महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी 9 सप्टेंबर रोजी वाराणसी येथे 9 व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 कार्यक्रमाचा शुभारंभ करणार
पोषण आणि बालविकासाकरता अंगणवाडी केंद्रांना समुदायाच्या नेतृत्वाखालील कृतीच्या केंद्रस्थानी आणणारी "हमारी अंगणवाडी हमारी जिम्मेदारी" संकल्पना
समुदायाची मालकी आणि उत्तरदायित्व ही पोषण महिन्याची प्रमुख संकल्पना
अलीकडेच जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व अंगणवाडी केंद्रांवर 'अंगणवाडी व्यवस्थापन समित्या' जलद गतीने स्थापन करण्याच्या आणि कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला या संकल्पनेमुळे गती मिळणार
प्रथमच गरम शिजवलेल्या जेवणाची व्याख्या आणि एसएनपी मेनू बोर्ड आणि अंगणवाडी व्यवस्थापन समित्यांच्या स्थापनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे अनिवार्य करून सुधारित एसएनपी मार्गदर्शक तत्त्वांद्वारे यंदाच्या मोहिमेला गती मिळाली
पोषण माह 2026 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची 10 वर्षे साजरी करणार
या महत्वाकांक्षी मातृत्व लाभ कार्यक्रमाने मातांचे पोषण आणि आरोग्यविषयक सकारात्मक वर्तणुकीला दशकभरापासून आधार दिला
विकसित भारत 2047 चा पाया म्हणून सुपोषित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महिनाभर चालणार्या ‘पोषण माह 2026’ कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
07 SEP 2026 10:46AM by PIB Mumbai
महिला आणि बाल विकास मंत्रालय, 9 सप्टेंबर 2026 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रुद्राक्ष इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे 9 व्या ‘राष्ट्रीय पोषण माह 2026’ चा शुभारंभ करणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ करतील. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि उत्तर प्रदेशच्या महिला कल्याण, बालविकास आणि पोषण विभागाच्या कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्य यावेळी उपस्थित राहतील. केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मान्यवर, विकास भागीदार, आघाडीचे कर्मचारी आणि लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील.
2047 पर्यंत 'विकसित भारता'चा पाया म्हणून 'सुपोषित भारत' घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून, पोषण अभियानाला राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी 2018 मध्ये पोषण अभियान सुरू करण्यात आले. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा होणारा 'राष्ट्रीय पोषण माह' आता एका 'जनआंदोलना'त रूपांतरित झाला आहे. हे आंदोलन महिला, मुले आणि किशोरवयीन मुलांमधील पोषण, आरोग्य आणि काळजी घेण्याशी संबंधित चांगल्या सवयींना बळकट करण्यासाठी समुदायांना एकत्र आणते. या उपक्रमाची नववी आवृत्ती "हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी", अर्थात ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेअंतर्गत पुढे नेण्यात आला आहे. ही संकल्पना प्रत्येक नागरिकाला अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करते, कारण अंगणवाडी केंद्र हे देशातील मुलांसाठी पोषण, आरोग्य, काळजी आणि प्रारंभिक शिक्षणाचे पहिले केंद्र आहे.
या वर्षीच्या मोहिमेला 'मिशन सक्षम अंगणवाडी' आणि 'पोषण 2.0' अंतर्गत सुधारित 'पूरक पोषण कार्यक्रम' (एसएनपी) मार्गदर्शक तत्त्वांमुळे गती मिळाली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रथमच 'गरम शिजवलेले जेवण' याची व्याख्या करण्यात आली असून, एसएनपी मेनू फलक लावणे आणि अंगणवाडी व्यवस्थापन समित्यांची स्थापना करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सुधारणांच्या आधारे, 'पोषण माह 2026' ची अंमलबजावणी एकमेकांना पूरक अशा पाच प्रमुख संकल्पनांवर आधारित असेल.
'आहारातील विविधता आणि पुरेशी प्रथिने' या पहिल्या संकल्पनेअंतर्गत, अंगणवाडी केंद्रांमध्ये सर्व खाद्य गटांमधील परवडणाऱ्या, स्थानिक घटकांचा वापर करून तयार केलेल्या आरोग्यदायी पाककृतींचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल, तसेच 'पोषण मेळावे' आणि 'प्रथिनेयुक्त पदार्थ' मोहिमेद्वारे संतुलित आहार आणि दैनंदिन आहारात वनस्पती आणि प्राणीजन्य प्रथिनांचा समावेश करण्याच्या व्यावहारिक पद्धतींना प्रोत्साहन दिले जाईल.
या अनुषंगाने, अंगणवाडी केंद्रांमधील 'ताजे व गरम शिजवलेले अन्न' या संकल्पने अंतर्गत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भरडधान्ये, कडधान्ये आणि हंगामी भाज्यांचा समावेश असलेल्या साप्ताहिक मेनूची अंमलबजावणी करायला प्रोत्साहन दिले जाईल. या उपक्रमाला एचसीएम प्रात्यक्षिके आणि पालक, पंचायती, स्वयं-सहायता गट आणि अंगणवाडी व्यवस्थापन समित्या यांच्या सहभागातून आयोजित केल्या जाणाऱ्या 'अन्नाची चव घेण्याच्या’ सामुहिक सत्रां'ची जोड दिली जाईल.
या सेवांच्या वितरणात अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी, 'सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व' ही 'पोषण माह'ची तिसरी प्रमुख संकल्पना म्हणून निश्चित करण्यात आली आहे. 25 जून 2026 रोजी मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व अंगणवाडी केंद्रांवर 'अंगणवाडी व्यवस्थापन समित्या' स्थापन करण्याच्या आणि त्या कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळेल. 'पोषण माह' अंतर्गत, सेवा पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आणि लोकसहभाग बळकट करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर किमान एक एएमसी बैठक आयोजित केली जाईल. दैनंदिन आहारसूची (मेनू) आणि लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती सर्वांना व्हामिळावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर 'पूरक पोषण आहार कार्यक्रम' (एसएनपी) चे मेनू फलक लावले जातील. तसेच, एएमसी आणि माता समित्यांद्वारे आहाराचा दर्जा आणि मेनूच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जाईल.
मुलांच्या आहाराचा त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडतो हे लक्षात घेऊन, 'बालविकासासाठी पोषण, प्रारंभिक उत्तेजन आणि शिक्षण', ही 'पोषण माह'ची चौथी संकल्पना, मुलांच्या विकासाच्या पायाभूत वर्षांमधील त्यांचे आरोग्य, विकास आणि शिक्षण याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करते. 0 ते 3 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, अंगणवाडी सेविका 'नवचेतना'च्या मार्गदर्शनाखाली आणि सुधारित 'गृहभेट वेळापत्रका'च्या आधारे कुटुंबांपर्यंत पोहोचतात. याद्वारे त्या मुलांची योग्य प्रकारे काळजी घेण्याबाबत आणि वयानुसार विविध उपक्रमांद्वारे त्यांना सुरुवातीच्या टप्प्यावर चालना देण्याबाबत मार्गदर्शन करतात, तसेच मुलांच्या विकासाच्या 34 प्रमुख टप्प्यांचे निरीक्षण करतात. 'पोषण माह' (Poshan Maah) दरम्यान, सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये 0-3 वर्षे वयोगटातील नोंदणीकृत मुलांच्या विकासाचे टप्पे नोंदवण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जाईल. तसेच, आरोग्य विभाग आणि 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' (आरबीएसके) यांच्या समन्वयाने, 'ग्राम आरोग्य, स्वच्छता आणि पोषण दिवस' (व्हीएचएसएनडी) कार्यक्रमांतर्गत ज्या मुलांना विशेष वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज असेल, त्यांना त्वरित पुढील उपचारांसाठी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, अंगणवाडी केंद्रे 'आधारशिला' आणि खेळावर आधारित उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणाला सहाय्य करतात. 'पोषण माह' अंतर्गत, 3-6 वर्षे वयोगटातील मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणाचे सादरीकरण करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये पालक-पाल्य सहभागासह 'बालपणकालीन निगा आणि शिक्षण' (ईसीसीई) दिवस साजरा केला जाईल. प्रत्येक केंद्र 5-6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जवळच्या सरकारी प्राथमिक शाळांना भेटींचे आयोजन करेल, तसेच खेळणी आणि खेळण्या-शिकण्याच्या साहित्यासाठी समुदायाच्या पुढाकाराने संसाधने जमा करण्याच्या मोहिमा राबवेल. ही केंद्रे पोषण आणि बालसंगोपन पद्धतींवर आधारित सामुदायिक प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करतील. तसेच, पारंपरिक बालसंगोपन पद्धती, नवजात बालकांची काळजी आणि पालक-बालक संवाद यांवरील माहितीपर (आयईसी) व्हिडिओंचे सामुदायिक प्रदर्शनही आयोजित केले जाईल.
शेवटी, 'पोषण माह 2026' अंतर्गत 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजने'ची (पीएमएमव्हीवाय) दहा वर्षे साजरी केली जातील. ही योजना मातांचे पोषण आणि आरोग्यविषयक सकारात्मक वर्तणुकीला गेल्या दशकापासून आधार देणारा एक प्रमुख मातृत्व-लाभ कार्यक्रम आहे. या उपक्रमांतर्गत 100% व्याप्ती साध्य करण्यासाठी पात्र गर्भवती आणि स्तनदा मातांची नोंदणी केली जाईल, 'थेट लाभ हस्तांतरण' प्रक्रियेला गती दिली जाईल आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्थानिक गरजांनुसार योजनेची अंमलबजावणी करायला सहाय्य करणारे 'पीएमएमव्हीवाय टूलकिट' सादर केले जाईल.
शुभारंभ सोहळा
उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पोषण मेळ्याची पाहणी आणि दीपप्रज्वलनाने होईल. यामध्ये 'गरम शिजवलेले अन्न', 'टेक-होम रेशन', 'गृहभेटी' आणि 'ईसीसीई', याबाबत लाभार्थ्यांचे अनुभव सांगणारे व्हिडिओ दाखवले जातील. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि अंगणवाडी सेविका यांच्यात थेट संवाद होईल. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि पोषण माह 2026 च्या शुभारंभानिमित्त तयार केलेल्या चित्रपटांचे सादरीकरण झाल्यानंतर, मान्यवरांच्या हस्ते या मोहिमेचा औपचारिकपणे शुभारंभ होईल.
राष्ट्रीय पोषण माह 2026, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंगणवाडी केंद्रे, शाळा, पंचायती आणि कुटुंबांमध्ये सामुदायिक कार्यक्रमांद्वारे साजरा केला जाईल आणि सुपोषित अपत्य ही प्रत्येक नागरिकाची सामायिक जबाबदारी असून, हा विकसित भारताचा भक्कम पाया आहे, याचा पुनरुच्चार केला जाईल.
***
NehaKulkarni / RajshreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307735)
अभ्यागत कक्ष : 35
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada