माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अभिनेता अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान आणि चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2024 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवणार
गुजरातमधील केवडिया येथे 22 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार करणार प्रदान
Posted On:
16 SEP 2026 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
केंद्र सरकारने जाहीर केले आहे की, दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार, ज्येष्ठ अभिनेता अनंत नाग यांना, भारतीय चित्रपटसृष्टीची प्रगती आणि विकासाकरता त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत, प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 प्रदान केला जाईल. हा पुरस्कार पाच दशकांहून अधिककाळ चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या गौरवशाली प्रवासाची दखल घेणारा आहे. कलाकारांच्या अनेक पिढ्यांना अभिनेता अनंत नाग यांनी प्रेरणा दिली, आणि देशाचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. गुजरातमधील केवडिया येथे 22 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
अनंत नाग यांच्याविषयी -
अनंत नाग (जन्म 4 सप्टेंबर 1948, कर्नाटक) हे एक दिग्गज भारतीय अभिनेते आहेत. त्यांचे कला क्षेत्रातील अष्टपैलुत्व आणि त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानासाठी ते ओळखले जातात. त्यांनी 'संकल्प' या कन्नड चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि 'अंकूर' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी कन्नड, हिंदी, तेलगू, मल्याळम, तमिळ आणि मराठी अशा विविध भाषांमधील 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या, यात 'मालगुडी डेज'सारख्या उल्लेखनीय कलाकृतींचाही समावेश आहे.
अनंत नाग यांना कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार आणि कर्नाटक राज्य जीवनगौरव पुरस्कार, यासह पाच फिल्मफेअर पुरस्कार आणि पाच कर्नाटक राज्य सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले असून, बंगळुरू विद्यापीठातून (उत्तर) त्यांनी मानद डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे. 2023 मध्ये, त्यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला.
चित्रपटसृष्टीव्यतिरिक्त, अनंत नाग यांनी 1988 ते 1994 या काळात कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आणि 1994 ते 1999 या काळात विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांनी बंगळुरू नगर विकास राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. भारत सरकारने 2025 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. अनंत नाग, हे भारतातील सर्वात आदरणीय सांस्कृतिक व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत, त्यांचे अष्टपैलुत्व, नम्रता आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी ते ओळखले जातात.
दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी -
1913 मधील राजा हरिश्चंद्र या भारतातील पहिल्या पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दादासाहेब फाळके यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने 1969 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. या वर्षीचा पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देविका राणी यांना प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपट क्षेत्राची वृद्धी आणि विकासात अतुलनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना चित्रपट क्षेत्रातील या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात येते. सुवर्ण कमळ, पदक, शाल आणि 10 लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311117)
अभ्यागत कक्ष : 14