गोवा, 21 नोव्हेंबर 2026
आदित्य धर यांच्या धुरंधर या हिंदी चित्रपटाच्या सादरीकरणासह 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) भारतीय पॅनोरमा विभागातल्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील फिचर श्रेणीतील चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरुवात झाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गोव्यात पणजी येथे इफ्फीच्या माध्यम केंद्रात आयोजित रंजक पत्रकार परिषदेत हाच चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी होता.
या आंतरसंवादात्मक सत्रात सहभागी झालेले ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी आणि सुप्रसिध्द प्रॉडक्शन डिझायनर सैनी एस.जोहरी यांनी चित्रपटाचा सर्जनशील प्रवास, बारकाईने केलेले व्यक्तिचित्रण तसेच दृश्य विश्वाची निर्मिती याविषयी महत्त्वाची माहिती दिली. या सत्राचे सूत्रसंचालन केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेश कुमार यांनी केले.
_20261121214057_ae92c4.jpeg)
या चित्रपटात जमील जमाली हे पात्र रंगवण्याबद्दल बोलताना राकेश बेदी यांनी समकालीन चित्रपटांमध्ये बहुआयामी पात्रे लिहिण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ज्या अनुभवाचे वर्णन आपल्या कलेचा एक टिकाऊ पाया असे बेदी यांनी केले त्या विस्तृत रंगमंचीय अनुभवाचा आधार घेत त्यांनी त्यांच्या पात्राच्या विकासासाठी केलेल्या तपशीलवार संशोधनाबद्दल माहिती दिली.कोणत्याही पात्राच्या हालचाली चित्रपटातील दृश्याच्या मागणीनुसार असायला हव्या जेणेकरून या सादरीकरणाला केवळ नक्कल करण्याच्या क्रियेपेक्षा एका पात्राचे संपूर्ण चित्रणाचे रूप देता येईल हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला.
अनेक वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिकांनी सजलेल्या आपल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीवर प्रकाश टाकत बेदी यांनी चित्रपटांची बदलती पोहोच आणि दृश्यमानता यांच्याबद्दल चर्चा केली. पूर्वीच्या काळात अभिनय केलेल्या ‘एक दुजे के लिये’, ‘तिरंगा’, आणि ‘चष्मे बद्दूर’ यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेची आठवण काढत त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की त्यावेळी देखील चित्रपटांबद्दल जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात आकर्षण होते, तरी त्या काळात डिजिटल संपर्कजोडणी नसल्यामुळे चित्रपटांची पोहोच मर्यादित होती.

याउलट, सोशल मीडियामुळे प्रेक्षकांना कलाकारांच्या अभिनयाचा शोध घेण्याची आणि त्याच्याशी जोडले जाण्याची पद्धत बदलली आहे. एका क्लिकवर कलाकाराचे काम जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते.
विनोदी आणि गंभीर अभिनयातील अचूक वेळेच्या जाणिवेबाबत एका चित्रपट रसिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बेदी यांनी स्पष्ट केले की, अभिनयातील अशा सूक्ष्म गोष्टी कधीही अनायास घडत नाहीत. प्रत्येक हावभाव आणि चेहऱ्यावरील भाव पटकथा आणि व्यक्तिरेखेच्या प्रवासाचा भाग म्हणून काळजीपूर्वक नियोजित केलेले असतात. व्यक्तिरेखेचे चित्रण अधिक वास्तववादी करण्यासाठी ते अभिव्यक्तीचे जाणीवपूर्वक वापरलेले माध्यम असतात, असे त्यांनी सांगितले.

भावनांमध्ये सहजतेने बदल कसा घडवून आणता आणि आरशासमोर अभिनयाचा सराव करता का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, बेदी यांनी आपल्या अभिनयाच्या दृष्टिकोनाविषयी विचार मांडले. त्यांनी आरशासमोर अभिनयाचा सराव करण्याचा सल्ला दिला नाही. अभिनय करताना स्वतःकडे आरशात पाहणे कलाकाराच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते, कारण अभिनय करत असतानाच स्वतःच्या कामाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे कठीण असते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याऐवजी व्यक्तिरेखेचे सखोल आकलन करून ती मनात पूर्णपणे रुजवण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. एकदा कलाकाराला व्यक्तिरेखेची मानसिकता समजली की, तिची बोलण्याची पद्धत, प्रतिक्रिया आणि भावनिक बदल नैसर्गिकपणे व्यक्त होतात.
निर्मिती संकल्पना प्रमुख सैनी एस. जोराय यांनी चित्रपटातील वास्तुशैलीच्या वास्तववादी चित्रणाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चित्रपटासाठी 40 हून अधिक प्रत्यक्ष सेट उभारण्यात आले होते. पाकिस्तानमधील प्रत्यक्ष ठिकाणांवर जाणे शक्य नसल्यामुळे जोराय यांनी सखोल संशोधन केले. त्यांनी वृत्तपत्रीय संग्रह, स्थानिक टोळीयुद्धांच्या बातम्या, शहरी परिसरातील दृश्यरचना आणि गुगल मॅप्सचा अभ्यास करून चित्रपटातील वातावरण सुरुवातीपासून विश्वासार्हपणे उभे केले.

या पत्रकार परिषदेतून 57 व्या इफ्फीची चित्रपटविषयक अर्थपूर्ण संवाद घडवून आणणारे एक उत्साही व्यासपीठ म्हणून भूमिका अधोरेखित झाली. चित्रपट निर्माते, कलाकार आणि प्रेक्षक यांना एकत्र आणून चित्रपट निर्मितीमागील सर्जनशील प्रक्रियेचा शोध घेण्याची संधी या महोत्सवाने उपलब्ध करून दिली.
अशा संवादांमधून महोत्सव केवळ पडद्यावरील प्रभावी कथांचाच गौरव करत नाही, तर त्या कथा साकारण्यासाठी आवश्यक असलेली कलात्मक कौशल्ये, संशोधन आणि सांघिक प्रयत्नांचाही सन्मान करतो. यामुळे चित्रपट अभिव्यक्तीच्या विविध पैलूंबद्दल अधिक सखोल आकलन निर्माण होण्यास मदत होते.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/गजेंद्र देवडा/दर्शना राणे