रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेकडून पेयजल टाकी आणि फिल्टर्सच्या स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी विशेष मोहीम


पेयजल पुरवठा व्यवस्थेची सर्वकष तपासणी आणि दुरुस्ती करण्याचे झोनल रेल्वेला निर्देश; स्थानकनिहाय त्रुटी आणि केलेल्या कारवाईवर देखरेख केली जाणार

प्रविष्टि तिथि: 24 AUG 2026 11:37AM by PIB Mumbai

 

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी सतत उपलब्ध राहावे हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने संपूर्ण रेल्वे जाळ्यांतर्गत पेयजल पिण्याच्या पाण्याच्या टाक्या  पाणी गाळणाऱ्या प्रणालींची स्वच्छता व निर्जंतुकीकरणावर भर असलेली एक विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

हा उपक्रम भारतीय रेल्वेमध्ये सर्वत्र पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन बळकट करण्यासाठीच्या व्यापक कृती योजनेचा एक भाग आहे. ही कृती योजना केवळ अंतिम टप्प्यातील पाणी तपासणीवर अवलंबून न राहता, स्रोताच्या ठिकाणी तसेच वापराच्या ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासोबतच, संपूर्ण पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची नियमित पाहणी आणि देखभालीवर भर देणारी आहे.

या मोहिमेदरम्यान, झोनल रेल्वेद्वारे पाण्याचे स्रोत, प्रक्रिया आणि गाळणी प्रणालीचे प्रकल्प, भूमीगत व ओव्हरहेड टाक्या, पीव्हीसी टाक्या, वॉटर बूथ, नळ आणि पाणी वितरण केंद्रांची सर्वकष तपासणी केली जाईल. पिण्याच्या पाण्याच्या सर्व टाक्या रिकाम्या करून, त्यातील गाळ काढून, त्या घासून स्वच्छ केल्या जातील आणि त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. टाक्यांना घट्ट झाकणे बसवणे आणि हवा खेळती ठेवणाऱ्या नलिका व पाणी पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी वाहून घालवण्यासाठी असलेल्या भागांचे पक्षी, प्राणी आणि शेवाळापासून योग्य संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी देखील उपाययोजना केल्या जातील.

या मोहिमेत दुरुस्तीची गरज असलेल्या त्रुटींनाही विचारात घेतले जाईल. पिण्याचे पाणी आणि पिण्यायोग्य नसलेले पाणी यांच्या प्रणालींमध्ये कोणतीही सरमिसळ होणार नाही याची खात्री करत, आवश्यकतेनुसार खराब झालेल्या टाक्या, पाईपलाईन्स आणि फिल्टर्सची दुरुस्ती केली जाईल किंवा ते बदलले जातील. पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीचा भाग असलेल्या सर्व पाईपलाईनची गळतीसाठी तपासणी केली जाईल आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक दुरुस्तीच्या उपाययोजना केल्या जातील.

पिण्याचे पाणी उपसण्यासाठी हातपंप आणि कूपनलिका वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जाईल. अशा प्रणालींमधील पाणी दूषित होणार नाही आणि ते पिण्यासाठी सुरक्षित राहील, याची झोनल रेल्वे खात्री करेल.

पाण्याच्या गुणवत्तेच्या व्यवस्थापनाचे सक्षमीकरण

व्यापक कृती योजनेचा भाग म्हणून, रेल्वे बोर्डाने झोनल रेल्वेला वॉटर कूलर्स आणि पाणी शुद्धीकरण यंत्रणांची सर्वकष तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. वॉटर कूलर्समधील पाण्याच्या टाक्यांची सखोल स्वच्छता केली जाईल, कूलर्स, पाईपलाईन्स आणि नळांमधील गळती तातडीने दुरुस्त केली जाईल आणि वॉटर कूलर वितरण क्षेत्रांच्या आसपास 100 टक्के स्वच्छता सुनिश्चित केली जाईल.

वॉटर कुलर्ससाठीच्या यूव्ही/आरओ शुद्धीकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करत आहेत की नाही याची तपासणी केली जाईल आणि आवश्यक तिथे त्या उपलब्ध करून दिल्या जातील. जिथे सेवा प्रलंबित आहे, तिथे नियमित देखभाल, सर्व्हिसिंग, ओव्हरहॉलिंग आणि फिल्टर कॅन्डल्स व इतर सुट्या भागांची वेळेवर पुनर्स्थापना केली जाईल. स्थिती आणि गरजेनुसार, नवीन किंवा बदलून द्यावयाच्या यूव्ही/आरओ यंत्रणांचे काम एका मोहिमेच्या स्वरूपात हाती घेतले जाईल.

अधिकारी जिथे शक्य असेल तिथे पाण्याचे स्रोत, प्रक्रियेनंतरचे आऊटलेट्स, टाक्या, कूलर्स, वेंडिंग मशिन्स आणि प्रातिनिधिक नळ किंवा बूथ यांसारख्या चिन्हांकित ठिकाणांवरून पाण्याच्या नमुन्यांची भौतिक, रासायनिक आणि जिवाणूशास्त्रीय चाचणी हाती घेतील. दररोज अवशिष्ट क्लोरिनचे निरीक्षण केले जाईल आणि आवश्यकतेनुसार तातडीने पुन्हा-क्लोरीनीकरण किंवा इतर आवश्यक दुरुस्तीच्या उपाययोजना केल्या जातील.

पायाभूत सुविधांवर देखरेख आणि दुरुस्तीच्या उपाययोजना

रेल्वे बोर्डाने जुन्या टाक्यांच्या जागी नवीन टाक्या बसवणे आणि नवीन भूमीगत व ओव्हरहेड टाक्यांच्या बांधकामासाठी आधीच मंजूर झालेल्या कामांवर लक्ष ठेवण्याचे व त्यांना गती देण्याचे निर्देश झोनल रेल्वेला दिले आहेत. या मंजूर कामांचा सारांशही तयार केला जाईल आणि आवश्यक तिथे नवीन मंजुरीची प्रक्रिया राबवली जाईल. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा साखळीच्या विविध टप्प्यांवर पाणी दूषित होत असल्याचे ओळखण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी, पाण्याच्या स्रोताच्या ठिकाणी तसेच नळांच्या ठिकाणी गाळणी यंत्रणा बसवण्यासह, विविध परिस्थितींसाठी योग्य अशा गाळणी आणि शुद्धीकरण प्रणाली बसवण्याचे देखील नियोजन केले जात आहे.

झोनल रेल्वे. आढळलेल्या त्रुटींचा आणि त्यावर केलेल्या दुरुस्तीच्या कारवाईचा स्टेशननिहाय तपशील सादर करेल. ही यंत्रणा त्रुटींची पद्धतशीर देखरेख सुलभ करेल आणि विशेष मोहिमेदरम्यान समोर आलेल्या समस्यांची वेळेत सोडवणूक केली जाईल याची खातरजमा करेल.

या कृती योजनेत रेल्वे वसाहती आणि कार्यस्थळांमधील पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधांसाठी अशाच प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित आहेत, ज्यामुळे केवळ प्रवाशांच्या क्षेत्रांपुरतेच मर्यादित न राहता सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यावर भर दिला जात आहे.

या समन्वित उपाययोजनांद्वारे भारतीय रेल्वे पिण्याच्या पाण्याच्या संपूर्ण पुरवठा व्यवस्थेमध्ये प्रतिबंधात्मक पाहणी, पायाभूत सुविधांची देखभाल, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, पाण्याची गुणवत्ता चाचणी आणि दुरुस्तीच्या उपाययोजनांची यंत्रणा बळकट करत आहे. प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी पिण्याच्या पाण्याची सतत उपलब्धता सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

***

नितीन फुल्लुके / शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302690) आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam