माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या 22 सप्टेंबर रोजी गुजरातच्या केवडिया मधील एकता नगर येथे 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
Posted On:
08 SEP 2026 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026
राष्ट्रपती 22 सप्टेंबर 2026 रोजी गुजरातच्या केवडिया मधील एकता नगर येथे 72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करतील. या सोहळ्यानिमित्त देशभरातील चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ आणि इतर कलाकार एकत्र येऊन 2024 या वर्षातील भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करतील.
1954 मध्ये सुरू झालेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिले जाणारे देशातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. गेल्या सात दशकांहून अधिक काळापासून, कथा आधारित चित्रपट (फीचर फिल्म), कथाबाह्य चित्रपट (नॉन-फीचर फिल्म) आणि चित्रपटविषयक लेखन यांमधील उत्कृष्ट सर्जनशील व तांत्रिक कामगिरीला हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. भारतीय चित्रपट निर्मितीमधील समृद्ध भाषिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक विविधतेचे प्रतिबिंब यातून दिसून येते.
एका महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयाद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा केवळ राजधानीपुरता मर्यादित न ठेवता देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी एकता नगर येथे होणारा हा सोहळा संपूर्ण भारतातील चित्रपट क्षेत्रातील प्रतिभावान कलाकारांना एकत्र आणेल आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेचे दर्शन घडवेल.
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या निमित्ताने विविध भाषा, शैली आणि चित्रपट प्रकारांमधील विविधता साजरी केली जाणार आहे. 'आर्टिकल 370 या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म'चा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. परीक्षकांनी 'भंगार' या चित्रपटाची 'सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म' आणि 'राम-नामी' या चित्रपटाची 'सर्वोत्कृष्ट माहितीपट' म्हणून निवड केली आहे. 'ब्रह्मयुगम' साठी ममूटी आणि 'चंदू चॅम्पियन' साठी कार्तिक आर्यन यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार जाहीर झाला आहे, तर 'आर्टिकल 370’ साठी यामी गौतमला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्काराने सन्मानित केले जाईल. तर , 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी रणदीप हुडाला ' पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कार मिळेल.
मराठी, संथाली, तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, तुलू आणि गढवाली यासह इतर भाषांमधील आणि प्रकारांमधील चित्रपटांतील उत्कृष्टतेलाही सन्मानित करण्यात येते. 'कल्की 2898 एडी', 'अमरन', 'पुष्पा: द रुल पार्ट-02', 'भूल भुलैया 3' आणि 'स्त्री 2' यासह अनेक चित्रपटांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रथमच संथाली चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या नॉन फीचर चित्रपट विभागात गौरविण्यात येणार आहे.
चित्रपटविषयक सर्वोत्कृष्ट लेखन श्रेणीमध्ये संजीव श्रीवास्तव यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. प्रदीप केन्चनुरू यांनी लिहिलेल्या आणि मिरर पुस्तक यांनी प्रकाशित केलेल्या ‘नानिरुवुडे निमगागी नादिरुवुडे नानागागी: कन्नड सिनेमाडा थथवा मत्तु राजकीय’ (आय स्टँड फॉर यू, द स्टेट स्टँड्स फॉर अस: पोलिटिकल अँड फिलॉसॉफिकल डायमेन्शन्स ऑफ कन्नड सिनेमा) या पुस्तकाला सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307841)
अभ्यागत कक्ष : 16