सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
आयुष क्षेत्राकडे अपार सामर्थ्य असुन भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते-नितीन गडकरी
आयुष क्षेत्राला चालना देण्यासाठी आयुष आणि एमएसएमई मंत्रालयांच्या आयुष उद्यमशीलता विकास कार्यक्रमाचा प्रारंभ
Posted On:
30 APR 2020 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) मंत्री नितीन गडकरी म्हणाले की भारतात शतकानुशतके प्रचलित असलेल्या उपचाराच्या पर्यायी पद्धतींना वाढती लोकप्रियता मिळत असल्यामुळे भारताला आर्थिक महासत्ता बनण्यास मदत करण्याची मोठी क्षमता आयुष क्षेत्रात आहे. आयुष क्षेत्राच्या वाढीसाठी अधिक संशोधन आणि अभिनवतेची गरज त्यांनी व्यक्त केली. एमएसएमई मंत्रालयाच्या वेगवेगळ्या योजनांतर्गत देशात आयुष क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या आयुष उद्यमशीलता विकास कार्यक्रमाचा प्रारंभ करताना गडकरी बोलत होते. भारतीय आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, सिद्ध यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
भारतीय आयुर्वेद, योग, होमिओपॅथी, सिद्ध यांना इतर देशांमध्ये मोठी मागणी असून विद्यमान उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि तिथे आपले दवाखाने / दुकाने उघडून निर्यातीला सहाय्य करावे असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, जागतिक पातळीवर आयुर्वेदिक उपचार आणि योगाला मोठी मागणी असुन दिवसेंदिवस ती वाढत आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवून विशेषत: प्रसिद्ध व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी पूर्ण केली जाऊ शकते असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी आयुष क्षेत्राला मजबुती प्रदान करणारा , अधिक उद्योगांची निर्मिती आणि रोजगार निर्मिती करणारा कार्यक्रम सुरू करण्याची गरज आहे. आयुर्वेदातील कच्चा माल साधारणपणे वनक्षेत्र, ग्रामीण भाग, आदिवासी क्षेत्र, महत्वाकांक्षी जिल्ह्यात आढळतो आणि तिथे प्रक्रिया उद्योग, रोजगार निर्मिती, उद्योग विकास आणि स्वयंरोजगारासाठी क्लस्टर्सची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रशिक्षित योग तज्ञ / प्रशिक्षक विकसित करण्याची अतिशय गरज आहे यावर भर देत ते म्हणाले की यासाठी नामांकित प्रशिक्षण संस्थाच्या संघटनांमध्ये अभ्यासक्रम सुरू करता येतील. आपल्या दैनंदिन जीवनात योग, आयुर्वेद आणि संतुलित आहाराचा समावेश करून जीवनशैलीत बदल घडवून आणण्यावरही त्यांनी भर दिला. आराम देण्यास सक्षम असलेल्या नाविन्यपूर्ण / पर्यायी उपचारांना योग्य कौशल्य विकासाची जोड देणे गरजेचे आहे जेणेकरुन हे उपचार सर्वांमध्ये लोकप्रिय होतील असे त्यांनी नमूद केले.
आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) येसो नाईक, एमएसएमईचे राज्यमंत्री प्रतापसिंह सारंगी तसेच या दोन मंत्रालयाचे सचिव, एमएसएमईचे विकास आयुक्त उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीपाद येसो नाईक यांनी एमएसएमई आणि आयुष मंत्रालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की, जगभरात आयुषला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अशाच सहकार्याची ते अपेक्षा करत आहेत. नाईक यांनी कोविड-19 या साथीच्या आजारामध्ये आयुष मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. एमएसएमई मंत्रालय युनोचे राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी कोविड-19 या साथीच्या आजाराच्या सद्यस्थितीत आयुष क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला आणि दोन्ही मंत्रालयांदरम्यान निकट आणि अधिक प्रमाणात समन्वय साधण्याची सूचना केली. राम मोहन मिश्रा, विशेष सचिव आणि विकास आयुक्त (एमएसएमई) यांनी उद्घाटनपर भाषणात सहकार्याची आणि एमएसएमई मंत्रालयाच्या विद्यमान योजनांच्या सहाय्याने आयुष क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाच्या कृती योजनेची पार्श्वभूमी सादर केली.
आयुष हे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी औषध व्यवस्था दर्शवते. आयुषचे प्रमुख क्लस्टर : अहमदाबाद, हुबळी, थ्रीसुर, सोलन, इंदूर, जयपूर, कानपूर, कन्नूर, करनाल, कोलकाता, नागपूर येथे आहेत.
या क्षेत्राला असंघटित क्षेत्र, चांगल्या उत्पादन पद्धतींची कमतरता , गुणवत्ता प्रणाली, चाचणी इत्यादी, पारंपरिक विपणन पद्धती, निर्यातीला कमी वाव, प्रचारात्मक कार्यक्रम आणि पाठिंब्याचा अभाव अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
आज आयोजित कार्यक्रम आयुष क्षेत्राला भेडसावणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी कृती योजनेचा एक भाग आहे. हा कार्यक्रम एकाचवेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रसारित करण्यात आल्यामुळे विविध ऑनलाईन / सोशल मीडिया माध्यमातून सुमारे 1000 आयुष आधारित एमएसएमई सहभागी झाले.
आयुष क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दोन मंत्रालयांनी कृती योजना तयार केली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी आयुष आणि एमएसएमई मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार झाला. प्रोत्साहनासाठी रुपरेषेमध्ये आवश्यक मूल्यांकन आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून आयुष क्लस्टरची निवड , त्यांना एमएसएमईच्या योजनांमध्ये जोडणे समाविष्ट आहे . उदा-
- शून्य दोष शून्य प्रभाव / - चांगले उत्पादन सराव.
- खरेदी आणि विपणन सहाय्य योजना - राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे , प्रदर्शन, GeM, पॅकेजिंग, ई-विपणन, निर्यात.
- एटीआय - क्षमता वाढवणे आणि कौशल्य विकास.
- ईएसडीपी, इन्क्युबेशन - स्टार्ट-अप / एंटरप्राइझ विकास.
- समूह विकास (एसएफयूआरटीआय / सीडीपी) - तंत्रज्ञान अपग्रेडेशन.
- सीएलसीएस, पीएमईजीपी - आर्थिक सहाय्य समर्थन.
- सीएआरटी (कृषी ग्रामीण तंत्रज्ञान केंद्र) विभाग - ग्रामीण भागातील आयुष.
- तंत्रज्ञान केंद्रे (हब आणि एएमपी ; स्पोक) - आयुष केंद्रित तंत्रज्ञान सहाय्य.
- चाचणी केंद्रे - गुणवत्ता सुधार / मानकीकरण.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1619778)
Visitor Counter : 184