राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान


स्वच्छता ही केवळ सार्वजनिक जागांचे सौंदर्य टिकवून ठेवण्याची बाब नाही; तर ती आपल्या आरोग्याचे,सामाजिक जाणिवेचे आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाचेही द्योतक आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

Posted On: 11 NOV 2026 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2026

 

भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज दिनांक 11 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26 प्रदान केले.

एखादी संघटनाच केवळ स्वच्छतेची उद्दिष्ट्ये साध्य करू शकत नाही, तर यासाठी प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक समुदाय आणि प्रत्येक शहराने सहभाग घेणे आवश्यक असते, असे याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या. स्वच्छता ही केवळ सार्वजनिक जागांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यापुरती मर्यादित बाब नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले. ते आपल्या आरोग्याचे, सामाजिक जाणिवेचे आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाचेही द्योतक आहे. तसेच, ते आपल्या घरातील सवयींचेही प्रतिबिंब असते.

प्रत्येक नागरिकाने, विशेषतः तरुण, महिला, रहिवासी कल्याण संघटना आणि सामुदायिक संघटनांनी स्वच्छतेच्या विविध बाबींमध्ये सहभागी झाले पाहिजे, असे राष्ट्रपती पुढे म्हणाल्या. लोकांनी आपले अनुभव सांगावेत आणि काही त्रुटी असल्यास त्या कळवाव्यात, ज्यांचे निराकरण करून आपली शहरे अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी बनण्यास मदत होऊ शकते. यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यात सतत संवाद सुरू राहील तसेच, विश्वास पारदर्शकता आणि उत्तरदायित्व बळकट होऊन अधिक दृढ होईल.

आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेचे परीक्षण करण्यासाठी नागरिक हेच सर्वोत्तम परीक्षक आहेत, त्यामुळे, नागरिकांच्या अभिप्रायाचा वापर सर्वेक्षण किंवा क्रमवारीपुरता ठेवता कामा नये, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. तसेच, हा अभिप्राय पालिका सेवा सुधारण्यासाठी स्थानिक समस्यांना सामोरे जाण्याचा  एक मार्ग म्हणून वापरला गेला पाहिजे.

स्वच्छता क्षेत्रात प्रभावी, परवडणारे आणि सुरक्षित तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे, असे ही राष्ट्रपती‌ यावेळी म्हणाल्या. अनेक आयआयटी आणि इतर वैज्ञानिक संशोधन संस्थांसह विविध संस्था या दिशेने सक्रियपणे काम करत आहेत, हे पाहून त्यांना संतोष व्यक्त केला.

स्वच्छता क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स उदयास आले आहेत, असे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले. असे उद्योग रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच, स्वच्छतेच्या वास्तविक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे आवाहन त्यांनी केले.

द्वितीय (टियर-2) आणि तृतीय (टियर-3) श्रेणीच्या शहरांची क्षमता वाढवण्यावर विशेष भर देण्याची गरज आहे, कारण ही सर्वात वेगाने वाढणारी शहरी केंद्रे आहेत, त्यांच्या गरजा आणि आव्हाने वेगळी आहेत, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले. त्यांचा विकास हा त्यांच्या विशिष्ट समस्या आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय चौकटीतच झाला पाहिजे. प्रथम श्रेणीच्या (टियर-1) शहरांना भेडसावणाऱ्या समस्यांमधून द्वितीय (टियर-2) शहरांमधील समस्यांचे नियोजन केले जाऊ शकते आणि त्यासाठी त्यांनी प्रथम श्रेणीच्या (टियर-1) शहरांमधील नियोजनाच्या अनुभवांचा अभ्यास केला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, हे भारतातील सर्वात स्वच्छ शहरांचा सन्मान करतात तसेच स्वच्छ भारत शहरी अभियानातील त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेतात.

राष्ट्रपतींनी केलेले हिंदी भाषेतील भाषण येथे उपलब्ध आहे.

 

* * *

नितीन फुल्‍लुके/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335367) अभ्यागत कक्ष : 18