सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पीएम स्मृतिचिन्हे ई-लिलावाच्या आठव्या आवृत्तीचा प्रारंभ
ई-लिलाव 17 सप्टेंबर 2026 पासून अधिकृत पोर्टलद्वारे होणार सुरू
लिलावातून मिळणारा निधी 'नमामि गंगे'उपक्रमाच्या सहाय्यासाठी देणार
Posted On:
16 SEP 2026 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज नवी दिल्ली येथे सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांच्या उपस्थितीत पीएम स्मृतिचिन्हे ई-लिलावाच्या आठव्या आवृत्तीचा शुभारंभ केला. हा लिलाव नागरिक, संग्राहक, संस्था आणि कला तसेच संस्कृती प्रेमींना पंतप्रधानांना विविध प्रसंगी प्रदान करण्यात आलेली अद्वितीय स्मृतिचिन्हे मिळवण्याची संधी देतो. 'पीएम मेमेंटोज ई-लिलावाची' आठवी आवृत्ती 17 सप्टेंबर 2026 पासून www.pmmementos.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे सुरू होईल.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, या भागात एकूण 1,498 स्मृतिचिन्हे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले की, संग्रहातील राज्यनिहाय प्रतिनिधित्व हे भारताची भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता अधिक स्पष्टपणे दर्शवते. त्यांनी नमूद केले की यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, बिहार आणि ओडिशा येथील स्मृतिचिन्हांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शेखावत यांनी पुढे माहिती दिली की, आठव्या भागात 50 'हीरो ऑब्जेक्ट्स' (वीर वस्तू) समाविष्ट आहेत, ज्या संग्रहातील काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे प्रतिनिधित्व करतात.

या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री म्हणाले की, पीएम स्मृतिचिन्हे ई-लिलावाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या लिलावातून मिळणारी रक्कम 'नमामि गंगे' कार्यक्रमासाठी हस्तांतरित केली जाते. ते म्हणाले की, यामुळे भारताचा सांस्कृतिक वारसा आणि गंगा नदीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धनाचे राष्ट्रीय अभियान यांच्यात एक अर्थपूर्ण दुवा निर्माण होतो.
संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आधुनिक कला दालनाने (एनजीएमए) या उपक्रमाचे दस्तावेजीकरण, प्रदर्शन आणि कार्यान्वयन या बाबींमध्ये समन्वय साधला आहे. या प्रक्रियेमध्ये विविध हितधारकांसोबत समन्वय साधला जातो, ज्यामध्ये तांत्रिक आणि पोर्टल-संबंधित सहाय्यासाठी एनआयसी, मूल्यांकन आणि मोजणीसाठी संबंधित प्राधिकरणे, पेमेंट गेटवे सहाय्यासाठी एसबीआय आणि यशस्वीरित्या खरेदी केलेल्या वस्तूंच्या पॅकिंग आणि वितरणासाठी नियुक्त ललित कला हाताळणी एजन्सी यांचा समावेश आहे.
पंतप्रधान स्मृतिचिन्हे ई-लिलाव हा भारताचा वारसा, कला, हस्तकला आणि सांस्कृतिक विविधतेचा गौरव करणारा एक उपक्रम आहे, जो 'नमामि गंगे' कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक सहभागाला चालना देतो आणि एका महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यासाठी योगदान देतो.

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311172)
अभ्यागत कक्ष : 5