पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख सीईओंसोबत सेमीकंडक्टर गोलमेज परिषद संपन्न


भारताच्या सेमीकंडक्टर विकासाच्या पुढील टप्प्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे पंतप्रधानांकडून सीईओंना आवाहन

उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये भारताने सुरुवातीपासूनच आघाडीवर राहण्याची आकांक्षा बाळगण्याची पंतप्रधानांची सूचना

अंदाज बांधता येण्याजोग्या आणि प्रतिसाद देणाऱ्या धोरणात्मक वातावरणाप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार

धोरणात्मक आणि प्रशासकीय उपाययोजनांबाबत सूचना करण्यासाठी पंतप्रधानांनी उद्योगपतींना केले आमंत्रित

सीईओंनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाची आणि भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था मजबूत करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची केली प्रशंसा

सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये क्षमता बांधणी करण्याच्या भारताच्या सामर्थ्यावर सीईओंनी व्यक्त केला विश्वास

Posted On: 16 SEP 2026 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सेवा तीर्थ येथे आघाडीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत सेमीकंडक्टर गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले.

बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी भारताचे तंत्रज्ञानविषयक भविष्य घडवण्यासाठी सरकार आणि सेमीकंडक्टर उद्योग यांच्यातील घनिष्ठ सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी प्रतिभा, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि पायाभूत सुविधा यांच्याशी निगडित असलेला भारताचा भक्कम पाया अधोरेखित केला आणि कौशल्य विकास, नवोन्मेष तसेच एआय आणि क्वांटम कंप्युटिंगसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये उद्योगांच्या अधिक सहभागाचे आवाहन केले. एआयमध्ये एक कोटी लोकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्दिष्टाचा संदर्भ देत ते म्हणाले की भारताकडील प्रतिभावान मनुष्यबळ आणि जागतिक उद्योगपतींचा अनुभव व क्षमता यांच्या संयोगातून महत्त्वपूर्ण संधी निर्माण होऊ शकतात.

पंतप्रधान म्हणाले की उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये भारताने सुरुवातीच्या काळात आघाडीवर राहण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे. त्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीची नोंद घेतली आणि सांगितले की ही परिसंस्था आता पायाभूत प्रयत्नांमधून संधींच्या मोठ्या प्रमाणावरील टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

पंतप्रधानांनी अंदाज बांधता येण्याजोग्या आणि प्रतिसाद देणाऱ्या धोरणात्मक वातावरणाप्रति सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली, तसेच तांत्रिक प्रगती आणि उद्योगाच्या गरजांनुसार धोरणांमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी उद्योगपतींना धोरणात्मक आणि प्रशासकीय उपाययोजनांवर सूचना देण्यासाठी आमंत्रित केले आणि या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या सूचनांचा योग्य विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यांनी उद्योगपतींना भारताच्या सेमीकंडक्टर विकासाच्या पुढील टप्प्यात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताची सेमीकंडक्टर क्षमता विकसित करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले आणि उत्पादन, आरेखन, पायाभूत सुविधा व प्रतिभा विकासात झालेल्या प्रगतीची नोंद घेतली. त्यांनी आयएसएम 2.0 अंतर्गत निर्माण होणाऱ्या संधींवर आणि उत्पादन, संशोधन व विकास, प्रगत तंत्रज्ञान व सहाय्यक उद्योगांसह संपूर्ण सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये क्षमता निर्माण करण्याच्या भारताच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाची आणि पाठिंब्याची प्रशंसा करत त्यांनी सांगितले की अलिकडच्या काळात झालेल्या प्रगतीने पुढील औद्योगिक सहभागासाठी एक मजबूत पाया तयार केला आहे. भारताला स्पर्धात्मक सेमीकंडक्टर आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून जागतिक स्तरावर उदयास आणण्यासाठी योगदान देण्याची आपली वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीला एस ईएम आय, मायक्रॉन,इन्फिनिऑन, अप्लाइड मटेरियल्स,ए एस एम एल, मर्क, टोक्यो इलेक्ट्रॉन लिमिटेड, फुजी फिल्म, ए एम डी, इन्टेल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, लॅम रिसर्च, रॅपिडस, एन एक्स पी, फॉक्सकॉन, सेमी कंडक्टर डिव्हायसेस, ॲडव्हान्टेस्ट, सेलेस्टा कॅपिटल, सीजी पॉवर, आय बी एम रिसर्च

यांसारख्या विविध संस्थांचे सीईओ, प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

 

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2311145) अभ्यागत कक्ष : 6