कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

कोविड-19 प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी कार्मिक, तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालयांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक


पीएम केयर्स निधीसाठी या विभागांनी दिलेल्या योगदानाबद्दल सिंग यांनी केले कौतुक

Posted On: 07 APR 2020 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020

 

केंद्रीय कार्मिक, तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणु उर्जा आणि अवकाश संशोधन, ईशान्येकडील राज्यांचा विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण विभाग तसेच निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभाग यांच्याशी आज कोविड-19 संसर्गाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या विविध उपाय योजनांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आढावा घेतला.
सर्वप्रथम त्यांनी देशात सुरु असलेल्या संपूर्ण संचारबंदी काळात कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेले उपक्रम आणि संचारबंदी मागे घेतल्यानंतर देशातील परिस्थिती सुरळीत करण्यासाठीची विभागाची तयारी याबाबत माहिती घेतली. गृह कल्याण केंद्रांमध्ये चेहऱ्यासाठीचे मास्कस् शिवण्याचे काम सुरु आहे तसेच घरातून काम करणाऱ्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड संदर्भातील कामांचे प्राधान्यक्रम आखून दिले आहेत अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सिंग यांना दिली. कोविड-19 संदर्भातील मुद्द्यांवर काम करणाऱ्या सरकारी आणि बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एकात्मिक ऑनलाईन प्रशिक्षण मंच सुरु करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण मंत्रालयाने कोविड-19 संदर्भातील तक्रारी दाखल करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षण मंच सुरु केला असून कालपर्यंत त्यावर 10 हजार 659 तक्रारींची नोंदणी झाली आहे अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंग यांना दिली. सर्व संबंधित मंत्रालये तसेच विभाग आणि सर्व राज्य सरकारांनी कोविडविषयींच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्यांचे निवारण तीन दिवसांच्या अवधीत होईल याची निश्चिती करण्यासाठी तक्रार निवारण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. स्थलांतरित मजुरांच्या अन्नविषयक गरजांची पूर्तता करण्यासारख्या मुद्द्यांवर विभागाने माध्यमांकडून केले जाणारे ट्वीट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांचे अहवाल यांच्यावर लक्ष ठेवले आहे. 
निवृत्तीवेतन विभागाच्या  ई-कार्यालयाचे कामकाज सुरु असून सर्व 100% अधिकारी व्हीपीएन जोडणीद्वारे ऑनलाईन कार्यरत आहेत अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी जितेंद्र सिंग यांना दिली. कोविड-19 या जागतिक महामारीविरोधात बाळगण्याच्या सावधगिरीच्या सूचनांची माहिती देणारे सुमारे ४ लाख एसएमएस विभागाकडून निवृत्तीवेतन धारकांना पाठविण्यात आले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांची कोविडशी लढा देण्यातील दुर्बलता लक्षात घेऊन  निवृत्तीवेतन धारकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे वैद्यकीय सल्ला आणि योगा तसेच तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असेही अधिकाऱ्यांनी सिंग यांना सांगितले. 
कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण विभाग तसेच निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभाग या तिन्ही विभागांतील सर्व अधिकाऱ्यांनी एका दिवसाचे वेतन कोविड-19 बाधितांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पीएम केयर्स निधीला दिले आहे तसेच नागरी सेवांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांच्या संस्थेने देखील या निधीला 25 लाख रुपयांची मदत केली आहे. त्याबद्दल जितेंद्र सिंग यांनी त्यांचे कौतुक केले.

 

 

G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane



(Release ID: 1612019) Visitor Counter : 217