राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपती मा.श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संदेश

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2026 7:53PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2026

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

नमस्कार !

1. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आपणा सर्वांना या राष्ट्रीय उत्सवानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देते. आता काही तासांनीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्षाचा शुभारंभ होईल. देशविदेशात राहणारे सर्वच भारतीय हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करतात. आपला तिरंगा आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आपण अगदी दिमाखात हा फडकावतो.

2. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपली भारतमाता पारतंत्र्याच्या शृंखलांमधून मुक्त झाली. सर्व देशवासीय स्वतंत्र भारताच्या नियतीचे निर्माते झाले. आपली स्वप्नं साकारण्याच्या संधींचा उपयोग आपणा भारतवासीयांना करता यावा, आणि भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र करण्याच्या भावनेनं आपण कार्य करावं - यातच स्वातंत्र्याची सार्थकता आहे. 

3. निष्ठावान विद्यार्थी आणि शिक्षक, विकासासाठी तत्पर वैज्ञानिक आणि अभियंते, आरोग्यसेवांमध्ये कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, कष्टाळू कामगार आणि अन्नदाते शेतकरी, आपल्या प्रयत्नांनी राष्ट्र-निर्माण करत आहेत. प्रतिभावन्त खेळाडू, शिल्पकार आणि कलाकार, द्रष्टे बुद्धिजीवी, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या पथकांमधले कामावर निष्ठा असणारे सदस्य, लोकहितासाठी सेवारत लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्थेशी संबंधित न्यायकर्मी, कार्यनिष्ठ नागरी सेवक, अर्थव्यवस्थेत योगदान देणारे सर्व लहान-मोठे गुंतवणूकदार, निस्वार्थ समाजसेवक आणि स्वच्छता अभियानात आघाडीचे कार्यकर्ते असणारे आपले सर्व सफाई-मित्र देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. इतर क्षेत्रांमध्ये सक्रिय असंख्य देशवासीय, तसंच संविधानात सांगितलेल्या मूलभूत कर्तव्यांचं पालन करणारे सर्व नागरिक, राष्ट्रनिर्माणातले महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. मी त्या सर्वांचं मनापासून कौतुक करते. तिन्ही सैन्यदलांच्या जवानांची, सर्व सशस्त्र पोलिसदलांची आणि पोलिसकर्मींची- त्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी मी विशेष प्रशंसा करते. जगाच्या रंगमंचावर भारताचा मानसन्मान वाढवणारे अनिवासी भारतीय, आणि दूतावासांमध्ये कार्यरत देशवासीय, या सर्वांची मी प्रशंसा करते आहे.

प्रिय देशबांधवांनो, 

4. स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत म्हणजे 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्व पुढे जात आहोत. अंत्योदयाच्या भावनेसह, विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा असा आपला संकल्प आहे. आपला संपन्न वारसा आणि स्वातंत्र्यसंग्रामाचे आदर्श- या साऱ्यांना आपलंसं करून आपण आधुनिक विकासाच्या वाटेवर पुढे जात आहोत. 'वयं राष्ट्रे जागृयाम' हे वेदवाक्य आपल्याला राष्ट्रासाठी सदैव जागरूक राहण्याची प्रेरणा देतं. 

5. आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात संघर्ष करणाऱ्या वेगवेगळ्या विचारधारांच्या लोकांचं अंतिम लक्ष्य एकच होतं- भारताचं स्वातंत्र्य. 'स्वदेशी चळवळी' दरम्यान वंदे मातरम बहुसंख्य जनांचं गीत झालं. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वात अगणित देशवासीय स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडले गेले. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी समाज सुधारणा आणि राष्ट्रनिष्ठेचे उच्च आदर्श घालून दिले. ज्यांच्या आदर्शांवर वाटचाल करत आपला देश स्वतंत्र झाला आणि पुढे गेला त्या भारतमातेच्या सर्व महान अपत्यांना मी आदरपूर्वक नमन करते.

6. आज 14 ऑगस्टचा दिवस आपण फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळतो. फाळणीशी संबंधित हिंसाचारात प्राण गमावलेल्या आणि फाळणीची पीडा सहन करावे लागलेल्या लक्षावधी देश बांधवांचं आपण स्मरण करतो. सांप्रदायिक हिंसाचारामुळे लक्षावधी लोकांना निर्वासित व्हावं लागलं आणि फाळणीची भीषण वेदना सहन करावी लागली. तरीही त्यांनी आपली ओळख सोडली नाही.

7. आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी, देशाच्या फाळणीच्या गंभीर परिणामांबरोबरच, 550  पेक्षा अधिक संस्थानांना नवस्वतंत्र भारताशी जोडून घेणं, हेही एक असामान्य आह्वान होतं. सरदार पटेल यांनी राजेशाही व्यवस्थांना पूर्णविराम देऊन आपल्या स्वतंत्र लोकशाहीमध्ये त्यांना विलीन करून घेतलं. एका कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने, आधुनिक भारताच्या एकतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पावन स्मृतीला मी आदरपूर्वक नमन करते.

प्रिय देशबांधवांनो,

8. 'भारताच्या लोकांकडून' निर्माण झालेलं आपलं संविधान नागरिकांच्या सहभागावर आधारित आहे. लोकशाहीची जननी असणाऱ्या भारतभूमीत राहणाऱ्यांमध्ये लोकसहभागाची भावना सदैव विद्यमान आहे. त्या भावनेला नव्या ऊर्जेसह आपले देशवासी पुढे नेत आहेत. राष्ट्रीय मोहिमा लोकसहभागाने पुढे नेल्या जात आहेत. ही आपल्या लोकशाहीची प्रेरक सफलता आहे. 

9. दर्जाची आणि संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा हे आपल्या संविधानाचे प्रमुख आदर्श आहेत. आज सर्वसामान्य पार्श्वभूमी असणारे लोक, अनेक क्षेत्रांमध्ये असामान्य योगदान देत आहेत. यावरून मला याची खात्रीच पटते की -- आज भारतात प्रत्येक व्यक्ती मोठी स्वप्नं पाहूही शकते आणि पूर्णही करू शकते.

10. आपल्या संविधानात कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांच्या उत्तरदायित्वांचा स्पष्ट उल्लेख आहे. कायदेमंडळात लोकांच्या आकांक्षा मांडणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. जनहिताच्या आणि राष्ट्रहिताच्या धोरणांना कार्यरूप देऊन साकार करणं हे कार्यकारी मंडळाचं कर्तव्य आहे. संसाधनांच्या अभावी कोणीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणं हे न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाला- विशेषतः वंचित वर्गाच्या लोकांना- समानतेच्या आधारे, सन्मानानं आणि वेळेवर न्याय मिळाला पाहिजे.

प्रिय देशबांधवांनो,

11. गेल्या दशकभरापेक्षा थोड्या अधिक काळात आपल्या देशानं  वेगानं सर्वसमावेशक विकास केला आहे, वारसा आणि विकास यांच्या समन्वयाला प्राधान्य दिलं आहे आणि विकासाच्या मार्गातले अनेक दशकांपासूनचे जुने अडथळे दूर केले आहेत.

12. आपले देशवासीय महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती साजरी करत आहेत. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समानतेच्या क्षेत्रात ऐतिहासिक योगदान दिलं आहे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार गेल्या काही वर्षांमध्ये वंचित वर्गांच्या प्रगतीच्या  उद्दिष्टाला राष्ट्रीय प्राधान्य दिलं गेलं आहे. स्त्री-शिक्षणाच्या क्षेत्रात यशाचे नवे मापदंड स्थापित झाले आहेत. 25 कोटींहून अधिक लोकांना दारिद्र्यातून मुक्ती देण्यात यश मिळालं आहे. वित्तीय समावेशनाची जगातली सर्वात मोठी योजना असणाऱ्या प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत जवळपास 59 कोटी खातेदार बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. त्यात 32 कोटींहून अधिक महिला खातेदार आहेत. 80 कोटी लोकांसाठीच्या निःशुल्क रेशनव्यवस्थेद्वारे त्यांच्या अन्नसुरक्षेची काळजी घेतली गेली आहे. 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'अंतर्गत 60 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत निशुल्क आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान सन्माननिधी आणि किसान क्रेडिट कार्डांच्या मार्फत शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, आणि मधुमक्षिका-पालन अशा व्यवसायांशी संबंधित बंधू-भगिनींना पाठबळ मिळालं आहे.

13. सांस्कृतिक आत्मबळावर आधारित विकास गतिमान आणि स्थायी स्वरूपाचा असतो, याला जगाचा इतिहास साक्षीदार आहे. सांस्कृतिक गौरवाच्या भावनेमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आत्मिक बळ मिळतं- या चेतनेने आज देशात जोर धरला आहे. आपल्या पूर्वजांनी ज्ञान-विज्ञान, कला-संस्कृती, अध्यात्म आणि सदाचार यांचा अनमोल वारसा आपल्याकडे सोपवला आहे. आपण वारसा आणि विकास यांच्यात समन्वय साधून प्रगती करत आहोत.

14. जगात सर्वात मोठ्या आणि सर्वात चांगल्या डिजिटल पायाभूत सुविधा आपल्या देशात विकसित केल्या गेल्या आहेत. गावोगावी छोट्याशा दुकानांमध्ये आणि फेरीवाल्यांकडेही डिजिटल पेमेंट्स होत आहेत. जगातले अर्ध्याहून अधिक रियल टाईम डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. आपले देशवासीय आणि सरकार यांनी मिळून डिजिटल क्रांतीचं आदर्श उदाहरणच जगासमोर घालून दिलं आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सरकारने जनकल्याणाच्या सुविधा पारदर्शक पद्धतीने बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. 

15. आपल्या देशात महामार्ग, जलमार्ग, रेल्वे आणि विमान वाहतूक या रूपांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. यातून नव्या उद्योगांसाठी संधी उत्पन्न होत आहेत, नवी रोजगारनिर्मिती होत आहे आणि गुंतवणूकदारांना भारताबद्दल वाटणारा विश्वास उंचावत आहे.

प्रिय देशबांधवांनो,

16. जगाच्या अनेक भागांतील युद्धजन्य परिस्थिती आणि अस्थिरता यांचा परिणाम प्रत्येक देशावर होत आहे. अशा बिकट परिस्थितीतही आपली अर्थव्यवस्था, सर्वाधिक वेगाने वाढणारी जगातली प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पुढे जात आहे. आर्थिक अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर, जगाच्या सरासरी वृद्धिदराच्या दुपटीपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. 'आत्मनिर्भर भारत अभियानाने' आपल्या आर्थिक प्रगतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया अधिक बळकट केला आहे.

17. आधुनिक विकासाच्या मार्गावर पुढे जाताना भारत पर्यावरण संरक्षणाबाबत जागतिक पातळीवर नेतृत्वाची भूमिकाही निभावत आहे. आपल्या देशाने एसडीजी म्हणजे 'शाश्वत विकास उद्दिष्टे- 2030' पैकी काही उद्दिष्टांची पूर्तता वेळेपूर्वीच केली आहे. गेल्या काही वर्षांत पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा-विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे.

18. राष्ट्रहित हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे. शांती, सहयोग, संवाद आणि 'वसुधैव कुटुंबकम्' हे आदर्श मूल्य- हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे आधारस्तंभ आहेत. आर्थिक सहयोग वाढवण्यासाठी आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण अनेक देशांशी एफटीए म्हणजे मुक्त व्यापार करार केले आहेत. ग्लोबल साउथ म्हणजे विकसनशील देशांमध्ये आपण अग्रणी भूमिका बजावत आहोत. जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे. संयुक्त राष्ट्रांसह सर्व बहुपक्षीय संघटनांमध्ये जागतिक समुदायाचं उचित प्रतिनिधित्व असावं, असा आपला प्रयत्न आहे. आपल्या या प्रयत्नांना अनेक देशांकडून खंबीर समर्थन मिळत आहे. 

प्रिय देशबांधवांनो,

19. नैसर्गिक साधनसंपत्तीवर आपल्याइतकाच भावी पिढ्यांचाही अधिकार आहे. पुढच्या पिढ्यांना हा अधिकार वापरताना आपल्या कोणत्याही कृतीमुळे जराही तुटवडा भासणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण आणखी समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्ती त्यांच्या हाती सोपवावी असा आपला प्रयत्न असला पाहिजे. पर्यावरण संरक्षणाविषयी वाटणारी श्रद्धा हा आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. संथाली भाषेतल्या एका साध्या गीतातून आपल्याला गहिरा संदेश मिळतो. पंडित रघुनाथ मुर्मु यांनी रचलेल्या त्या गीताचे काही शब्द असे आहेत--

दारे गुजूग कान ञेल ते

मिरु चेणेय राग बयहा दाया हाया गे।

गुजूग कान आबोवा जाति धरम दारे

चेदाग बाबोन राग बयहा आबो अना ञेल ते।

या गीतात-- एक झाड पूर्णपणे शुष्क झाल्यामुळे रडणाऱ्या एका पोपटाचं वर्णन करताना कवी म्हणतो - अरे माझ्या बांधवांनो! मरणाऱ्या झाडाकडे पाहून पोपट दुःखमय आवाजात विलाप करतो आहे. हे बंधूंनो, मानव-संस्कृतीरूपी वृक्षाचा विनाश होताना पाहून आपण मानवी समाजाच्या लोकांना दुःख का बरं वाटत नाही?' मानवी मूल्यं आणि निसर्गाच्या संरक्षणाप्रति सर्व माणसांनी दक्ष राहिलं पाहिजे, असा संदेश या गीतातून मिळतो. एखादं हिरवगार झाड हे, मानवी समाज नीतिमत्तापूर्ण आणि स्वस्थ असल्याचं प्रतीक आहे. 'एक पेड माॅं के नाम' आणि 'Lifestyle for Environment म्हणजे LiFE' या अभियानांमागच्या भावनेला अनुरूप पद्धतीने सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. 

प्रिय देशबांधवांनो,

20. शिक्षणक्षेत्रात आपल्या लेकीबाळी प्रभावी कामगिरी करत आहेत, हे पाहून मला अतिशय प्रसन्न वाटतं. त्याबरोबरच कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या ड्रोन दीदीपासून वायुदलात फायटर कॉंबॅट लीडर होऊन लढाऊ विमानांचं नेतृत्व करण्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढत आहे. नुकत्याच ग्लास्गोमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या एकूण 13 सुवर्णपदकांपैकी 8 सुवर्णपदकं मुलींनी जिंकली आहेत. स्त्रियांची आर्थिक आत्मनिर्भरता उंचावत आहे. बचत गटांच्या सदस्य स्त्रियांची संख्या 10 कोटींहून अधिक आहे. 3 कोटी स्त्रियांना 'लखपती दीदी' करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. ते लक्ष्य साध्य झालं आहे. आता आपला देश आणखी 3 कोटी स्त्रियांना 'लखपती दीदी' म्हणून घडवण्याकडे वाटचाल करतो आहे. 'मुद्रा योजनेअंतर्गत' सहाय्य मिळणाऱ्या उद्योजकांमध्ये जवळपास दोन तृतीयांश लाभार्थी स्त्रिया आहेत.

21. स्त्रियांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेबरोबरच त्या विभिन्न क्षेत्रांमध्ये नेतृत्वाची धुरा वाहतील, याकडेही आपण लक्ष देत आहोत. मतदानातली स्त्रियांची वाढती टक्केवारी, हे आपल्या प्रजासत्ताकाचं विशेष यश आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये स्त्रियांचं 33% प्रतिनिधित्व आरक्षित करण्यासाठी 2023 साली ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ संमत करण्यात आला आहे. या कायद्याचं लक्ष्य गाठल्यावर स्त्रियांच्या नेतृत्वात वाढ होईल आणि आपली लोकशाही आणखी सर्वसमावेशक होईल. 

22. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 65 टक्के व्यक्तींचं वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. ही युवा लोकसंख्या आपली सर्वात मौल्यवान संपदा आहे. आपल्या देशातल्या तरुण-तरुणी प्रतिभावान आहेत, वचनबद्ध आहेत आणि कुशल आहेत. अगदी जमिनीवर प्रत्यक्ष क्षेत्रात विविध समस्यांना तरुणाईने शोधलेली अभिनव आणि व्यवहार्य उत्तरं पाहता, समाज आणि देशाप्रति त्यांच्या समर्पणाचीच मला खूण पटते. सरासरी वय जेमतेम 28 वर्षं असणाऱ्या तरुण पथकाने नुकतंच अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण करून अंतराळ संशोधनाच्या नवीन पर्वाचा शुभारंभ केला आहे. 

23. आपले अनेक तरुण स्वयंरोजगाराची वाट चोखाळून रोजगार-निर्मितीची संस्कृती अंगीकारत आहेत. युवा उद्यमींच्या भागीदारीने आपल्या देशात एक नवीन स्टार्टअप परिसंस्था विकसित झाली आहे. भारतातल्या तरुणांच्या प्रतिभा आणि समर्पणाने जगातले मोठमोठे उद्योग प्रभावित झाले आहेत आणि त्यांना नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये नियुक्त करत आहेत. अशा तरुणांनी जागतिक समुदायासमोर भारताच्या युवाशक्तीची मान उंचावली आहे. भारताच्या झळाळत्या सुवर्णमयी भविष्याविषयी मला वाटणारा विश्वास आपल्या युवा पिढीमुळे अधिक दृढ होतो.

24. आपले विद्यार्थी भारताच्या भविष्याचे निर्माते आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी जशी सरकार आणि समाज यांची एकजूट महत्त्वाची आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या वर्तमान आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. सार्वजनिक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांसाठी संधींची दारं उघडतात. म्हणूनच या परीक्षांमध्ये सुधारणांसाठी सरकार व्यापक पावलं उचलत आहे. या परीक्षा प्रक्रियेतल्या अनुचित साधनांवर पूर्णपणे अंकुश लागावा, परीक्षा-प्रणाली आणखी पारदर्शक आणि तरुणांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावी असा या सुधारणांचा उद्देश आहे. 

25. सरकारच्या प्रयत्नांनी आणि नवीन आर्थिक घडामोडींमुळे तरुणांसाठी अनेक प्रकारच्या नव्या संधी उत्पन्न होत आहेत. अशा संधींबद्दल माहिती जाणून घेऊन आपले युवक-युवती यशाच्या नव्या वाटांची निवड करू शकतात. 

26. आपल्या तरुणांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा देशाच्या भविष्याचा आधार आहे. आपल्या युवावर्गाला उत्साहानं आणि जोमानं प्रगतिशील वाटचाल करता यावी, हे कुटुंबाचं आणि समाजाचंही दायित्व आहे. 

27. युवाविकास आणि राष्ट्रनिर्माणाचं माध्यम म्हणून खेळांचा अंगीकार केला जातो आहे. खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत देशाच्या सर्व भागांत क्रीडा-परिसंस्था उपलब्ध करून दिली जात आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपले खेळाडू कामगिरीच्या आणि यशाच्या नव्या उत्तुंग शिखरांना गवसणी घालत आहेत. 

28. आपल्या देशात एकीकडे तरुण लोकसंख्या आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्याही सतत वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. 70 वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतची निःशुल्क आरोग्यसेवा मिळू शकते. ज्येष्ठ नागरिकांप्रति आपुलकी राखण्यासाठी आणि त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी पूर्ण समाजाने संवेदनशील राहिलं पाहिजे.

प्रिय देशबांधवांनो,

29. सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभं राहून मानवताविरोधी शक्तींवर विजय मिळवण्याच्या भारतीय परंपरेचा आपल्याला अभिमान आहे. 26 जुलैला आपण कारगिल विजय दिवस साजरा केला. त्याआधी 7 मे ला ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण आपल्या सैन्यदलांच्या अतुलनीय पराक्रमाचं कृतज्ञ स्मरण केलं. दहशतवादाविरुद्धची ती ऐतिहासिक मोहीम म्हणजे भारतीय सैन्यदलांच्या अचूक आणि भेदक क्षमतांचा पुरावा आहे. दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे कुठेही लपून बसले तरी त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा निश्चितपणे मिळेल असा कठोर संदेश त्यांना दिला गेला. दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या देशाबरोबर भूतकाळात केलेल्या सिंधू जल कराराला दिलेली स्थगिती म्हणजे, आपल्या देशाच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठीचं निर्णायक पाऊल आहे. 

30. अनेक दशकांपासून नक्षलवाद हे देशासमोरचं मोठं आह्वान ठरलं होतं. भारताला नक्षलमुक्त करणं हे एक मोठं यश आहे. पूर्वीच्या नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे, आणि विकासाचा सर्वस्पर्शी ओघ वाहू लागला आहे. बस्तर ऑलिंपिक्समध्ये खेळाडू आणि बस्तर पंडुमचे कलाकार आणि या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

31. राष्ट्राभिमानाची जपणूक करण्यासाठी बांधलेल्या मराठा लष्करी परंपरेशी संबंधित बारा गडकिल्ल्यांचा गेल्यावर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा सूचीत समावेश करण्यात आला. आणि यावर्षी भगवान बुद्धाच्या सारनाथ या पहिल्या प्रवचन स्थळाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा सूचीत करण्यात आला. भारतभूमीमध्ये एकीकडे भगवान बुद्धांशी संबंधित आध्यात्मिक स्मारकं आहेत, तर दुसरीकडे आत्मसन्मान आणि आपल्या गौरवशाली परंपरांच्या रक्षणासाठी युद्ध करण्याच्या आपल्या प्रभावशाली क्षमतांची प्रतीकंही अस्तित्वात आहेत. 

प्रिय देशबांधवांनो,

32. सर्व भारतवासीयांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीचं खरं ध्येय आहे. तेलगू भाषेत वाङ्मयनिर्मिती करणारे राष्ट्रीय विचारांचे महान साहित्यिक गुरजाडा अप्पाराव यांनी आपल्या एका गीतातून सर्व भारतवासीयांना देशप्रेमाचा अनमोल संदेश दिला आहे. ते म्हणतात---

देसमुनु प्रेमिंचुमन्ना, मंचि अन्नदि पेंचुमन्ना।

देसमंटे, मट्टि कादोय, देसमंटे, मनुषुलोय।

या ओळींचा भावार्थ असा की--- 

देशावर प्रेम करा, चांगुलपणा वाढवा, 

केवळ माती आणि जमीन म्हणजे देश नव्हे, तर समस्त जनसमुदाय म्हणजे देश आहे.

33. समाजाची भागीदारी आणि सरकारच्या प्रयत्नांनी गावागावांत, नगरा-नगरांत देशाच्या घरोघरी राहणारे सर्व लोक स्वस्थ, सुखी आणि समृद्ध होतील याची मला खात्री आहे. 

34. चला, देशप्रेमाच्या या सर्वसमावेशक भावनेसह आपण सर्वांनी, स्वतंत्र भारताला विकसित भारत म्हणून घडवण्याच्या राष्ट्रीय साधनेत स्वतःला समर्पित करूया. 

धन्यवाद!

जय हिंद!

जय भारत!

***

Jaydevi Pujari Swami/DD News Mumbai/Parshuram Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299593) आगंतुक पटल : 35
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Telugu , Malayalam , Assamese , Bengali , Odia , English , Khasi , Urdu , हिन्दी , Nepali , Punjabi , Gujarati , Kannada