वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती उद्या नवी दिल्ली येथे राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार


एनआयएफटीच्या देशभरातील 18 परिसरांमधील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संयुक्त दीक्षांत समारंभ

Posted On: 30 AUG 2026 12:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2026

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 31 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था अर्थात एनआयएफटीच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात देशभरातील एनआयएफटीच्या 18 कॅम्पसमधील पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यासोबतच संस्थेतील त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सांगता होईल. या प्रसंगी पदवीधर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, सर्जनशीलता, समर्पण आणि त्यांनी मिळवलेल्या यशाचा गौरवही करण्यात येणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह हे देखील या समारंभाला उपस्थित राहणार असून, त्यांच्यासोबत इतर मान्यवर, संचालक मंडळाचे सदस्य, वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापकवर्ग, संशोधक आणि पदवीधर विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

या दीक्षांत समारंभात निफ्टच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात येणार असून, संस्थेतील त्यांच्या शैक्षणिक वर्षांतील शैक्षणिक गुणवत्ता, सर्जनशीलता, समर्पण आणि योगदानाची दखल घेण्यात येणार आहे. प्रत्येक परिसरातील प्रत्येक अभ्यासक्रमामधील सर्वाधिक सीजीपीए प्राप्त करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संयुक्त दीक्षांत समारंभानंतर परिसरनिहाय पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहेत. या समारंभांमध्ये पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या औपचारिकरीत्या प्रदान करण्यात येतील आणि त्यांच्या शैक्षणिक जीवनातून व्यावसायिक जगतातील प्रवेशाचा टप्पा अधोरेखित केला जाईल.

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत 1986 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था अर्थात निफ्ट ही निफ्ट अधिनियम, 2006 अन्वये संचालित वैधानिक संस्था आहे. गेल्या काही वर्षांत ही संस्था फॅशन शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून उदयास आली आहे. या संस्थेने पारंपरिक कला आणि हस्तकला, शैक्षणिक ज्ञान, डिझाइनमधील नवोन्मेष, तंत्रज्ञान, सर्जनशील विचार आणि उद्योग क्षेत्राशी असलेला सहभाग यांचा एकत्रित समन्वय साधला आहे. देशभरात 20 व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित परिसर असलेली राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था अर्थात निफ्ट, सर्वसमावेशक आणि गतिमान शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य सुरू ठेवत आहे. भारताच्या फॅशन आणि सर्जनशील उद्योग क्षेत्रात योगदान देण्यासाठी तरुण प्रतिभावंतांना आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि सर्जनशील क्षमता प्रदान करून त्यांना सक्षम केले जात आहे.

संयुक्त दीक्षांत समारंभ 2026 हा कल्पनांचे संधींमध्ये आणि सर्जनशीलतेचे परिणामकारक योगदानामध्ये रूपांतर करण्याचे शिक्षण घेतलेल्या एका पिढीच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा क्षण असेल. निफ्टमधून पदवीधर विद्यार्थी बाहेर पडताना, नवीन विचार मांडण्याचा, अर्थपूर्ण उपाय निर्माण करण्याचा आणि भारताच्या विकसित होत असलेल्या सर्जनशील क्षेत्रात योगदान देण्याचा आत्मविश्वास ते आपल्यासोबत घेऊन जातील. निफ्टमधील त्यांचा प्रवास औपचारिकदृष्ट्या पूर्ण होत असला, तरी कल्पनाशक्ती, नवोन्मेष आणि उत्कृष्टतेचा त्यांचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरु होत आहे.

हा क्षण यशाचा उत्सव साजरा करण्याबरोबरच भविष्यासाठी नवी सुरुवात करण्याचे व्यासपीठ ठरणार आहे. पदवीधर विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासोबतच, नव्या भारताच्या फॅशन, डिझाइन आणि सर्जनशील परिसंस्थेला आकार देण्यात ते भविष्यात बजावणार असलेल्या भूमिकेकडेही यावेळी पाहिले जाणार आहे. त्यांच्या प्रतिभा, उद्यमशीलता आणि दूरदृष्टीमध्ये अधिक सर्जनशील, नाविन्यपूर्ण आणि जागतिक स्तरावर अधिक जोडलेल्या विकसित भारताचे आश्वासन आहे. निफ्टच्या सर्जनशीलता आणि उत्कृष्टतेच्या भावनेत रुजलेली ही पदवीधर विद्यार्थ्यांची तुकडी भारताच्या फॅशन आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये नवीन विचार आणि कथनांना आकार देण्यासाठी सज्ज आहे. संस्थेतील त्यांचा प्रवास पूर्ण होत आहे; मात्र नवोन्मेष आणि परिणामकारक योगदानाचा त्यांचा प्रवास आता सुरू होत आहे.

 

* * *

हर्षल आकुडे/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304634) अभ्यागत कक्ष : 7