मनुष्यबळ विकास मंत्रालय

कोविड-19 च्या लॉक डाऊन काळात डिजिटल अध्ययनाच्या प्रमाणात मोठी वाढ

Posted On: 09 APR 2020 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

 

कोविड-19 लॉक डाऊनचे परिणाम सौम्य करताना विद्यार्थ्यांना यादरम्यान शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे प्रयत्न चालू आहेत. गेल्या दोन आठवड्यात ई-लर्निंग करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्कात आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन आणि निर्देश देत असून सूचनांचा पाठपुरावाही करत आहेत.

शाळा व उच्च शिक्षण संस्थांनी ऑनलाइन पाठ घेण्यासाठी तसेच शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत यासाठी स्काइप, झूम, गूगल क्लासरूम, गुगल हँग आउट, पियाझा  इत्यादी व्यावसायिक सेवांचा उपयोग केला जात असून, ते शक्य नसल्यास युट्युब, व्हाट्सऍप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत रेकॉर्ड केलेले पाठ पोचवले जात आहेत. याशिवाय स्वयम ( SWAYAM) तसेच NPTEL  सारख्या डिजिटल व्यासपीठाच्या लिंक शेअर करुन ऑनलाईन अभ्यास पुस्तकांशी विद्यार्थ्यांना जोडले जात आहे.

IIT, IIIT, NIT, IISER   तसेच केंद्रीय विद्यापीठांचे 50 ते 65 टक्के विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या ई-लर्निंग व्यासपीठाचा उपयोग करत आहेत. काही ठिकाणी इंटरनेट सेवा नसल्यामुळे किंवा इंटरनेट चालवण्याची साधने उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या अडचणींवर तोडगा म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना रेकॉर्ड केलेले पाठ, स्लाईड्स किंवा हस्तलिखित नोट्स पाठवून त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. पाठ रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना पाठवल्यामुळे इंटरनेटच्या अनिश्चितपणे चालणाऱ्या सेवेचा परिणाम थोडाफार सौम्य होतो. विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी शिक्षक ऑनलाईन चॅट सेशन्स करत आहेत.  23 मार्च 2020 पासून मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ई-लर्निंग व्यासपीठांवर एक कोटी चाळीस लाखांहून जास्त वेळा विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आलं आहे. स्वयम या राष्ट्रीय स्तरावरच्या ऑनलाइन शिक्षण व्यासपीठावर कालपर्यंत 2,50,000 वेळा हजेरी लावली गेली असून मार्चच्या शेवटच्या आठवड्यातल्या लागलेल्या पन्नास हजाराच्या हजेरी पेक्षा हा आकडा पाच पटीने मोठा आहे. याशिवाय स्वयम वर चालणाऱ्या 574 शिक्षण क्रमांमध्ये नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 26 लाख आहे. स्वयंप्रभा या डीटीएच वाहिनीवर शैक्षणिक चित्रफिती पाहणाऱ्यांची संख्या दर दिवसाला 59 हजार इतकी असून लॉक डाऊन सुरू झाल्यापासून 6 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी या वाहिनीचा लाभ घेतला आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांनी दिलेल्या डिजिटल सेवांचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येतही अशीच वाढ झाली आहे. कालच्या एकाच दिवसात राष्ट्रीय डिजिटल वाचनालयाच्या संकेतस्थळावर 1 लाख 60 हजार 804 वेळा भेट दिली गेली होती. आणि  लॉक डाऊन च्या संपूर्ण काळात 14 लाख 51 हजार 886 वेळा भेट दिली गेली. या आधी हे प्रमाण दिवसाला 22000 इतकेच होते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच एनसीईआरटीची दीक्षा( DIKSHA),  इ-पाठशाला, खुल्या शैक्षणिक स्त्रोतांची राष्ट्रीय संचयिका ( National Repository of Open Educational Resources),  राष्ट्रीय मुक्त पाठशाळा (NIOS) , NPTEL, NEAT यांचे उच्च माध्यमिक अभ्यासक्रम, AICTE चे विद्यार्थी - महाविद्यालय हेल्पलाइन वेबपोर्टल,  AICTE प्रशिक्षण आणि अध्ययन (ATAL), MOOCS अभ्यासक्रम, IGNOU अभ्यासक्रम, शोधगंगा, शोध शुद्धी, VIDWAN, ई -पीजी पाठशाळा तसेच ICT चे रोबोटिक्स( e - yantra) अभ्यासक्रम, शैक्षणिक मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर (FOSSEE) , आभासी प्रयोगशाळा तसेच प्रोग्रामिंग शिकण्यासाठी असलेल्या अभ्यासक्रमांनाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची पसंती दिसून येत आहे.

ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट सेवा उपलब्ध नाही ,त्यांच्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे दूरदर्शन द्वारे शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोखरियाल निशंक यांनी सांगितले आहे.  'स्वयंप्रभा' अंतर्गत येणाऱ्या 32 डीटीएच वाहिन्यांच्या द्वारा उच्च गुणवत्तेचे शैक्षणिक कार्यक्रम 24 तास प्रसारित होत असल्याचे ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमांसाठी NPTEL, IIT, UGC, CEC, IGNOU, NCERT या संस्थांचे सहकार्य मिळाले आहे.   IGNOU ची 'ज्ञान वाणी' या एफएम रेडिओ (105.6 FM) वाहिनीवर तसेच 'ज्ञानदर्शन' या दूरदर्शन वाहिनीवर लहान मुलांपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, व्यवसाय मार्गदर्शन, तसेच गृहिणींसाठी आणि कार्यरत व्यावसायिकांसाठी दर्जेदार कार्यक्रम 24 तास प्रसारित करत असते.  विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणात भर टाकण्यासाठी या वाहिन्यांचा वापर करावा असे आवाहन पोखरियाल यांनी केले आहे.

 

 

U.Ujgare/U.Raikar/P.Malandkar

 

 

 

 

 

 (Release ID: 1612697) Visitor Counter : 170