शिक्षण मंत्रालय
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा एक भाग म्हणून 11-12 सप्टेंबर 2026 असे दोन दिवस ब्रिक्स भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि ब्रिक्स शिष्टमंडळाचे प्रमुख या प्रदर्शनाला भेट देण्याची शक्यता
या कार्यक्रमात डीप टेक क्षेत्रातील 37 भारतीय नवोन्मेषक सहभागी होणार
Posted On:
11 SEP 2026 12:58PM by PIB Mumbai
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे येत्या 11-12 सप्टेंबर 2026 असे दोन दिवस भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासोबतच्या समन्वयाने या प्रदर्शनाचे आयोजन केले जाईल. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित होणाऱ्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषद 2026 च्या पार्श्वभूमीवर, समांतरपणे देशातील डीप टेक क्षेत्राशी संबंधीत नवोन्मेष जगासमोर मांडण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.

भारत इनोव्हेट्स हा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. भारतीय उच्च शिक्षण परिसंस्थेतील नवोन्मेषाला गती देणारा एक जागतिक सहाय्यक घटक (ॲक्सिलेटर) अशा दृष्टीकोनातून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील नवोन्मेष परिसंस्था (स्टार्टअप्स, उच्च शिक्षण संस्था, प्रयोगशाळा आणि संशोधन संकुले) आणि जागतिक भागधारकांमध्ये (कंपन्या, गुंतवणूकदार, इनक्युबेटर्स/गती देणारा सहाय्यक घटक, विद्यापीठे, संशोधन संस्था, सरकारे आणि परदेशात स्थित माजी विद्यार्थी) यांच्यात दीर्घकालीन सहकार्यपूर्ण भागिदारी स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.
याआधी 14-16 जून 2026 दरम्यान फ्रान्समधील नीस इथे देशातील डीप टेक क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठीचे भारत इनोव्हेट्सच्या पहिल्या पर्वाचे आयोजन केले गेले होते. त्यानंतर आता भारत मंडपम इथे आयोजित होणारे हे ब्रिक्स भारत इनोव्हेट्स प्रदर्शन, 2026 दुसरे मोठे प्रदर्शन ठरले आहे.

लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची संकल्पना आहे. या संकल्पाला अनुसरून, या प्रदर्शनात देशाच्या डीप टेक क्षेत्रातील 37 स्टार्टअप्स आणि उद्योग व्यवसाय (नीस इथे झालेल्या BI2026 मध्ये सहभागी झालेल्या मूळ 120 स्टार्टअप्सच्या समूहापैकी) आपली सादरीकरणे करणार आहेत.
11 सप्टेंबर 2026 रोजी ब्रिक्स व्यवसाय मंचाचे आयोजन केले जाणार आहे, त्याला समांतर या प्रदर्शनाचेही आयोजन केले जाणार आहे. या सहभागी झालेल्या नवोन्मेषकांना ब्रिक्स सदस्य देशांतील मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे आणि उद्योग व्यवसाय क्षेत्राच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे दोन उद्योग व्यवसायांमधील थेट संवाद (B2B), तंत्रज्ञान भागीदारी, गुंतवणुकीबाबतची चर्चा, व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षते अंतर्गत 2026 साठी प्राधान्यक्रमाची पाच क्षेत्र निश्चित करण्यात आली होती. त्याअंतर्गत संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअप परिसंस्थेची प्रगती हे देखील ब्रिक्सच्या शैक्षणिक उद्दिष्टांअंतर्गतचे प्राधान्यक्रमावरचे एक क्षेत्र आहे. या प्रदर्शनामुळे या क्षेत्रालाही पुढची दिशा मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि ब्रिक्स देशांचे नेते या प्रदर्शनाला भेट देण्याची शक्यता आहे. ब्रिक्स नेत्यांच्या उपक्रमांशी जोडलेले वरिष्ठ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी तसेच ब्रिक्स सदस्य देशांमधील मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि उद्योग व्यवसाय क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे देखील 11-12 सप्टेंबर 2026 दरम्यान या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे.
***
निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2309256)
अभ्यागत कक्ष : 5