श्रम आणि रोजगार मंत्रालय

ईपीएफओने पीएफ सदस्यांच्या जन्मनोंदी सुधारण्यासाठी नवीन सूचना जारी

Posted On: 05 APR 2020 3:47PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा झालेला प्रसार लक्षात घेवून ईपीएफओ म्हणजेच कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या पीएफ सदस्यांच्या जन्म तारखेमध्ये जर सुधारणा करावयाची असेल तर त्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आपल्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांना सुधारित सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व पीएफ सदस्यांचे ‘केवायसी’ करून घेण्यासही सांगितले आहे.

जन्मनोंदीमध्ये दुरूस्ती करताना जन्मतारखेच्या वैधतेसाठी ‘आधार’पत्रकावरील नोंद ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र वैध पुरावा म्हणून सादर केलेली कागदपत्रे आणि आधारवरील जन्मतारीख या दोन्ही तारखांमध्ये 3 वर्षांपेक्षा कमी फरक असेल तर पीएफ ग्राहकाला या तारखेत सुधारणा करवून घ्यावी लागेल आणि त्यासाठी विनंती अर्ज ऑनलाइन भरता येईल.

यूआयडीएआय’च्या उपलब्ध माहितीमुळे इपीएफओच्या सदस्यांना जन्मतारीख ऑनलाइन पाहून त्वरित प्रमाणीकृत करणे शक्य होणार आहे. पीएफ सदस्याकडून विनंती अर्ज प्राप्त झाल्यानंतर कमीत कमी वेळेत जन्मदिनांक बदलणे आता शक्य होणार आहे.

कोविड-19 महामारीचा प्रसार लक्षात घेवून पीएफ सदस्यांनी जर परतावा मिळावा, अशा अनामत रकमेची मागणी केली तर त्याची त्वरित पूर्तता करण्यात यावी, अशा सूचना पीएफच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. ईपीएफओकडे येणा-या ऑनलाइन विनंत्या त्वरित निकाली काढण्यासही सांगण्यात आले आहे.

 

B.Gokhale/ S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1611367) Visitor Counter : 157