माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एनएफडीसी–एनएफएआयच्या जतन उपक्रमामुळे ‘किरीदम’ चित्रपट ‘4K’ आवृत्तीमध्ये पुन्हा मोठ्या पडद्यावर
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2026 7:00PM by PIB Mumbai
मुंबई, 9 जुलै 2026
मल्याळम चित्रपटसृष्टीतील गाजलेला ‘किरीदम’ हा अभिजात चित्रपट 10 जुलै 2026 रोजी भारतात, तसेच परदेशात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘4K’ पुनर्संचयित आवृत्तीत आणि डॉल्बी अॅटमॉस ध्वनीसहित हा चित्रपट सादर करण्यात येत आहे. या चित्रपटाचे पुनर्संचयन राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार यांनी केले आहे. हा पुनर्संचयित चित्रपट एनएफडीसीतर्फे सेव्हन आर्ट्स इंटरनॅशनल लि. यांच्या सहकार्याने सादर केला जात असून हायझिन ग्लोबल व्हेंचर्स तर्फे वितरित करण्यात येत आहे.

या पुनर्संचयित आवृत्तीमुळे चित्रपट वारशाच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित होते. 1989 मधील या चित्रपटाची मूळ कॅमेरा निगेटिव्ह प्रत कालांतराने खराब झाली होती आणि वापरण्यायोग्य राहिली नव्हती. मात्र, एनएफएआयने 35 मिमीची रिलीज प्रत 30 वर्षांहून अधिक काळ जतन करून ठेवली होती. हीच प्रत ‘4K’ पुनर्संचयनासाठी आधारभूत ठरली.
हा चित्रपट सिबी मलयिल यांनी दिग्दर्शित केला असून ए.के. लोहितादास यांनी त्याचे लेखन केले आहे. चित्रपटात मोहनलाल यांनी सेतुमाधवनची भूमिका साकारली असून तिलकन यांनी हेड कॉन्स्टेबल अच्युतन नायर यांची भूमिका केली आहे. हा चित्रपट मल्याळम चित्रपटसृष्टीतल्या उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानला जातो.
पुनर्संचयन प्रक्रियेत उच्च-रिझोल्यूशन स्कॅनिंग, डिजिटल इमेज रिस्टोरेशन आणि रंगसुधारणा यांचा समावेश होता. ही प्रक्रिया छायाचित्रकार एस. कुमार आणि दिग्दर्शक सिबी मलयिल यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली. याशिवाय, चित्रपटाला डॉल्बी अॅटमॉस ध्वनीसह पुन्हा सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या थिएटर आवृत्तीची अंतिम तांत्रिक प्रक्रिया प्रसाद कॉर्पोरेशन यांनी हाय स्टुडिओझ च्या सहकार्याने पूर्ण केली असून बोनी असानार यांनी सर्जनात्मक प्रमुख म्हणून काम केले.
अनेक दशकांपासून जतन केलेल्या रिलीज प्रतीमुळे हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांसमोर आणणे शक्य झाले, असे एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. या पुनर्संचयनातून एनएफडीसी–एनएफएआयचा भारतीय चित्रपट वारसा जतन करण्याचा दृढ संकल्प दिसून येतो.

राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेअंतर्गत प्रत जतन करून चित्रपटाचे पुनर्संचयन केल्याबद्दल दिग्दर्शक सिबी मलयिल यांनी एनएफडीसी–एनएफएआयचे आभार मानले. जुन्या चाहत्यांसोबतच नव्या प्रेक्षकांनाही ही आवृत्ती मोठ्या पडद्यावर पहायला आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पुनर्संचयित चित्रपटाचा जागतिक प्रीमियर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 55व्या आवृत्तीत झाला होता. या वेळी प्रेक्षक आणि चित्रपटकर्त्यांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एनएफडीसी–एनएफएआय भारत सरकारच्या समृद्ध दृक-श्राव्य वारशाच्या जतन, पुनर्संचयन आणि प्रसाराचे उद्दिष्ट पुढे नेत आहे. वैज्ञानिक पद्धतीने जतन, डिजिटायझेशन आणि पुनर्संचयनाद्वारे या संस्था उद्याच्या पिढ्यांसाठी अमूल्य चित्रपटसंपदा उपलब्ध करून देत आहेत, तसेच कालातीत कलाकृतींना नव्या प्रेक्षकांपर्यंत पुन्हा पोहोचवण्याचे काम केले जात आहे.
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2283003)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Kannada
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam