आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती

Posted On: 08 APR 2020 6:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020

 

देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव थांबवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी भारत सरकार  राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांवर अतिशय उच्च स्तरावरून नियमित देखरेख केली जात आहे आणि त्याचा आढावा घेतला जात आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून लॉकडाऊनची प्रभावी पद्धतीने सर्वत्र एकसमान अंमलबजावणी व्हावी आणि सामाजिक अंतर राखण्याच्या पद्धतीचा चांगल्या प्रकारे अवलंब करावा यावर सरकार भर देत आहे. यामुळे कोविड-19 संसर्गाविरोधात यशस्वी लढा उभारायला मदत मिळू शकेल.

विषाणू संक्रमणाची साखळी खंडित व्हावी याकरता केंद्र आणि राज्य सरकारे दोन्ही मिळून विविध उपायांचा अवलंब करत आहेत.

देशभरात या आजाराच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर त्यावरील उपाययोजनांमध्येही वाढ करण्यात येत आहे. देशभरात सर्वत्र कोविड-19 देखभाल केंद्रांची पुरेशा प्रमाणात उभारणी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना करण्यात आल्या आहेत.

काही जिल्ह्यांनी केलेल्या उपाययोजना इतरांसाठी आदर्श म्हणून उदयाला येत आहेत. यापैकी काही उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत:

•           पुणे जिल्ह्याने पुण्याचा मध्यवर्ती भाग आणि कोंढवा हे भाग सील केले आहेत आणि सुमारे 35 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे. या सर्वेक्षणातील पथके परदेश प्रवासाच्या इतिहासाची माहिती घेणे आणि संसर्ग झालेल्याच्या संपर्कात आलेल्यांचा माग काढण्याबरोबरच  मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या इतर समस्या असलेल्या व्यक्तींची देखील तपासणी करत आहे.

•           पाथनमथिट्टा जिल्ह्याने अतिशय बारीक लक्ष ठेवण्यावर, परदेश प्रवासाचा इतिहास असलेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्यावर, संसर्ग झालेल्याच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहोचण्यावर, विलगीकरण सुविधा उभारण्यावर आणि आवश्यक असलेले आणि मानसिक पाठबळ उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

या महामारीचा प्रभावी पद्धतीने सामना करता यावा यासाठी आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी भारत सरकारने कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग(iGOT) पोर्टल नावाचे प्रशिक्षण मॉड्युल दिक्षा प्लॅटफॉर्मवर सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ, एएनएम्स, राज्य सरकारी कर्मचारी, नागरी संरक्षण अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेना( एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना( एनएसएस), इंडियन रेड क्रॉस सोसायटी(आयआरसीएस) आणि इतर स्वयंसेवकांचा समावेश आहे. या पोर्टल वेबसाइटची ही https://igot.gov.in/igot/. लिंक आहे.

नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयाकडून कोविड-19च्या व्यवस्थापनासाठी  विविध श्रेणीतील आरोग्य व्यावसायिकांसाठी अनेक वेबिनारनचे आयोजन केले जात आहे. कोविड-19चा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या किंवा पुष्टी झालेल्या गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीविषयक काळजी घेण्यासंदर्भात डॉक्टरांसाठी या आठवड्यात ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा तपशील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या www.mohfw.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

आतापर्यंत देशभरात पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 5194 झाली आहे आणि यापैकी 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 402 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.mohfw.gov.in/.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न  technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in . या ईमेलवर पाठवता येतील.

कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री). राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी  https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.

*****

G.Chippalkatti/S.Patil/P.Kor


(Release ID: 1612350) Visitor Counter : 180