दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स गटातील देशांच्या दळणवळण मंत्र्यांच्या 12 व्या बैठकीचे 21 ऑगस्ट 2026 रोजी आयोजन


केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स समूहातील देशांच्या दळणवळण मंत्र्यांची 12 वी बैठक पार पडणार

प्रविष्टि तिथि: 20 AUG 2026 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026

भारताने आपल्या 'ब्रिक्स' समूहाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळांतर्गत 21 ऑगस्ट 2026 रोजी 'ब्रिक्स'च्या दळणवळण मंत्र्यांच्या 12 व्या बैठकीचे आयोजन केले आहे. 'ब्रिक्स' च्या सदस्य देशांचे दळणवळण मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी या बैठकीत एकत्र येऊन माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी), डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि भक्कम डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा करणार आहेत.

'ब्रिक्स' मधील दळणवळण मंत्र्यांची ही 12 वी बैठक भारत सरकारच्या केंद्रीय दळणवळण विभागाचे मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेच्या पायाभरणीद्वारे उभारणी’ या भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठीच्या मध्यवर्ती संकल्पनेअंतर्गत आणि ‘ नवोन्मेष, सहकार्य आणि परिवर्तनाद्वारे लवचिक भविष्याची पायाभरणी (आयसीटी)’ या आयसीटीच्या मुख्य  सूत्रानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्राधान्यांतून समावेशक, सुरक्षित आणि शाश्वत डिजिटल विकासाला चालना देण्यास तसेच ब्रिक्स देशांमधील तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्यास भारत वचनबद्ध असल्याचे अधोरेखित होते.

ब्रिक्स देशांच्या दळणवळण मंत्र्यांची ही 12 वी बैठक सदस्य देशांना उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता बांधणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर विचार-विनिमय करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ असेल. या बैठकीत होणाऱ्या चर्चांमध्ये व्यावहारिक सहकार्य वाढवणे आणि ब्रिक्स समूहातील देश तसेच व्यापक 'ग्लोबल साउथ' डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण हे मुद्दे प्रामुख्याने केंद्रस्थानी असतील.

ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात भारताचा लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय), नवोन्मेष आणि क्षमता बांधणी या मुद्द्यांवर केंद्रित उपक्रमांद्वारे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यावर विशेष भर आहे. प्रस्तावित 'ब्रिक्स क्षमता बांधणी केंद्रे' आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांमधील वाढीव सहकार्य यांसारख्या मुद्द्यांसह 'आयसीटी क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटा'अंतर्गत होणाऱ्या चर्चांच्या आयोजनातही दूरसंचार विभागाने पुढाकार घेतला आहे. 

ही बैठक 2025 मध्ये ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक्स सदस्य देशांच्या दळणवळण मंत्र्यांच्या 11 व्या बैठकीची फलिते आणि त्यामध्ये ठरविण्यात आलेली सहकार्याची क्षेत्रे यांवर आधारित असेल. त्या आधीच्या बैठकीत माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी), डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक डिजिटल प्रशासन या क्षेत्रांत ब्रिक्स सदस्यांमधील निरंतर सहकार्याचे महत्त्व पुनश्च अधोरेखित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, ज्योतिरादित्य शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असून त्यामध्ये 12 व्या ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चा आणि त्यातून निघालेले महत्त्वाचे निष्कर्ष याविषयीची सारांशाने  माहिती देतील.

केंद्रीय मंत्री त्यानंतर 'डिजिटल ब्रिक्स फोरम एक्स्पो'लाही भेट देतील; या प्रदर्शनात ब्रिक्स परिसंस्थेशी संबंधित डिजिटल तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना सादर केल्या जातील. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताची तांत्रिक क्षमता ठळकपणे दाखवून देण्यासोबतच सहभागी देश आणि संबंधित घटकांमधील परस्पर संवाद आणि ज्ञान-आदानप्रदान वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील 'ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची12 वी बैठक' हा आणखी एक महत्त्वाचा पल्ला असून डिजिटल क्षेत्रात अधिक दृढ भागीदारी निर्माण करण्याबाबतची भारताची कटिबद्धता यातून दिसून येते. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाच्या (आयसीटी) क्षेत्रातील अधिक सहकार्याद्वारे, ब्रिक्स गटातील देशांना अधिक लवचिक, सर्वसमावेशक, सुरक्षित आणि शाश्वत अशा डिजिटल भविष्याच्या निर्मितीत योगदान देता येऊ शकेल.

अधिक माहितीसाठी दूरसंचार विभागाची पुढील हँडल्स फॉलो करा: -

X - https://x.com/DoT_India

Insta-  https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb - https://www.facebook.com/DoTIndia

Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa

 

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2301516) आगंतुक पटल : 35
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Telugu , Gujarati , Assamese , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Kannada