पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हैदराबाद इथे आय एस बी च्या पीजीपी क्लास 2022 च्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

देशाच्या आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आयएसबीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख

“भारत म्हणजे व्यवसाय हे समीकरण आज संपूर्ण जगालाच समजले आहे”

“तुम्ही आपली वैयक्तिक ध्येये, देशाच्या उद्दिष्टांसोबत जुळणारी ठेवावीत अशी माझी इच्छा आहे”

“गेल्या तीन दशकांत देशात सातत्याने असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे, निर्णयक्षमतेत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि सुधारणा तसेच मोठ्या निर्णयांबाबत अलिप्त धोरण जाणवले”

“आज मात्र व्यवस्थेत, सरकारमध्ये सुधारणा, नोकरशाहीत कार्यक्षमता आणि लोकसहभागामुळे आपण परिवर्तनाच्या दिशेने चालतो आहोत”

“भारताला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी, आपल्याला आधी भारत आत्मनिर्भर करावा लागेल, आणि यात तुम्हा सर्व व्यावसायिकांची भूमिका महत्वाची आहे”

Posted On: 26 MAY 2022 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2022

 

हैदराबाद इथल्या आयएसबी म्हणजेच- इंडियन स्कूल ऑफ बिझनेस ला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, तसेच 2022 च्या पीजीपी तुकडीच्या आज झालेल्या विशेष दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी, ही संस्था उभी करुन नावारूपाला आणणाऱ्या सर्वांना अभिवादन केले. 2001 साली, तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही संस्था देशाला समर्पित केली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. तेव्हापासून, या बिझनेस स्कूलमधून 50 हजारपेक्षा अधिक अधिकारी/व्यावसायिक उत्तीर्ण झाले आहेत. आज आयएसबी ही आशियातील सर्वोत्तम व्यवसायिक शिक्षणसंस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या संस्थेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत आणि देशातील उद्योग व्यवसायाला योग्य गती देत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी शेकडो स्टार्ट अप्स सुरु केल्या असून युनिकॉर्न तयार करण्यातही त्यांची भूमिका महत्वाची आहे. ही आयएसबी ची उत्तम कामगिरी तर आहेच, शिवाय संपूर्ण देशासाठी देखील अत्यंत अभिमानाची बाब आहे. असे पंतप्रधान म्हणाले.

आज भारत जी-20 गटातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. स्मार्टफोन डेटा ग्राहकांच्या बाबतीत तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आपण आज देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पहिली, तर भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तसेच जागतिक किरकोळ ग्राहकांच्या निर्देशांकात देखील भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप व्यवस्था भारतात आहे.  जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी ग्राहकपेठ भारतात आहे. आज भारत जगातील वृद्धीचे सर्वात मोठे केंद्र म्हणून उदयाला येत आहे. गेल्यावर्षी भारतात, सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक आली आहे. आज संपूर्ण जगाला कळले आहे की भारत म्हणजे उद्योग-व्यवसाय.

आज अनेक समस्यांवर भारताने सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी जगभर केली जाते.  म्हणूनच, आज या महत्वाच्या दिवशी, मला तुम्हाला असे सांगायला आवडेल, की तुमची स्वप्ने, तुमची ध्येये तुम्ही देशांच्या उद्दिष्टांशी जुळणारी ठेवावीत, त्याच्यासोबत चालणारी ठेवावीत असे पंतप्रधान म्हणाले.

भारतात सुधारणांची कायमच गरज होती, मात्र त्यासाठी इथे राजकीय इच्छाशक्ती कायम अपुरी पडत असे. गेल्या तीन दशकांत भारतात सातत्याने असलेल्या राजकीय  अस्थिरतेमुळे, देशात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवला. आणि म्हणूनच आपले राज्यकर्ते, पर्यायाने आपला देश, सुधारणा आणि मोठमोठे निर्णय घेण्यापासून अलिप्त राहिला.  2014 पासून, आपल्या देशात राजकीय इच्छाशक्ती दिसून येत आहे आणि सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत.जेव्हा निर्धाराने आणि राजकीय इच्छाशक्तीने सुधारणा केल्या जातात तेव्हा सार्वजनिक पाठबळ  आणि लोकांचा पाठिंबा सुनिश्चित होतो. लोकांमध्ये डिजिटल पेमेंट स्वीकारण्याचे उदाहरण त्यांनी दिले.

महामारीच्या काळात आरोग्य क्षेत्राची लवचिकता आणि सामर्थ्य सिद्ध झाले  आहे., असे पंतप्रधानांनी सांगितले. कोविड लसींबाबत बोलताना त्यांनी सांगितले कीपरदेशी लस उपलब्ध होतील की नाही, अशी चिंता येथे व्यक्त केली जात होती, पण भारताने स्वतःची लस विकसित केली. अशा अनेक लसी तयार केल्या गेल्या असून  भारतात  लसीच्या 190 कोटींपेक्षा  जास्त मात्रा  दिल्या  गेले आहेत.  भारताने जगातील 100 हून अधिक देशांमध्ये लस पाठवली आहे.वैद्यकीय शिक्षणाच्या विस्ताराबाबतही पंतप्रधान यावेळी बोलले.

अधिकारी वर्गानेही  सुधारणा प्रक्रियेत ठोस योगदान दिले आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.सरकारच्या योजनेच्या यशस्वीतेचे श्रेय त्यांनी लोकसहभागाला दिले.जेव्हा लोक सहकार्य करतात, तेव्हा जलद आणि चांगले परिणाम सुनिश्चित होतात. सध्याच्या व्यवस्थेत सरकारी सुधारणा, अधिकारी वर्गाची कामगिरी आणि लोकसहभागामुळे परिवर्तन घडते असे त्यांनी सांगितले. त्यांनी इंडियन स्कुल ऑफ बिझनेसच्या  विद्यार्थ्यांना  सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या यंत्रणेचा अभ्यास करावा असे त्यांनी सांगितले.

2014 नंतर आपण प्रत्येक खेळात अभूतपूर्व कामगिरी पाहत आहोत याचे सर्वात मोठे कारण आपल्या खेळाडूंचा  आत्मविश्वास असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.जेव्हा योग्य प्रतिभा शोधली जाते, प्रतिभेला योग्य पाठबळ मिळत  असते , जेव्हा पारदर्शक निवड असते  आणि प्रशिक्षण, स्पर्धेसाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध असतात तेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले.  खेलो इंडिया आणि टॉप्स योजनेसारख्या सुधारणांमुळे क्रीडा क्षेत्रातील परिवर्तन हे  आपल्या डोळ्यांसमोर आहे, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे, सार्वजनिक धोरण क्षेत्रातील कामगिरी, मूल्यवर्धन, उत्पादकता आणि प्रेरणा यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्यांनी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमाचा उल्लेख केला.

बदलत्या उद्योग परिदृष्यावर भाष्य करत त्यांनी सांगितले कीजिथे औपचारिक, अनौपचारिक, छोटे आणि मोठे व्यवसाय त्यांचे क्षितिज विस्तारत आहेत आणि लाखो आणि कोट्यवधी लोकांना रोजगार देत आहेत. छोट्या उद्योगांना वाढीसाठी अधिक संधी देण्याच्या आणि त्यांना नवीन स्थानिक आणि जागतिक बाजारपेठांशी जोडण्यात मदत करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या संदर्भातली  अफाट क्षमता अधोरेखित करून, भारताला भविष्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने भारत आत्मनिर्भर  होईल हे आपल्याला सुनिश्चित करावे लागेल यावर पंतप्रधानांनी भर दिला.आयएसबीसारख्या  संस्थांमधील  विद्यार्थ्यांची यात मोठी भूमिका आहेतुम्ही सर्व व्यावसायिक व्यावसायिकांची यात मोठी भूमिका आहे आणि हे तुमच्यासाठी देशसेवेचे उत्तम उदाहरण असेलअसे भाषणाचा समारोप करताना त्यांनी सांगितले.

S.Kulkarni/S.Chavan/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1828523) Visitor Counter : 235