आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैद्यकीय आस्थापनांमध्ये उपचार आणि आरोग्य सेवांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करण्याचे केंद्र सरकारचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवाहन

Posted On: 12 OCT 2026 2:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026

आरोग्य सेवेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि रुग्ण-केंद्रित सेवा वितरण मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना  वैद्यकीय आस्थापनांद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधांसाठी आकारले जाणारे दर ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, लागू असलेल्या नियामक तरतुदींच्या पालनाचा आढावा घेण्याचे तसेच आरोग्यसेवा दरांची माहिती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना स्पष्टपणे दिसेल आणि सहज उपलब्ध होईल याची खात्री करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्यसेवेतील दरांच्या पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित करताना, केंद्रीय आरोग्य सचिवांनी नमूद केले की, दरांचे ठळक प्रदर्शन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचाराचा संभाव्य खर्च समजण्यास, आरोग्यविषयक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि त्यांच्या वैद्यकीय खर्चाचे नियोजन करण्यास मदत करेल. अधिक पारदर्शकतेमुळे अनावश्यक गोंधळ आणि बिलांसंबंधीचे वाद कमी होण्यास मदत होईल, तसेच आरोग्य सेवा प्रणालीवरील विश्वास वाढण्यासही मदत होईल.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी या प्रकरणात सर्व मुख्य सचिवांचे वैयक्तिक लक्ष वेधले आहे. संबंधित प्राधिकरणे आणि वैद्यकीय आस्थापनांना आवश्यक कार्यवाहीसाठी योग्य सूचना जारी करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. लागू नियमांनुसार, सेवा आणि सुविधांचे दर ठळक, स्पष्टपणे दिसणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी प्रदर्शित केले जातील याची खात्री करण्यासह, आवश्यक कारवाईसाठी संबंधित अधिकारी आणि आरोग्यसेवा आस्थापनांना योग्य सूचना जारी कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.

हा उपक्रम भारत सरकारची आरोग्य सेवा अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि रुग्णांच्या गरजांना प्रतिसाद देण्याची वचनबद्धता अधिक दृढ करतो. यामुळे आरोग्य दरांची  स्पष्ट माहितीची उपलब्धता रुग्ण-केंद्रित सेवेचा एक अविभाज्य भाग बनेल.

 

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2322194) अभ्यागत कक्ष : 5