पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसोबत दूरध्वनीवरून साधला संवाद

Posted On: 10 APR 2020 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला.

उभय नेत्यांनी यावेळी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आणीबाणीवर आणि दोन्ही देशातील आणि प्रदेशातील नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांवर आपली मते व्यक्त केली. या साथीच्या रोगाची परिस्थिती हाताळण्यासाठी दोन्ही देशांनी आपापल्या देशात अवलंबलेल्या उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान ओली यांच्या नेतृत्वात नेपाळ सरकारने घेतलेल्या प्रतिक्रियेची आणि व्यवस्थापनाची आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी नेपाळमधील लोकांच्या दृढ संकल्पांचे कौतुक केले.

सार्क देशांमधील साथीच्या रोगाचा प्रतिसाद समन्वयित करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराचे पंतप्रधान ओली यांनी पुन्हा कौतुक केले. भारताने नेपाळला दिलेल्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल देखील ओली यांनी आभार मानले.

या जागतिक महामारी विरुद्ध लढा देण्यासाठी नेपाळच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य आणि पाठबळ देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या सर्व मुद्यांवर तसेच जीवनावश्यक वस्तूंचा सीमापार पुरवठा सुलभ करण्यासाठी दोन्ही देशातील तज्ञआणि अधिकारी एकमेकांशी बारकाईने विचारविनिमय करून समन्वय साधतील यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पंतप्रधान ओली आणि नेपाळच्या नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane

 (Release ID: 1612978) Visitor Counter : 152