Posted On:
04 NOV 2026 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2026
संघटनात्मक आवश्यकता आणि कार्यात्मक कार्यक्षमता यांच्या दृष्टीने केलेल्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनातून अग्निवीरांची कौशल्ये, त्यांच्या प्रेरणेची पातळी, शारीरिक तंदुरुस्ती आणि तांत्रिक क्षमता यांमधील उत्कृष्ट कामगिरी समोर आली आहे. पूर्वी निश्चित केल्याप्रमाणे गुणवत्तेच्या आधारावर 25% अग्निवीरांना संरक्षण दलांमध्ये नियमित रोजगाराची संधी दिली जाईल.
याशिवाय, भारतीय संरक्षण दलांच्या शिफारशींनुसार उर्वरित 75% अग्निवीरांसाठी आणखी दोन वर्षांचा सेवा कालावधी मंजूर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या दोन वर्षांच्या सेवा कालावधीच्या समाप्तीनंतर सर्व अग्निवीरांना त्यांच्या इच्छेनुसार आणि निवड निकषांची पूर्तता केल्याच्या अधीन राहून नियमित सैनिक म्हणून भरती होण्याची संधी दिली जाईल.
इच्छुक 75% अग्निवीरांसाठी आणखी दोन वर्षांचा सेवा कालावधी सुरू करण्याचा निर्णय सखोल, विचारपूर्वक आणि विस्तृत मूल्यमापन तसेच अभिप्रायानंतर घेण्यात आला आहे. अग्निवीरांच्या आकांक्षा आणि संघटनात्मक कार्यक्षमता यांच्यात समन्वय साधणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
अग्निपथ योजनेची उपलब्धी
अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्या परिणामकारकतेबाबत आणि अग्निवीरांच्या कामगिरीबाबत सविस्तर अभिप्राय प्राप्त करण्यात आला. या योजनेच्या काही प्रमुख उपलब्धी पुढीलप्रमाणे आहेत:
- देशातील विविध जिल्ह्यांमध्ये अग्निवीर भरतीचा विस्तार
- अधिक प्रमाणित आणि पारदर्शक भरती प्रक्रिया
- उच्च स्तरावरील शारीरिक तंदुरुस्ती, मनोबल, प्रेरणा, स्पर्धात्मक भावना आणि शिस्त
- सेवेदरम्यान कौशल्ये, तांत्रिक अनुकूलता आणि शिक्षणात वाढ
- संरक्षण दलांच्या विविध शाखांमध्ये महिलांसाठी संधी उपलब्ध करून देणे
या उपलब्धींच्या आधारावर अग्निपथ योजना सुरूच राहील. दुसऱ्या सेवा कालावधीत अधिक वेतन, वाढीव सेवा निधी पॅकेज आणि ज्येष्ठतेचे लाभ दिले जातील.
आणखी दोन वर्षांचा सेवा कालावधी सुरू करून त्यानंतर सर्व अग्निवीरांना नियमित सैनिक म्हणून समाविष्ट करण्याच्या निर्णयाद्वारे मंत्रिमंडळाने सर्व अग्निवीरांना संरक्षण दलांमध्ये सामावून घेण्यासाठी मार्ग तयार केला आहे.
* * *
राधिका अघोर/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai