• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

कोविड–19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कृषी संशोधन परिषदेशी संलग्न संस्थांनी मत्स्य क्षेत्रासाठी बारा भाषांमध्ये जारी केल्या सल्ले सूचना


रोमच्या अन्न आणि कृषी संघटनेने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सल्ले सूचनांचा जागतिक पातळीवरील मत्स्य व्यावसायिकांच्या हितासाठीची मार्गदर्शक तत्वे म्हणून केला समावेश

Posted On: 07 MAY 2020 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2020


संपूर्ण जगात पसरलेल्या कोविड-19 विषाणू महामारीमुळे लागू कराव्या लागलेल्या लॉक डाऊन अर्थात संपूर्ण बंदीचे देशातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्यसंवर्धन क्षेत्रावर विविध प्रकारचे दुष्परिणाम झालेले दिसून येत आहेत. खुल्या जल क्षेत्रातील मासेमारी, गोड्या तसेच निम-खाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन यांच्यासह मत्स्य बीज संवर्धन, मत्स्य खाद्य निर्मिती कंपन्यांचे परिचालन, मत्स्य पुरवठा आणि विपणन साखळ्या इत्यादी अनेक संबंधित यंत्रणांवर लॉक डाऊनचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. साकल्याने विचार केला तर मासेमारी करणारे, मत्स्यप्रक्रिया उद्योग करणारे आणि त्यांच्या समाजाला या महामारीमुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे आणि मत्स्यव्यवसायाच्या साखळीतील प्रत्येक घटकाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्यामुळे त्यांच्यावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाचीच परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

अशा परिस्थितीत मत्स्य आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद, डीएआरई अर्थात कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी त्यांच्या विविध संशोधन संस्थांच्या माध्यमातून विविध उप क्षेत्रातील सर्व संबंधितांच्या जागृतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण पावले उचलली आहेत.

मासेमारी, मत्स्य संवर्धन आणि सर्व संबंधित यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्यामध्ये कोविड-19 संसर्ग होऊ नये यासाठी आयसीएआरने पुढाकार घेऊन मत्स्य क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून अनेक सल्ले सूचना जारी केल्या आहेत. आयसीएआर आणि कोची येथील सीआयएफटी अर्थात केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्थेने मच्छिमार, मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींचे मालक, जिथे मासेमारी चालते अशी बंदरे, मासळी बाजार आणि खाऱ्या पाण्यातील माशांवर प्रक्रिया करणारे यांच्या हितासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषेसह दहा विविध प्रादेशिक भाषांमध्ये या सूचना जारी केल्या आहेत. तर नद्या, खाड्या, तलाव तसेच इतर पाणथळ जागी मासे पकडणाऱ्या मासेमारांसाठी आयसीएआर आणि बराकपूर येथील सीआएफआरआय अर्थात केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय संशोधन संस्थेने अशाच सल्ले सूचना जारी केल्या आहेत. या सल्ले सूचनांना छापील तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी दिली जात असून राज्यांमधील मत्स्य विभाग, विकास संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसहाय्य गट तसेच समाजमाध्यमांच्या मंचांची देखील यासाठी मदत घेतली जात आहे.

अत्यंत योग्य वेळी जारी केलेल्या या सल्ले सूचनांचे महत्त्व ओळखून  रोमच्या अन्न आणि कृषी संघटनेने आयसीएआर - सीआयएफटी आणि आयसीएआर - सीआएफआरआय यांनी तयार केलेल्या या सल्ले सूचनांचा अंतर्भाव जागतिक पातळीवरील लघु मत्स्य व्यावसायिकांच्या हित संरक्षणासाठी आशिया - प्रादेशिक उपक्रमा अंतर्गतची स्वयंप्रेरक मार्गदर्शक तत्वे म्हणून केला आहे. यासंबंधीची माहिती http://www.fao.org/3/ca8959en/ca8959en.pdf या वेब पेजवर वाचता येईल. आयसीएआर आणि तिच्याशी संलग्न संस्थांच्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर अशा प्रकारे मोठा सन्मान झाला आहे. आयसीएआरने जारी केलेल्या सल्ले सूचनांचा जागतिक पातळीवरील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

 

* * *

M.Jaitly/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1621802) Visitor Counter : 184


Link mygov.in