पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
12 व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्री बैठकीत भारताचे लोककेंद्रित, अंमलबजावणीयोग्य पर्यावरणीय कृतीचे आवाहन
12 व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्री बैठकीची सांगता, संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदनाचा सर्वसंमतीने स्वीकार आणि चार ज्ञानसंग्रहांचे प्रकाशन
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2026 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षता 2026 अंतर्गत नवी दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या 12 व्या बैठकीत, आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधीमंडळ प्रमुखांचे स्वागत केले.
आपल्या बीजभाषणात यादव यांनी भारताची अध्यक्षता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित असल्याचे सांगितले. यात ग्लोबल साऊथ देशांच्या चिंतांना अग्रस्थान आणि 'सहकार्य आणि शाश्वततेसाठी नवोन्मेष आणि लवचिकता' जोपासणारी म्हणून ब्रिक्सची नवी व्याख्या, यांचा समावेश आहे. यात लोककेंद्रित दृष्टिकोन आणि 'मानवता प्रथम'हे तत्त्व आहे.
यादव यांनी, पर्यावरणीय असुरक्षितता अनेकदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांशी जोडलेली असणाऱ्या विकसनशील देशांपुढल्या हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि संकटांची जोखीम यांसारख्या वाढत्या जागतिक पर्यावरणीय आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी वणवा प्रतिबंध, पूर्वतयारी, पूर्वसूचना, प्रतिसाद आणि आगीनंतर स्थितीत सुधारणा, यासंदर्भात ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचे आवाहन केले. तसेच हवामानविषयक वित्तपुरवठा, अनुकूलन आणि स्थानिक समुदायांना सक्षम करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
यादव यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखालील चार प्राधान्यांची रूपरेषा मांडली. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन- वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती निवारण- चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन, ही ती चार प्राधान्ये आहेत. ते म्हणाले,''एकत्रितपणे ही चार प्राधान्ये ठाम अभिव्यक्ती आहे- पर्यावरणीय कृती ही लोककेंद्रित आणि शाश्वत, कार्यान्वयन किंवा कृतिभिमुख आणि विकसनशील देशांच्या वास्तवाला प्रतिसाद देणारी असायला हवी.”
पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान अभ्यासपूर्ण चर्चासत्रे आणि अनुषांगिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हवामान बदलाबाबत ब्रिक्स उच्चस्तरीय संवाद - 'लोककेंद्रित आणि समुदाय आधारित अनुकूलन': लोककेंद्रित, लवचिक आणि शाश्वत आराखड्याद्वारे आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष यांची सांगड पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक पद्धतींशी घालून हवामान अनुकूलन प्रक्रियेला चालना देणे.
इंटिग्रेटेड लँडस्केप बेस्ड ग्रीनिंग- शाश्वत विकास आणि हवामान संकटात टिकाव यासंदर्भात सदस्य देशांमध्ये अनुभवांचे आदानप्रदान : इंटिग्रेटेड लँडस्केप बेस्ड ग्रीनिंग म्हणजे वने, शेतजमिनी,पाणलोट क्षेत्र यांच्यासह संपूर्ण परिसंस्था या एकमेकांशी जोडलेल्या व्यवस्था असल्याचे लक्षात घेऊन पर्यावरणीय आरोग्य, जैवविविधता आणि सामुदायिक गरजा यांचे एकात्मिक जतन. याबाबतच्या एकमेकांच्या यशोगाथा सामायिक करणे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयाने मिशन लाईफ या भारताच्या प्रमुख उपक्रमाचे दर्शन घडवणारे एक डिजिटल आणि परस्परसंवादी दालन उभारले होते. यात इमर्सिव्ह गेमिंग आणि परस्परसंवादी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. शाश्वत जीवनशैली संवर्धित करण्यासाठी भारताचे प्रयत्न यातून मांडले गेले.
तसेच या दोन दिवसांच्या बैठकीच्या निमित्ताने आलेल्या प्रतिनिधींना भारतीय कलाकारांनी आपल्या सांस्कृतिक ठेव्याचे मंत्रमुग्ध आणि संस्मरणीय दर्शन घडवले. त्यांच्या आकर्षक सादरीकरणातून भारतीय संस्कृतीची विविधता आणि चैतन्य यांची झलक त्यांना पाहायला मिळाली.
शैलेश पाटील/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301015)
आगंतुक पटल : 8