वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोविडनंतरच्या काळामध्ये जबाबदार नागरिक म्हणून जागतिक पातळीवरच्या संभाव्य मोठ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी तयार राहण्याचे पीयूष गोयल यांचे निर्यातदारांना आवाहन

Posted On: 08 APR 2020 9:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने आज कोविड-19 आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या पृष्ठभूमीवर अगदी स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी काय करता येईल, याविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधितांशी संवाद साधण्यात आला. या बैठकीला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल, या खात्याचे राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान, परराष्ट्र व्यापार तसेच वाणिज्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर या खात्याच्यावतीने अशा प्रकारची आज घेतलेली ही तिसरी बैठक होती.

कोविड-19 साथ ओसरल्यानंतर निर्यातदारांना खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी आगामी काळाचा खूप मोठा, वेगळा विचार करावा आणि येणा-या संधीचा लाभ घेण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन पीयूष गोयल यांनी निर्यातदारांना यावेळी केले. आपण आपल्या गुणवत्ता, दर्जा  आणि यांच्यात सुधारणा करून कोविडनंतरच्या संभाव्य जगात निर्माण होणा-या मूल्यस्पर्धेत टिकून राहण्यासाठी क्षमता वाढवण्याची गरज आहे.  ‘‘ज्यावेळी आपण गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत केले तर उत्पादनाचा खर्च कमी कसा होईल, याकडे नक्कीच पाहणार आहे. आणि उत्पादकतेमध्येही सुधारणा होणार आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे.’’ एलईडी बल्बच्या वापराचा निर्णय, देशभरामध्ये शौचालय उपलब्ध करून देण्याचा निर्णय, तसेच सर्वांना वीज पुरवण्याचा निर्णय, सर्वांसाठी आरोग्य योजना, सरकारच्या या उपक्रमांची उदाहरणे देवून गोयल यांनी सरकार खूप मोठा विचार करीत असल्याचे सांगितले आणि अशा सर्व कल्पना प्रत्यक्षात आणत असल्याचेही स्पष्ट केले.

सध्याचा काळ अतिशय आव्हानात्मक आहे, तरीही सरकारने निर्यात मुक्त ठेवण्यास प्राधान्य दिले आहे, कारण आपली निर्यातीची बाजारपेठ कायम टिकून राहिली पाहिजे. निर्यातीचा माल कोणत्याही कारणांमुळे जर अडकून पडला असेल तर तो लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. निर्यातीचे पुनरूज्जीवन करण्यात यावे आणि निर्यात संधींचा विस्तार व्हावा, यासाठी मंत्रालय मोठ्या तडफेने, आक्रमकतेने काम करत आहे. निर्यात बाजारपेठेत भौगोलिक कारणे चिंतेचा विषय आहेत. ‘‘निर्यात आणि उत्पादन व्यवसायासाठी विचारांमध्ये बदल घडवून आणले तर यापेक्षा चांगला काळ असू शकणार नाही. आपल्या मूलभूत क्षमता आणि क्षेत्र यावर लक्ष केंद्रीत करून आपण ज्या क्षेत्रात सामर्थ्यशाली आहोत त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. काही क्षेत्रांचा विचार केला तर जागतिक स्तरावर आपला वाटा अतिशय कमी आहे. अशा क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे’’ असंही पीयूष गोयल यावेळी म्हणाले.

कोविडनंतरच्या जगामध्ये भारत चमकदार कामगिरी करू शकेल. तसेच भारताची लोकशाही पारदर्शक असल्यामुळे मानवी दृष्टीकोनाबरोबरच कायद्याचं राज्य इथं आहे. आपण जागतिक पातळीवर जबाबदार नागरिक आहोत आणि वैश्विक गरजा ओळखून आमच्या औषध क्षेत्राची उभारणी करण्यात येईल. हे संपूर्ण जग म्हणजे एक कुटुंब आहे, आपल्याकडे अनेक प्रकारची आणि मोठ्या प्रमाणावर औषध उत्पादने आहेत. त्यामुळे अधिक मोह न धरता आपण जगाला मदत  केली पाहिजे. या जगाची आपल्यावर जबाबदारी आहे, असा विश्वास बाळगून कृती करीत असलेल्या आपल्या पंतप्रधानांचा मला अभिमान वाटतो, असंही पीयूष गोयल यावेळी म्हणाले.

लोकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता आपल्याला अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रूळावर आणण्याची गरज आहे. कारण आपल्या सर्वांच आरोग्य चांगलं राहिलं तरच आपण इतर सर्व काही करू शकणार आहे. आय.टी. उद्योग क्षेत्राचे उदाहरण देवून मंत्री गोयल म्हणाले, निर्यातदारांनी सरकारी कुबड्यांचा आधार घेवू नये, विजेत्यांची मानसिकता वेगळी असते, ते आपल्याला दुस-या स्थानावर कधीच पाहू शकत नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर करून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांनी कोरोनाचे हॉटस्पॉट शोधण्यास मदत करणारे मोबाईल अॅप विकसित केले. आपल्या आय.टी तज्ञांनी विकसित केलेले आरोग्य सेतू अॅपचा वापर निर्यातदारांनी करावा. तसेच सर्वांनी अगदी मोठ्या मनाने पीएम केअर्स निधीमध्ये योगदान द्यावे असे आवाहनही गोयल यांनी केले.

या बैठकीला एफआयइओ, रत्न आणि आभूषणे ईपीसी, लेदर, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर, सिंथेटिक्स आणि रेयॉन, हस्तकला, प्रकल्प निर्यात, दूरसंचार, वस्त्रोद्योग, काजू, प्लास्टिक, क्रीडा साहित्य, लोकर, तेलबिया आणि इतर उत्पादने, रेशीम या निर्यातदारांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अभियांत्रिकी निर्यात सेवा, औषधे, रसायने, रंग, वन उत्पादने, कार्पेटसंबंधित रसायने यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor


(Release ID: 1612385) Visitor Counter : 172