गृह मंत्रालय
जम्मू-काश्मीरमध्ये गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या, कमांडर मुसा उर्फ आसिफ फौजी ठार
बऱ्याच काळापासून मुसाच्या मागावर असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी त्याला ठार करण्यासाठी आखली होती एक विशेष योजना
भारतीय सुरक्षा दलांनी मुसाला ठार मारल्याने लश्कर-ए-तय्यबाचे मोठे नुकसान
मुसाच्या खात्म्यासह, 2022 पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या आणि अनेक हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या लष्कर-ए-तय्यबाचे चारही महत्वाच्या कमांडर्स चकमकींमध्ये ठार
मुसाला ठार करण्यासाठी चालवलेली ही सध्याची चकमक मे 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रदीर्घ 'ऑपरेशन शेरूवाली'चाच एक भाग
Posted On:
30 SEP 2026 4:09PM by PIB Mumbai
गुप्तचर माहितीवर आधारित सुरक्षा दलांच्या एका संयुक्त मोहिमेत, जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील खानसाहिब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरवतकलान इथे लष्कर-ए-तय्यबाचा वरिष्ठ कमांडर 'मुसा' उर्फ 'आसिफ फौजी' याला ठार करण्यात आले. सुरक्षा दले बऱ्याच काळापासून मुसाच्या मागावर होती. अलीकडेच त्याच्या हालचाली आणि वावराबद्दल तांत्रिक व मानवी गुप्तचर यंत्रणांकडून पक्की माहिती मिळाल्यानंतर, त्याचा खात्मा करण्यासाठी, सर्व संबंधित यंत्रणांना एकत्र घेऊन एक विशेष योजना आखण्यात आली होती.
भारतीय सुरक्षा दलांनी मुसाला ठार मारल्यामुळे, हा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील लष्कर-ए-तय्यबाच्या नेटवर्कला जबर धक्का बसला आहे. मुसाच्या खात्म्यामुळे 2022 पासून या केंद्रशासित प्रदेशात सक्रिय असलेल्या आणि हालन हल्ला (ऑगस्ट 2023), डीकेजी हल्ला (डिसेंबर 2023), कांडी हल्ला (मे 2023), शाहसितार हल्ला (मे 2024), शिव खोरी हल्ला (जून 2024), गगनगीर हल्ला (ऑक्टोबर 2024), बुटापथरी हल्ला (ऑक्टोबर 2025) आणि बैसरन हल्ला (एप्रिल 2025) यांसारख्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या चारही वरिष्ठ एलईटी कमांडर्सची संपूर्ण टोळी आता पूर्णपणे नष्ट झाली आहे.
या टोळीतील इतर दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या चकमकींमध्ये ठार केले होते; ज्यामध्ये जुनैद भट (3 डिसेंबर 2024, दाचीगाम), सुलेमान (28 जुलै 2025, ऑपरेशन महादेव) आणि यासीर (4 सप्टेंबर 2026, ऑपरेशन असधर) यांचा समावेश आहे. मुसाचा खात्मा करण्यासाठी चालवलेली ही सध्याची चकमक दीर्घकाळापासून सुरू असलेल्या ऑपरेशन शेरूवाली या विशेष अभियानाचाच भाग होती.
गेल्या काही वर्षांत, जम्मू आणि काश्मीर पोलीस, लष्कर, आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) यांसारख्या सर्व सुरक्षा यंत्रणांनी परस्परांमध्ये उत्तम समन्वय राखून दहशतवादविरोधी कारवाया राबवल्या आहेत, ज्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
***
राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317213)
अभ्यागत कक्ष : 9