पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडाविषयक सहकार्याचा पथदर्शी आराखडा

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2026 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2026

 

क्रीडा क्षेत्र हे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामर्थ्यशाली दुवा असून ते समुदायांना एकत्र आणून सहयोगासाठी नवीन मार्ग खुले करत आहे.

क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावरील वर्ष 2023 मधील सामंजस्य करारावर आधारित भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा सहकार्य आराखडा हा आपल्यातील द्विपक्षीय संबंधांचे पैलू अधिक सक्षम करण्यासाठी एक व्यावहारिक, भविष्यवेधी प्राधान्यक्रम आणि संधी प्रदान करत आहे. अहमदाबाद येथे आयोजित 2030 मधील राष्ट्रकुल स्पर्धा आणि ब्रिस्बेन 2032 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा यांच्यासह भविष्यात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आणि अशा इतर संधी घेऊन येणाऱ्या या दशकाचा विचार करता हा आराखडा सामायिक प्राधान्यक्रम, क्षमता आणि संसाधन यांच्याशी सुसंगत सहकार्याची लक्ष्यित क्षेत्रे निश्चित करतो.

ऑस्ट्रेलिया आणि भारतातील क्रीडा प्रशासनाच्या रचनेतील तसेच क्रीडा परिसंस्थांच्या विकासातील वैविध्याचा आदर राखून आणि उच्चस्तरीय तसेच सामुदायिक क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी क्रीडा संघटना, उद्योग-व्यवसाय, राज्यस्तरीय सरकारे, विद्यापीठे आणि समुदाय गट यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेची दखल घेऊन, आम्ही संबंधित संस्थांमधील परस्पर संवाद सुलभ करण्यास आणि सहकार्यात्मक कार्यपद्धतींना पाठबळ देण्यास वचनबद्ध आहोत, यामुळे सर्व स्तरांवर अधिक मजबूत क्रीडा भागीदारी निर्माण होईल आणि त्याचा लाभ भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांना मिळेल.

या आराखड्याची अंमलबजावणी व्यावहारिक आणि परिणाम केंद्रित असेल तसेच उपलब्ध संसाधने आणि प्रमुख क्रीडा स्पर्धांच्या वेळापत्रकानुसार सर्व उपक्रमांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल.

यासाठीचे सहकार्य प्रस्थापित भागीदारीच्या माध्यमातून केले जाईल तसेच लवचिक, मागणीवर आधारित सुविधा प्रदान केल्या जातील आणि संसाधनांशी निगडित जबाबदारी प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रमानुसार ठरवली जाईल. या दृष्टिकोनामुळे व्यावहारिक, शाश्वत आणि परस्परांना लाभदायक परिणाम सुनिश्चित होतात.

या संदर्भात, या रोडमॅप अंतर्गत सहकार्यासाठी खालील बाबींना केंद्रबिंदू म्हणून ओळखण्यात आले आहे:

A. क्षमता बांधणी:

  • भारतातील प्राधान्यक्रमाच्या क्रीडा प्रकारांसाठी उच्च कार्यक्षमता क्रीडा केंद्र उभारणे आणि त्यांचे संचालन करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी सहकार्य.
  • पॅरा क्रीडा प्रकारांना सहकार्याचे एक महत्त्वाचे प्राधान्य क्षेत्र आणि संधी म्हणून ओळखून, पॅरा वर्गीकरण, प्रशिक्षण आणि कामगिरी सहाय्य या क्षेत्रांतील ऑस्ट्रेलियाच्या कौशल्याचा लाभ घेण्यास, तसेच आवश्यकतेनुसार भारत आणि ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये परस्पर सहकार्याचे दुवे प्रस्थापित करण्यास आम्ही प्रोत्साहन देऊ.
  • ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षक विकास मॉडेलचा आधार घेऊन, योग्य असेल तिथे 'प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण' या दृष्टिकोनाचा वापर करून, भारतीय प्रशिक्षक आणि प्रशिक्षण शिक्षकांना ऑस्ट्रेलियामध्ये आणि ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि प्रशिक्षण शिक्षकांना भारतामध्ये आणणाऱ्या द्विपक्षीय देवाणघेवाणीला चालना देणे.
  • परस्पर अध्ययनासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यान्चायत शारीरिक शिक्षण कार्यक्रमाची देवाणघेवाण करुन त्यातील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे तसेच शालेय स्तरावरील क्रीडा, क्रीडा विज्ञान आणि शारीरिक शिक्षणात समुदाय सहभाग यासांरख्या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करणे.
  • योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी होणारे वर्ल्ड योगासन च्या सहकार्याने भारतातील योगासन क्रीडा महासंघ ऑस्ट्रेलियामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या, सहकार्य वाढवण्याच्या आणि योगातील सहभागास प्रोत्साहन देण्याच्या संधी शोधत आहे.
  • भारत-ऑस्ट्रेलिया उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून निवडक भारतीय प्रशिक्षकांची क्षमता वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रीडा आयोगासोबत काम करणे
  • भारत सरकारद्वारे निधी-पुरस्कृत विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील उच्च कामगिरी कार्यक्रमांचा भाग म्हणून, प्रतिभावान तरुण भारतीय खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी क्रीडा संघटना आणि विद्यापीठांसारख्या संबंधित बिगर-सरकारी हितधारकांच्या माध्यमातून संधींचा शोध घेणे.

B. सहयोगी क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन

  • खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण, दुखापत प्रतिबंध, क्रीडा पोषण, परिधान करण्यायोग्य कार्यप्रदर्शन तंत्रज्ञान, पुनर्प्राप्ती तंत्र आणि पॅरा क्रीडा यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमधील संयुक्त संशोधन आणि विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देणे.
  • क्रीडा अभ्यासक्रम संयुक्तपणे विकसित करण्यासाठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठांमधील भागीदारीला प्रोत्साहन देणे.
  • स्पोर्ट इंटिग्रिटी ऑस्ट्रेलिया आणि नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी इंडिया, वाडा (WADA) आशिया/ओशनिया कार्यालयाशी संलग्न राहून आणि युनेस्कोच्या 'इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अगेन्स्ट डोपिंग इन स्पोर्ट' (कन्व्हेन्शन) गटांमध्ये प्रतिनिधित्व करून, वाडाच्या नेतृत्वाखालील क्षमता-विकास कार्यक्रमांना पाठिंबा देऊन आंतरराष्ट्रीय डोपिंग (उत्तेजक सेवन)-विरोधी प्रयत्नांमध्ये योगदान देतात.

C. प्रमुख क्रीडा स्पर्धा:

  • मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी ऑस्ट्रेलियन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय क्रीडा संघटनांशी सहयोग.
  • परस्पर हिताच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये प्रदर्शनीय सामने आणि युवा स्पर्धा आयोजित करण्याच्या संधींचा शोध. (उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये कबड्डी आणि खो-खो, आणि भारतात ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग आणि बास्केटबॉल).
  • ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि राष्ट्रकुल खेळांसारख्या प्रमुख क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा लाभ घेऊन, स्पर्धांदरम्यान आणि त्यांच्या तयारीच्या काळात भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रीडा संस्थांमध्ये सामायिक सुविधा, स्पर्धा आणि सहाय्यक नेटवर्कसाठी औपचारिक, परस्पर व्यवस्था स्थापित करणे.
  • डिसेंबर 2026 मध्ये भारतात चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या बिग बॅश लीग सामन्याचे स्वागत करत, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांना भारतात वार्षिक बीबीएल सामने आयोजित करण्याच्या वचनबद्धतेच्या दिशेने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

D. क्रीडा उद्योग आणि गुंतवणूक मंच:

  • क्रीडा साहित्य उत्पादन, क्रीडा माध्यमे आणि प्रसारण, इव्हेंट मॅनेजमेंट आणि क्रीडा स्टार्टअप्स या यासंदर्भात भारतीय आणि ऑस्ट्रेलियन कंपन्यांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी, डिसेंबर 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अर्थसहाय्यासह मुंबईत आयोजित क्रीडा उद्योग शिखर परिषदेचा आराखडा तयार करणे.
  • माहिती सत्रांच्या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांच्या क्रीडा क्षेत्रातील व्यवसायांना परस्परांच्या क्रीडा बाजारपेठेत सुविधा पुरवणे.
  • भारतातून उच्च दर्जाच्या, स्पर्धात्मक किंमतीच्या क्रीडा साहित्याची ऑस्ट्रेलियात होत असलेली निर्यात वाढवणे.
  • प्रशिक्षण, प्रशिक्षक विकास, सामर्थ्य आणि कंडिशनिंग, खेळाडूंचे आरोग्य, पोषण आणि मानसशास्त्र यासारख्या खेळातील कामगिरी उंचावणाऱ्या कौशल्याची ऑस्ट्रेलियमधील निर्यात वाढवणे.

E. क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सहभागाने भागीदारी:

  • खेळ, हा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, नेतृत्व, आरोग्य आणि सामाजिक समावेशनासाठीचा प्रभावी मार्ग आहे, हे ओळखून, ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स कमिशनच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांचा लाभ घेत, महिला खेळाडूंसाठी द्विपक्षीय स्पर्धांसह, महिलांचे नेतृत्व, आरोग्य, उच्च कामगिरी आणि खेळातील सहभागाला प्रोत्साहन देणारे संयुक्त उपक्रम सुरू करणे.

 

* * *

नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283288) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam