आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग- 22 च्या मुझफ्फरपूर-सीतामढी-सोनबरसा या टप्प्याचे 'हायब्रिड ॲन्युइटी मोड' द्वारे चौ-पदरीपर्यंत श्रेणीसुधार करण्यासाठी 3590.73 कोटी रुपयांच्या एकूण भांडवली खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2026 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग- 22 च्या मुझफ्फरपूर-सीतामढी-सोनबरसा या टप्प्याचा चौ-पदरीपर्यंत श्रेणीसुधारणा करायला मंजुरी दिली. हा प्रकल्प हायब्रीड ऍन्युइटी मोड (एचएएम) अंतर्गत विकसित केला जाईल, याची एकूण लांबी 82.578 किमी असून एकूण भांडवली खर्च 3590.73 कोटी रुपये इतका असेल.
बिहारच्या विस्तारत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याशी जोडल्यामुळे प्रस्तावित प्रकल्प धोरणात्मक आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचा आहे. सोनबरसा येथील भारत - नेपाळ सीमेला राष्ट्रीय महामार्ग -27 (पूर्व-पश्चिम कॉरिडॉर) वरील मुझफ्फरपूर सारख्या आर्थिक केंद्रांशी जोडणारा हा एक प्रमुख दुवा ठरेल. या प्रकल्पामुळे मुझफ्फरपूर, मुकसूदपूर, रुन्नी सैदपूर, थुम्मा, डुमरा, भुतही आणि सोनबरसा या दाट लोकवस्तीच्या भागातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल.
या प्रकल्पामुळे प्रवासी आणि मालवाहतूक जलद आणि सुरक्षित होईल, प्रवासाची कार्यक्षमता सुधारेल आणि प्रादेशिक संपर्क व्यवस्था मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. जलद आणि सुरक्षित प्रवासाची खात्री देण्याच्या उद्देशाने, हा प्रकल्प ताशी 100 किमी, तर सरासरी 80 किमी प्रतितास वेगासाठी डिझाइन करण्यात आला आहे, तसेच यात रस्त्याच्या मधल्या भागात कोणतेही मार्ग किंवा उघड्या जागा ठेवण्यात आलेल्या नाहीत.
'पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन'च्या तत्त्वांवर आधारित असलेला नियोजित प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रे आणि प्रमुख रेल्वे स्थानकांसह महत्त्वाच्या आर्थिक, सामाजिक आणि लॉजिस्टिक्स केंद्रांशी कनेक्टिव्हिटी सुधारून मल्टी-मोडल एकत्रीकरणाला चालना देईल.
सुधारित दळणवळणामुळे मालवाहतूक आणि कृषी पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढेल, प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि बुद्धिस्ट सर्किट अर्थात बौद्ध परिपथ स्थळे, तसेच सीतामढी येथील ऐतिहासिक जानकी पुनौरा धाम मंदिर यांसारख्या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. राष्ट्रीय महामार्ग-22 वरील मुझफ्फरपूर-सीतामढी-सोनबरसा हा पट्टा धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून, तो राष्ट्रीय मालवाहतूक जाळ्याशी अखंड जोडणी सुनिश्चित करतो. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग-31 आणि राष्ट्रीय महामार्ग-122 सारख्या विद्यमान मार्गांना पूरक असून, यामुळे बरौनीसारख्या औद्योगिक क्षेत्रांशी आणि गंगा नदीकाठच्या लॉजिस्टिक्स केंद्रांशी असलेले दळणवळण अधिक चांगले राहील. तसेच भीठामोर येथील नजीकच्या लँड पोर्टद्वारे सीमापार प्रवासी आणि मालवाहतुकीलाही यामुळे चालना मिळते.
याखेरीज या प्रकल्पात सात मोठे पूल (बारमाही वाहणाऱ्या बागमती नदीवरील 340 मीटर लांबीच्या एका मोठ्या पुलासह), तीन रेल्वे ओव्हर-ब्रिज आणि दोन उड्डाणपूल (1170 मी. व 270 मी.) यांचा समावेश आहे. वाहतूक सुरळीत सुरू राहावी, प्रवास सुरक्षित व जलद व्हावा, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे प्रवासाचा सरासरी वेग वाढेल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. तसेच रस्ते सुरक्षा, इंधन कार्यक्षमता आणि वाहने चालवण्याचा खर्च यात सुधारणा होईल. यामुळे प्रादेशिक गतिशीलता आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
हा प्रकल्प बिहारमधील प्रमुख आर्थिक, सामाजिक आणि लॉजिस्टिक्स केंद्रांना अखंड जोडणी पुरवतो. याखेरीज, सुधारित मार्ग पाच 'पीएम गति-शक्ती' आर्थिक केंद्रे (चार औद्योगिक वसाहती आणि एक मेगा फूड पार्क), चार सामाजिक केंद्रे (बाबा गरीबनाथ मंदिर, माता जानकी मंदिर, पुनौरा धाम, मुझफ्फरपूर आणि सीतामढी आकांक्षी जिल्हे) आणि दोन लॉजिस्टिक्स केंद्रे (मुझफ्फरपूर व सीतामढी रेल्वे स्थानके) यांच्यासोबतचे दळणवळण अधिक सुलभ करेल. यामुळे या संपूर्ण क्षेत्रात माल आणि प्रवाशांची जलद वाहतूक शक्य होईल.


* * *
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301250)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam