गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरपू यांनी प्रमुख विमानतळांवरील प्रवासी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि इमिग्रेशन प्रणालीचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2026 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरपू यांनी प्रमुख विमानतळांवरील प्रवासी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि इमिग्रेशन प्रणालीचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि गृह मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमित शाह यांनी मनुष्यबळावरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने देशभरातील सर्व विमानतळांवर टप्प्याटप्प्याने स्वयंचलित एक्स-रे ट्रे रिटर्न प्रणाली बसवण्याचे निर्देश दिले. नव्याने निर्माण झालेल्या विमानतळांवर स्वयंचलित एक्स-रे ट्रे रिटर्न प्रणाली बसवताना योग्य मानके निश्चित केली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी विमानतळांवरील प्रवेश मार्ग, चेक-इन काउंटर, सुरक्षा तपासणी मार्ग आणि इमिग्रेशन काउंटर यांच्यातील परस्परावलंबित्व लक्षात घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. या आराखड्यामुळे प्रवाशांचा प्रवाह कोणत्याही टप्प्यावर किंवा संपर्कबिंदूवर विस्कळीत होणार नाही, याची खात्री करण्यावर त्यांनी भर दिला. विमानतळांवरील प्रत्येक संपर्कबिंदूसाठी प्रवाशांची अखंड आणि सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने समन्वित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
नागरी हवाई उड्डाण सुरक्षा संस्थेद्वारे (BCAS) विहित सुरक्षा मानकांनुसार, सध्या विकासाच्या प्रक्रियेत असलेल्या 21 विमानतळांच्या आणि उर्वरित 41 विमानतळांच्या विकासाला प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर प्राधान्य देण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी या बैठकीत दिले. व्यावसायिक क्षेत्रे विहित नियमांच्या अधीन राहतील याची सुनिश्चिती करत, प्रवाशांच्या सोयी आणि सुलभतेचा विस्तार करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच, सर्व 62 विमानतळांची कामे पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देशही अमित शाह यांनी यावेळी दिले.
नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने प्रवाशांची संख्या आणि विमान उड्डाणांच्या संख्येच्या आधारावर सर्व विमानतळांवरील एरोब्रिजच्या संख्येसाठीचे नियम निश्चित करावेत असे निर्देशही अमित शाह यांनी यावेळी दिले. सध्या 16 प्रमुख विमानतळांवर उपलब्ध असलेली सामान जमा करण्याची (बॅगेज ड्रॉप) सुविधा, प्रवाशांची जास्त संख्या असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय विमानतळांवरही सुरू केली जावी, असे निर्देश त्यांनी दिले. एक्स रे स्क्रीनिंगसाठी नियुक्त केलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांसाठी नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाऊ नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यासोबतच आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या अधिकारी आणि जवानांनाच एक्स रे स्क्रीनिंगच्या कर्तव्यावर नियुक्त केले जावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
2027 पर्यंत सर्व राज्यांच्या मुख्यालयांमध्ये परदेशी नागरिकांसाठीची प्रादेशिक नोंदणी कार्यालये (FRRO) कार्यान्वित केली जावीत अशी सूचनाही केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केली. आगरतळा आणि जेवर विमानतळांवरील अधिकृत आगमन आणि निर्गमन तपासणी केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर्स प्रोग्रामला (FTI-TTP) अर्थात विश्वासार्ह श्रेणीतील प्रवाशांच्या आगमन निर्गमनाची प्रक्रिया जलतगतीने पूर्ण करण्याच्या कार्यक्रम अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी विमान कंपन्यांसोबतच्या समन्वयाने एक यंत्रणा स्थापित करावी अशी सूचनाही त्यांनी केली. अशा यंत्रणेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तिकीटाचे आरक्षण करताना प्रवाशांना व्हॉट्सॲप संदेश पाठवावेत आणि त्यांना फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर्स प्रोग्रामसाठी नोंदणी करण्याची विनंती करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे त्यांनी सुचवले.
नागरी हवाई उड्डाण मंत्रालय आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रवासाच्या दृष्टीने जास्त मागणी असलेल्या हंगामात प्रमुख विमानतळांवरील सर्व तपासणी केंद्रांवर प्रवाशांना लागणाऱ्या विलंबाच्या कालावधीचे मूल्यमापन करून हा कालावधी कमी करण्यासाठी, स्वतंत्रपणे त्रयस्थ संस्थेमार्फत अभ्यास प्रक्रिया राबवावी अशी सूचनाही अमित शाह यांनी यावेळी केली.
* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282521)
आगंतुक पटल : 13