Posted On:
26 OCT 2026 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026
देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि माहिती व प्रसारण मंत्री, राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार आणि 'भारताचे लोहपुरुष' म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो, त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकाशवाणी 1955 पासून दरवर्षी 'सरदार वल्लभभाई पटेल स्मृती व्याख्यानमाले'चे आयोजन करत आहे. ही व्याख्यानमाला त्यांच्या चिरंतन वारशाचे स्मरण करण्याचा प्रयत्न करते.

या प्रतिष्ठित व्याख्यानमालेची 67 वी आवृत्ती 27 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3:00 वाजता नवी दिल्लीतील संसद मार्ग येथील आकाशवाणीच्या रंग भवन सभागृहात आयोजित केली जात आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या व्याख्यानमालेत आपले विचार व्यक्त करतील. या व्याख्यानाचे ध्वनिमुद्रण सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी (31 ऑक्टोबर) संपूर्ण आकाशवाणी नेटवर्कवर रात्री 9:30 वाजता प्रसारित केले जाते.

या व्याख्यानमालेत सर्वात पहिल्यांदा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल भारतरत्न सी. राजगोपालाचारी यांनी आपले विचार व्यक्त केले होते. तेव्हापासून अनेक दिग्गज नेते, वैज्ञानिक आणि इतिहासकारांनी या मंचाची शोभा वाढवली आहे. त्यातील काही प्रमुख नावांमध्ये डॉ. झाकीर हुसेन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, मोरारजी देसाई, डॉ. करण सिंग, डॉ. एम.एस. स्वामिनाथन, न्यायमूर्ती लीला सेठ, रामनाथ कोविंद, अरुण जेटली, अजित डोवाल, डॉ. एस. जयशंकर, जनरल बिपिन रावत, डॉ. एस. सोमनाथ यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, या व्याख्यानाच्या 66 व्या आवृत्तीमध्ये केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आपले विचार व्यक्त केले होते.
विविध विषयांवरील विचारधन, संकल्पना आणि दृष्टिकोनांचे एक भांडार म्हणून हा वार्षिक कार्यक्रम काम करत आहे आणि आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृती आणि विकासात्मक समस्यांच्या अनेक पैलूंची अथांग व्याप्ती व खोली चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे एक साधन ठरला आहे.
गेल्या काही वर्षांत, भारताला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही व्याख्याने मौल्यवान ज्ञानाचे भांडार बनली आहेत. विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींनी त्यांच्या बौद्धिक योगदानाने या व्याख्यानमालेला एक अतुलनीय वारसा बनवण्यास मदत केली आहे.
या कार्यक्रमात प्रवेश सर्वांसाठी खुला असून सभागृहातील जागांच्या उपलब्धतेनुसार 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर असेल.
मागील सरदार पटेल स्मृती व्याख्याने
प्रसार भारतीच्या अधिकृत यूट्यूब अर्काइव्हवर ख्यातनाम नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेच्या मागील आवृत्ती पहा.
व्याख्याने पहा: https://youtube.com/playlist?list=PLqtVCj5iilH4WmBlnHhj3XiR_v0E7elJh&si=TxICk_ChZVu5V5Rj
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai