Posted On:
22 OCT 2026 4:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2026 दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या 'काशी तमिळ संगमम'च्या पाचव्या आवृत्तीच्या (KTS 5.0) नोंदणी पोर्टलचे आज उद्घाटन केले. तमिळनाडू आणि काशी या दोन प्राचीन ज्ञानपीठांमधील युगानुयुगांचे सांस्कृतिक संबंध पुनरुज्जीवित करणे, दृढ करणे आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला बळकट करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
प्राचीन काळापासून देशात एक मजबूत सांस्कृतिक एकता राहिली आहे, असे पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. अनेक लोक आपल्या धार्मिक परंपरांचा एक भाग म्हणून काशी आणि रामेश्वरमला भेट देत आले आहेत, जे भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधील खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे, असे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, लेखक, व्यावसायिक, शेतकरी, कलाकार, महिला आणि आध्यात्मिक विद्वानांना एकाच व्यासपीठावर आणेल, असे त्यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांना काशी तमिळ संगममच्या उद्दिष्टांशी परिचित करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक जनजागृती उपक्रम राबवले जातील यावरही त्यांनी भर दिला. काशी तमिळ संगममने राष्ट्रीय एकता मजबूत करण्यात आणि भारताच्या सामायिक नागरी वारशाचा उत्सव साजरा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, याचा केंद्रीय मंत्र्यांनी पुनरुच्चार केला.

काशी तमिळ संगममचे 2022 मध्ये पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते आणि गेल्या चार आवृत्त्यांमध्ये या दोन्ही प्रदेशांदरम्यान ज्ञान, भाषा, परंपरा आणि जीवनानुभवांची अर्थपूर्ण देवाणघेवाण झाली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा उच्च शिक्षण विभाग, आयआयटी मद्रास , बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT) चेन्नई, उत्तर प्रदेश सरकार आणि संस्कृती, रेल्वे, शाळा शिक्षण, पर्यटन, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, माहिती आणि प्रसारण, कौशल्य विकास आणि उद्योजकता इत्यादी केंद्रीय सरकारी विभाग/मंत्रालयांच्या सहकार्याने करत आहे.
2026 ची संकल्पना: "तिरुक्कुरळ पयिल्वम – तिरुक्कुरळ अभ्यास करें"
"तिरुक्कुरळ पयिल्वम - तिरुक्कुरळ अभ्यास करें" ही केटीएस 5.0 ची संकल्पना आहे. 'तिरुक्कुरळ' या अभिजात तमिळ ग्रंथातील कालातीत नैतिक आणि आचारविचारांचे ज्ञान देशातील तरुण आणि शिकणाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे करून देणे हा या पाचव्या आवृत्तीचा उद्देश आहे. शैक्षणिक सहभाग, बहुभाषिक संसाधने आणि व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून या ग्रंथात अंतर्भूत असलेली सार्वभौमिक मूल्ये दैनंदिन जीवनात वाचण्यास, समजून घेण्यास आणि अंमलात आणण्यास प्रोत्साहन देण्याचा या कार्यक्रमाचा प्रयत्न आहे.

सहभाग आणि प्रवास कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत, तामिळनाडूतील सुमारे 1,400 सहभागी व्यक्तींना प्रत्येकी 200 जणांच्या सात गटांत विभागले जाईल. हा आठ दिवसांचा प्रवास असेल, ज्यामध्ये चार दिवस प्रवासासाठी आणि चार दिवस विविध भेटी व नियोजित कार्यक्रमांसाठी असतील. या प्रवास कार्यक्रमात वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या यांचा समावेश असेल, जिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, क्षेत्र-विशिष्ट आणि आध्यात्मिक उपक्रम राबवले जातील. तरुणांच्या सहभागावर विशेष भर दिला गेल्यामुळे, नवीन पिढीला भारताच्या अभिजात ज्ञानपरंपरांशी अर्थपूर्णरीत्या जोडले जाण्याची आणि त्यातील मूल्ये आपल्या समकालीन शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक जीवनात रुजवण्याची संधी मिळेल.
नोंदणी तपशील
इच्छुक अर्जदार 22 ऑक्टोबर 2026 पासून आयआयटी मद्रास द्वारे संचालित अधिकृत पोर्टल https://kashitamil.iitm.ac.in/ वर नोंदणी करू शकतात. हे पोर्टल 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज स्वीकारेल. अर्ज सात श्रेणींमध्ये केले जाऊ शकतात: (i) विद्यार्थी, (ii) शिक्षक, (iii) लेखक आणि माध्यम व्यावसायिक, (iv) कृषी व संबंधित क्षेत्रे, (v) व्यावसायिक आणि कारागीर, (vi) महिला आणि (vii) आध्यात्मिक नेते.
केटीएस 5.0 अंतर्गत प्रमुख उपक्रम
- देशभरातील 1,000 उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी सहभाग कार्यक्रम राबवला जाईल. याचा उद्देश विविध शैक्षणिक शाखा आणि भाषिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिरुक्कुरल बद्दल अधिक व्यापक समज निर्माण करणे हा आहे. या उपक्रमात तिरुक्कुरल मधील शिकवण आणि मूल्ये सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पद्धतशीर अभ्यास, संशोधन आणि कॅम्पस-आधारित उपक्रमांचा समावेश असेल. अधिक तपशील चेन्नई येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळच्या www.kts.cict.in या पोर्टलवर उपलब्ध आहेत.
- तामिळनाडूतील तिरुक्कुरल तज्ज्ञ वाराणसीतील विविध शाळा आणि महाविद्यालयांना भेट देतील. ते ओरिएंटेशन मॉड्यूल्स, संवादात्मक सत्रे आणि प्रश्नमंजुषा यांसारख्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना या ग्रंथातील मुख्य मूल्यांची ओळख करून देतील. नॅशनल बुक ट्रस्ट आणि राष्ट्रीय ई-पुस्तकालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाराणसीतील शाळांमध्ये वाचन सवयी, कथाकथन आणि सर्जनशील उपक्रमांवर आधारित संवादात्मक सत्रे आयोजित केली जातील.
- केटीएस 5.0 मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून तिरुक्कुरलमधील शिकवण संपूर्ण भारतातील अधिक लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. शिक्षण मंत्रालय तामिळनाडूतील पात्र अर्जदारांना, विशेषतः तरुण आणि विद्यार्थ्यांना, काशी तमिळ संगमम 5.0 साठी नोंदणी करण्याचे आणि भारताची सांस्कृतिक एकता, भाषिक विविधता व सामायिक संस्कृती वारशाच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
|
Detail
|
Information
|
|
Registration Portal
|
https://kashitamil.iitm.ac.in/
|
|
Registration Starts on Portal
|
22 October 2026
|
|
Last Date for Registration
|
13 November 2026
|
|
Programme Dates
|
28 November – 12 December 2026
|
|
Location
|
Varanasi, Prayagraj, Ayodhya
|
|
Theme
|
“Thirukkural Payilvom – Thirukkural Abhyas Karen”
|
|
Number of Participants
|
Around 1,400 (7 groups of ~200 each)
|
* * *
सुषमा काणे/शैलेश पाटील/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai