• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थींशी धर्मेंद प्रधान यांनी साधला संवाद


पीएमजीकेवाय अंतर्गत पीएमयूवायच्या 6.28 कोटींपेक्षा अधिक लाभार्थींनी विनामूल्य गॅस सिलेंडरचा लाभ घेतला

डीबीटीमार्फत पीएमयूवाय लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये 8,432 कोटी रुपयांचे हस्तांतरण

कोविड-19 महामारी संकटकाळात सरकारने विनामूल्य सिलेंडर पुरवून दिलासा दिल्याबद्दल लाभार्थींनी आभार व्यक्त केले

Posted On: 16 MAY 2020 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2020

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज वेबिनारच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या लाभार्थींशी संवाद साधला. यामध्ये देशभरातून सुमारे 1500 लाभार्थी सहभागी झाले होते. 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने (पीएमयूवाय)नुकतीच चार वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यामुळे देशभरातल्या आठ कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांच्या जीवनामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असं सांगून प्रधान म्हणाले, कोविड-19 महामारीचा सर्व राष्ट्रांवर परिणाम झाला आहे. श्रीमंत, शक्तिशाली देशांनाही कोविडने त्रस्त केलं आहे. भारतामध्ये या महामारीविरुद्ध अनेक पातळ्यांवर लढा दिला जात आहे. सरकारने विविध उपाय योजनांची अंमलबजावणी केली आहे.  त्याचबरोबर सरकार गरीब, वंचितांच्या हिताचीही योग्य काळजी घेत आहे. यासाठीच सरकारकडून वेळोवेळी दिलासा देणारे, मदत करणारे निर्णय जाहीर केले जात आहेत. या संकटाच्या सुरुवातीच्या काळातच मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली होती. त्यातलाच एक महत्वाचा घटक म्हणून पीएमयूवायच्या लाभार्थींना तीन महिने विनामूल्य गॅस सिलेंडर पुरवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार 8,432 कोटींपेक्षा जास्त रुपये हस्तांतरित करण्यात आले. ही रक्कम आधीच हस्तांतरित केल्यामुळे त्यांना सुविधेचा लाभ घेताना अडचण येणार नाही. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त पीएमयूवाय लाभार्थींना विनामूल्य गॅस सिलेंडर मिळत आहे. 

एलपीजी सिलेंडर्सचे उत्पादन, आयात आणि वितरण ही साखळी नियमित ठेवण्यासाठी ‘ओएमसी’ म्हणजेच तेल विपणन कंपन्यांनी  बजावलेल्या भूमिकेबद्दल धमेंद्र प्रधान यांनी कौतुक केले. संकटाच्यावेळी आणि वाढीव मागणीच्या काळात ओएमसीने केलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. कोविड-19 महामारीविरोधात भारत देत असलेल्या लढ्याची आणि इतर अनेक देशांची तुलना केली तर भारतातली परिस्थिती बरीच चांगली आहे, असं म्हणता येईल. त्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधानांनी घेतलेल्या धाडसी आणि योग्य निर्णयाला जाते. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणा-या आपल्या देशातल्या लोकांनाही त्याचे श्रेय आहे. सरकारने सामाजिक अंतर राखणे, हात वारंवार धुणे, मास्क वापरणे यासारख्या दिलेल्या सूचनांचे पालन जनतेकडून होत आहे, त्यामुळे कोविड-19ची लढाई जिंकण्यास बळ मिळत आहे, असंही प्रधान यावेळी म्हणाले. आता देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने चेतना देण्याची आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशा कामांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. कोविड-19 महामारीच्या संकटानंतर  भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, या पॅकेजमुळे देशांतर्गत निर्मितीला उत्तेजन मिळणार आहे तसेच सर्व क्षेत्रात आपल्याला स्वावलंबी बनवण्यासाठी हे पॅकेज उपयुक्त ठरणार आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर अभियानाचे त्यांनी स्वागत केले. 

या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या पीएमयूवाय लाभार्थींनी आपले अनुभव व्यक्त केले. सध्याच्या संकटकाळामध्ये सरकारने आमची योग्य प्रकारे काळजी घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. लाभार्थींपैकी अनेकजणांनी घरामध्ये गॅस आणि सिलेंडर येण्याआधी कशी परिस्थिती होती आणि आता आपले आयुष्य कसे बदलेले आहे, याचे अनुभव सांगितले. घरामध्ये गॅस आल्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात सोय, सुविधा निर्माण झाली इतकंच नाही, तर आता निरोगी, सुरक्षित आयुष्य जगता येत असल्याचं अनेकांनी नमूद केलं.  स्वयंपाकासाठी जळण, लाकूडफाटा गोळा करण्याच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळाल्याचंही सांगितलं. तसेच नोंदणी केल्यानंतर अतिशय कमी कालावधीमध्ये भरलेला सिलेंडर मिळत असल्याचेही सांगितले. कोरोनाचा प्रसार झालेला असतानाही वेळेवर सिलेंडर घरपोच देण्याचे काम करणा-या पुरवठा साखळीतल्या कोरोना योद्ध्यांचे यावेळी सर्वांनी आभार मानले. 


* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1624467) Visitor Counter : 124


Link mygov.in