा हा निधी ECR मध्ये दर्शविण्यात येईल. ज्यांची मासिक मिळकत रु 15000/- पेक्षा कमी असून, भविष्यनिर्वाह निधीत अंशदान देणाऱ्या तसेच जे EPF च्या नियमाखाली येणाऱ्या उपक्रम वा कारखान्यात आधीपासून  कार्यरत आहेत अशा सभासदांच्या UAN  मध्ये केंद्र सरकारतर्फे तीन महिने अंशदान जमा होईल.  साधारणपणे 79 लाख सभासद आणि 3.8 लाख उपक्रमांना या योजनेचा लाभ मिळेल. या अनुदान योजनेवर तीन महिन्यात 4800 कोटी रुपये खर्च होईल असा अंदाज आहे. कोरोना विषाणू महामारी विरोधात लढा देताना गरिबांना मदतीचा हात म्हणून केंद्र सरकारने 26.3.2020 रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली. कमी उत्पन्न गटातील EPF सभासदांच्या  नोकरीवर गदा येऊ नये तसंच EPF योजना लागू असणाऱ्या उपक्रम वा संस्थांना आर्थिक पाठबळ मिळावं हा  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमागचा हेतू आहे.

ही योजना कार्यान्वित करण्यासाठी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने मदत मिळवण्यासाठी योजनेचा उद्देश, पात्रता निकष, कालावधी, कृती आणि पद्धत जाहीर केली आहे.

योजनेसाठी पात्र उपक्रमांच्या सभासदांनी या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी  इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न (ईसीआर) फाईल करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असलेल्या उपक्रमांच्या अखत्यारीतील  सेवा-नियोक्त्यांनी उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या मासिक वेतनाचे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न इतर आवश्यक प्रमाणपत्रांसहित सादर करणे आवश्यक आहे. ईसीआर अपलोड केल्यानंतर तसेच उपक्रम आणि कर्मचारी यांची माहिती पडताळणीनंतर  केंद्र सरकारी अनुदानपात्र कर्मचारी तसेच उपक्रमाच्या अंशदानाची रक्कम दाखवणारे चलान मिळेल.

उपक्रमाने  त्यांच्याकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून जाणाऱ्या आणि  या चलानमध्ये दिसत असणाऱ्याअंशदानाच्या रकमेची पुष्टी केल्यानंतर ही रक्कम पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारतर्फे थेट जमा होईल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या संकेतस्थळाच्या होम पेजवर कोविड-19 या नावाखाली या योजनेची अधिक माहिती आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न , त्यांची उत्तरे तसेच या योजनेचे इतर पैलू  बघता येतील.

 

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor


(Release ID: 1613335) Visitor Counter : 311