• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

52 व्या इफ्फीचे गोवा इथे अतिशय दिमाखदार सोहळ्यात झाले उद्घाटन


या, आणि चित्रपटांच्या विविधतेचे रंग एकत्रित दाखवणाऱ्या भारतातील “चित्रपटांच्या कॅलिडोस्कोप” चा भाग व्हा : केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली चित्रपटनिर्मितीचे एक जागतिक पसंतीचे स्थान बनण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे- राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन

आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाला अनुसरून चित्रपट आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्याचे गोव्याचे लक्ष्य आहे- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताने केलेल्या असामान्य कामगिरीमुळे सिनेरसिकांना अतिशय दिमाखात इफ्फीचा सोहळा साजरा करणे शक्य झाले आहे- केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव

“नव्या पिढीतल्या 75 सर्जनशील मनांचे तारे चमकणार!

अभिनेत्री हेमामालिनी यांचा ‘भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व’ म्हणून गौरव,

52 व्या इफ्फीमध्ये आज मार्टिन स्कॉरसेझी आणि इस्तेवान साबो यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान

इफ्फीच्या इतिहासामध्ये यंदा प्रथमच प्रमुख ओटीटी मंचाचा सहभाग

52व्या इफ्फीमध्ये 73 देशांतल्या 148 आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह 300 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन होणार

Posted On: 20 NOV 2021 6:40PM by PIB Mumbai

पणजी, 20 नोव्‍हेंबर 2021 

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख चित्रपट कलाकारांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या भव्य आणि रंगारंग सोहळ्याने गोव्यातील पणजी येथे 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार आणि सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात   आले.  या महोत्सवातील ओपनिंग चित्रपट  ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ (एल रे डी टोडो अल मुंडो) या ट्रेलर उद्घाटन सोहळ्यात  दाखवण्यात   आला.

चित्रपट रसिकांसमोर आपले मनोगत मांडतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतातील आणि जगभरातीलच सर्व चित्रपट निर्मात्यांना इफ्फीमध्ये सहभागी होण्याची आग्रही विनंती केली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतला,चित्रपटसृष्टीतले विविध रंग एकत्रित दाखवणारा हा सोहळा असून सर्वांनी इथे या, आणि या सोहळ्याचा भाग व्हा, असे आमंत्रण त्यांनी दिले.ते आज गोव्यात पणजी येथे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 52 व्या आवृत्तीच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.  

‘‘भारताची कथा ही भारतीयांनी लिहिलेली आणि परिभाषित केली आहे. चित्रपट निर्मात्यांनी आपल्या देशातल्या ‘सहयोगी वैविध्‍यतेला आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सिनेमॅटिक कॅलिडोस्कोपचा एक भाग बनवावे.’’

प्रथमच, प्रमुख ओटीटी मंच  भारताच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहेत  आणि त्याबद्दल  प्रचंड आनंद आहे असे   अनुराग सिंग ठाकूर म्हणाले, “मला हे सांगताना आनंद होत आहे की, प्रथमच इफ्फीने ओटीटी मंचांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.'' महामारीने  'सामान्य' काय आहे याबद्दलची आपली  धारणा बदलली आहे.“कोरोना विषाणू महामारीपासून वाढीस लागेलेले  सिनेमा-आणि-ओटीटी हे मिश्रण दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे आणि हे असे मिश्रण आहे जे केवळ भारतातच नव्हे तर हॉलीवूडमध्ये आणि इतरत्रही उदयाला आले  आहे  असे सांगत ठाकूर म्हणाले की नजीकच्या भविष्यात ते कायम राहण्याची शक्यता आहे." किंबहुना ही परिस्थिती फायदेशीर असल्याचे सांगत महामारीच्या काळात  "ओटीटी तंत्रज्ञानाशिवाय, चित्रपट उद्योगातील सर्जनशील प्रतिभा दडपली गेली असती आणि चित्रपट उद्योगाची बाजारपेठ ठप्प झाली असती." याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.

यंदाच्या इफ्फिमधील अभिनव उपक्रमासंदर्भात बोलताना, ठाकूर यांनी '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' (उद्याची 75 सर्जनशील मने )  - या स्पर्धेचा उल्लेख केला,देशातील तरुण सर्जनशील मन आणि नवोदित कलागुणांना  प्रोत्साहन देणे आणि ओळखणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे."भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात,'स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव' निमित्त "75 यंग क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो"  या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून युवा प्रतिभेला ओळखून  मार्गदर्शन केले जाणार आहे. चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या ज्यूरीने निवड केलेल्या  75 सर्जनशील मनांचे , तरुण सर्जनशील कलाकारांचे मंत्र्यांनी अभिनंदन केले.

''इफ्फीबरोबर  प्रथमच  ब्रीक्स चित्रपट महोत्सवाद्वारे 5 ब्रीक्स राष्ट्रे त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत आहेत, असे सांगत यावर्षी इफ्फिमध्ये  काही अनोख्या उपक्रमांची भर पडली आहे , असे ठाकूर  म्हणाले.

या संदर्भात पुढे बोलताना श्री ठाकूर म्हणाले की, "चित्रपटातील उत्कृष्टतेसाठी सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार  यंदापासून दरवर्षी इफ्फीमध्ये प्रदान केला जाईल जो सत्यजित रे यांच्या समृद्ध  वारशाच्या स्मरणार्थ या वर्षीपासून सुरू होत आहे.

हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान

या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती  हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व 2021, हा पुरस्कार अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते  प्रदान केला.  प्रसिद्ध गीतकार आणि सीबीएफसीचे अध्यक्ष श्री प्रसून जोशी हे या पुरस्काराचे  दुसरे मानकरी असून त्यांना     इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.

 

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार

आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मार्टिन स्कॉरसेझी आणि इस्तेवान साबो यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारही श्री ठाकूर यांनी प्रदान केला. मेफिस्टो (1981) फादर (1966) यांसारख्या  उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले  गेलेले, गेल्या काही दशकांतील सर्व समीक्षकांकडून प्रशंसित असलेले इस्तेवन स्झाबो हे हंगेरियन चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे मार्टिन स्कॉरसेस हे नव्या हॉलीवूड युगातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.

 

पहिला ब्रिक्स चित्रपट महोत्सव

प्रथमच, पाच ब्रिक्स राष्ट्रांचे चित्रपट इफ्फीसोबत ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या  माध्यमातून दाखवले जातील. ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारत हे पाच देश 52 व्या IFFI चे फोकस देश आहेत. कंट्री ऑफ फोकस हा एक विशेष विभाग आहे जो त्या विशिष्टदेशाची चित्रपट संबंधी उत्कृष्टता आणि योगदान यांचा सन्मान करतो.

 

प्रमुख ओटीटी मंचाचा यंदा सहभाग   

इफ्फीच्या  इतिहासात प्रथमच,  नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, झी 5, वूट  सोनी लाईव्ह , व्हायकॉम हे प्रमुख ओटीटी  प्लॅटफॉर्म यात सहभागी होत आहेत. मास्टर क्लासेस, कंटेंट लॉन्च आणि प्रिव्हू , क्युरेटेड फिल्म पॅकेज स्क्रीनिंग आणि इतर विविध कार्यक्रमात सहभागी होतील. ओटीटीवर चित्रपट  पाहण्याचा कल वाढत असताना, इफ्फी  नवीन तंत्रज्ञान स्वीकारत   आहे आणि या उद्योगातील कलाकारांना ओटीटी कंपन्यांशी संवाद   साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

52 व्या इफ्फीसाठी आलेले प्रतिनिधी आणि पाहुण्यांचे स्वागत करतांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिवंगत डॉ मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पर्रीकर मुख्यमंत्री असतांना पहिल्यांदाच ईफ्फीचे यजमानपद गोव्याला मिळाले होते. त्यानंतर, सलग 17 वर्षे  इफ्फी या समुद्रकिनारी असलेल्या पणजी शहरात साजरा होतो आहे. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट  साध्य करण्याच्या प्रयत्नांत, केंद्र सरकाच्या समर्थनाने चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात, आत्मनिर्भर होण्याचे गोव्याचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले .

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यावेळी उपस्थित होते ते म्हणाले “इफ्फीमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक नीतिमत्ता समजून घेणे आणि जागतिक चित्रपटांचे कौतुक  शक्य होत आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली चित्रपटनिर्मितीचे एक जागतिक पसंतीचे स्थान बनण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.”

माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चंद्रा यावेळी म्हणाले की, इफ्फी हा 50 वर्षापेक्षा जास्त काळाचा समृद्ध वारसा असलेला देशातला सर्वात मोठा आणि सर्वोकृष्ट चित्रपट महोत्सव आहे. इफ्फीच्या नऊ दिवसांच्या काळामध्ये या महोत्सवात एकाच ठिकाणी देशातल्या आणि जगभरातल्या सर्वोत्तम चित्रपटांचा आस्वाद घेता येतो.’’

अद्याप कोविड-19 चे आव्हान असतानाही यंदा हा महोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जात आहे, असे सांगताना सचिवांनी स्पष्ट केले की, यंदा मिश्र स्वरूपात चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले असले तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त देशांतून आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी 69 देशातून चित्रपट आले होते, यंदा 96 देशांमधून आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यावरूनच आम्ही कोविड संकटाच्या आव्हानाचा सामना करीत असल्याचे दिसून येत आहे. इफ्फीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व प्रमुख ओटीटी मंचाचा सहभाग या महोत्सवात होत असल्याचे सचिव चंद्रा यांनी यावेळी सांगितले.

महोत्सवासाठी सर्व अतिथी आणि प्रतिनिधीना आपल्या शुभेच्छा देतांना गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई    म्हणाले, की साहित्य, कला आणि चित्रपटांचा आपल्या देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यात महत्वाचा वाटा आहे.

इफ्फी महोत्सवाचे  संचालक चैतन्य प्रसाद यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी एनएफडीसी फिल्म बाजारविषयी माहिती देणारी  एक चित्रफीत ही जारी केली.

पणजीतील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण रंगारंग सोहळ्याचे  सूत्रसंचालन  प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर आणि सूत्र संचालक अभिनेता मनीष पॉल यांनी संयुक्तपणे केले. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि रणवीर सिंग यांच्यासह चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार या भव्य सोहळ्याला  उपस्थित होते. या कार्यक्रमाला  सिद्धार्थ आनंद, मधुर भांडारकर, समंथा रुथ प्रभू, मनोज बाजपेयी,  खुशबू सुंदर, रवी कोट्टारकारा, राज निदिमोरू, कृष्णा डीके इत्यादींसह प्रसिद्ध चित्रपट कलाकार आणि  दिग्दर्शकांची उपस्थिती होती.

येत्या 28 नोव्हेंबर पर्यंत चालणार्या 52 व्या इफ्फी  मध्ये, 12 जागतिक प्रीमियर्स, 7आंतरराष्ट्रीय  प्रीमियर्स, 26  आशियाई प्रीमियर्स आणि 64 भारतीय  प्रीमियर्ससह 73 देशांतील 148 चित्रपट आंतरराष्ट्रीय विभागात दाखवले  जातील.

 

* * *

JPS/Radhika/Suvarna/Sanjana/Shailesh/S.Chavan/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1773522) Visitor Counter : 276


Link mygov.in