रेल्वे मंत्रालय

कोविड -19: सुमारे 6 लाख फेस मास्क आणि 40 हजार लिटर हॅन्ड सॅनिटायझरची भारतीय रेल्वेकडून निर्मिती

Posted On: 09 APR 2020 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

 

कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने, भारतीय रेल्वे भारत सरकारच्या आरोग्य सेवा उपक्रमांना पूरक ठरतील असे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या दिशेने भारतीय रेल्वे सर्व परिमंडळे, उत्पादन विभाग आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रम  यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य फेस मास्क आणि सॅनिटायझर्सची निर्मिती करीत आहे.

भारतीय रेल्वेने सर्व परिमंडळे, उत्पादन विभाग आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रम यांच्यामार्फत 7 एप्रिल 2020 पर्यंत एकूण 582317 पुनर्वापर करता येणाऱ्या मास्कची तसेच 41882 लिटर हँड सॅनिटायझर्सची निर्मिती केली. काही रेल्वे परिमंडळांनी याकामी पुढाकार घेतला. उदा. पश्चिम रेल्वेने (डब्ल्यूआर) पुन्हा वापरण्यायोग्य 81,008 फेस मास्क आणि 2,569 लिटर हँड सॅनिटायझर, उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) 77,995 पुन्हा वापरण्यायोग्य फेस मास्क आणि 3,622 लिटर हँड सॅनिटायझर,उत्तर पश्चिम रेल्वेने 51,961 पुन्हा वापरण्यायोग्य फेस मास्क आणि 3,027लिटर हँड सॅनिटायझर, मध्य रेल्वेने (सीआर) 38,904 पुन्हा वापरण्यायोग्य फेस मास्क आणि 3,015 लिटर हँड सॅनिटायझर, पूर्व मध्य रेल्वेने (ईसीआर) 33,473 पुन्हा वापरण्यायोग्य फेस मास्क आणि 4,100 लिटर हँड सॅनिटायझर, आणि पश्चिम मध्य रेल्वेने (डब्ल्यूसीआर) 36,342 पुन्हा वापरण्यायोग्य फेस मास्क आणि 3,756 लिटर हँड सॅनिटायझर ची निर्मिती केली आहे.

अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी रेल्वेची मालवाहतूक सेवा आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरु आहे. त्यामुळे रेल्वे परिचालन आणि देखभाल कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सर्व कामाच्या ठिकाणी खालील गोष्टींची खात्री केली जात आहे.

  1. कामावर येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना काढ-घाल करता येईल असे फेस कव्हर आणि हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कंत्राटी कामगारांनाही या सुविधा पुरविल्या जात आहेत. रेल्वे कार्यशाळा, प्रशिक्षण आगार आणि रुग्णालये स्थानिक पुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर सॅनिटायझर्स आणि मास्कची निर्मिती करीत आहेत.
  2. आरोग्य चांगले राखण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा वापरता येणारे फेस कव्हर्स वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पुन्हा वापरता येणारे फेस कव्हर्सचे 2 संच देण्यात आले आहेत. हे फेस कव्हर्स दररोज साबणाने स्वच्छ धुण्याविषयी सर्व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जात आहे. या संबंधी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप सर्वाना करण्यात आले आहे.
  3. सर्व कामाच्या ठिकाणी साबण, पाणी आणि हात धुवायच्या सुविधांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. स्थानिकांच्या कल्पनेतून साकारलेली नळाला हात न लावता हात धुण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  4. सामाजिक अंतराचे नियम पाळले जात आहेत. यासंदर्भा रुळांवर काम करणारे कर्मचारी आणि मालवाहू गाडीचे चालक यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरु आहे.

 

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

 


(Release ID: 1612515) Visitor Counter : 269