सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार मंत्रालयाच्या पाचव्या स्थापना दिन सोहळ्याला केले संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाने गेल्या पाच वर्षांत सहकार क्षेत्राशी संबंधित 30 कोटी लोकांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण केली आहे

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2026 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2026

आपल्या पाच वर्षांच्या प्रवासात, मंत्रालयाने सहकार क्षेत्राला भेडसावणारी मुख्य आव्हाने शोधून काढली आहेत, त्याच्या विकासासाठी आणि समस्या निवारणासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे, आणि सहकार परिसंस्थेला आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित व स्पर्धात्मक बनवून तिचा संपूर्ण कायापालट केला आहे.

कृषी, दुग्धव्यवसाय, बँकिंग, लॉजिस्टिक्स आणि ने-आण करण्याची व्यवस्था यांसारख्या क्षेत्रांना जोडण्यासाठी देशभरात नवीन सहकारी संस्थांचे एक जाळे स्थापन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे 32 कोटींपेक्षा जास्त सहकारी सदस्यांचा एक डिजिटल डेटाबेस देखील तयार करण्यात आला आहे

सहकारी मॉडेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि बियाणे उत्पादनात भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे सहकार मंत्रालयाच्या पाचव्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले.

या प्रसंगी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारमध्ये एक स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. पंतप्रधानांच्या या निर्णयाने देशातील सहकार चळवळीला एका नवीन उंचीवर नेले, जी त्यापूर्वी 75 वर्षे दुर्लक्षित राहिली होती आणि तिला दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली होती, असे ते म्हणाले. सहकार मंत्रालयाची स्थापना करून मोदीजींनी सहकार क्षेत्रात नवीन प्राण फुंकले, असेही त्यांनी सांगितले.

या पाच वर्षांत आम्ही समस्या शोधून काढल्या आहेत, शक्यतांना चालना दिली आहे आणि राज्यांना भविष्यभिमुख धोरणे देखील उपलब्ध करून दिली आहेत, यावर अमित शाह यांनी भर दिला.

गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक महत्त्वाचे टप्पेच गाठले नाहीत, तर आमची सहकार व्यवस्था आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी देखील काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.

आमच्या सरकारने बहु-राज्यीय सहकारी सोसायटी कायदा 2002 मध्ये महत्वाच्या 50 सुधारणा केल्या, ज्यामुळे संपूर्ण सहकारी व्यवस्था अधिक पारदर्शक आणि लोकतांत्रिक होऊ शकली, असेही ते म्हणाले.

त्यानंतर पुढची पायरी म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था बळकट करण्याचे काम केल्याचेही शाह यांनी सांगितले. सहकार क्षेत्रात पतपुरवठ्याचा ओघ वाढावा, यासाठी, तीन महत्वाची कामे हाती घेतल्याचे सहकार मंत्री म्हणाले.

तसेच सहकार क्षेत्राला बाजारपेठेशी अधिक भक्कमपणे जोडण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

आज देशात सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे अमित शाह यावेळी म्हणाले. सरकारला देशातील 140 कोटी नागरिकांच्या तसेच, जगभरातल्या लोकांच्या आरोग्याचीही चिंता असल्याचे सांगत, म्हणूनच भारतातील शेतकरी आपली सेंद्रिय उत्पादने वाढवत असल्याची माहिती शाह यांनी दिली.  

आम्हाला शेतकऱ्याला ‘अन्नदाता पासून ऊर्जादाता’ बनवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे मिशन पुढे न्यायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

ऊसाच्या उच्च मूल्याशी संबंधित करावर आम्ही सवलत दिली असून, जुने करविषयक विवादही सोडवले आहेत, असेही अमित शाह म्हणाले. केवळ ऊसाच्या क्षेत्रात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचा 46, 000 कोटी रुपयांचा प्राप्तिकर माफ केला आहे, असेही ते पुढे म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमित शाह यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. श्यामा प्रसाद मुखर्जी नसते तर आज काश्मीर भारताचा भाग नसता, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

यावेळी सहकार मंत्र्यांच्या हस्ते अनेक महत्वाच्या प्रकल्पाचे राष्ट्रार्पण, पायाभरणी तसेच अनेक उपक्रमांचा शुभारंभ झाला. यात 135 अन्नधान्य कोठारांचे हस्तांतरण, 85 गोदामांचे लोकार्पण आणि 47 गोदामांची पायाभरणी झाली. त्याशिवाय, अमूल आणि एनसीसीएफच्या सहकार वनाचे भूमिपूजन, महाराष्ट्रात जळगाव आणि उत्तर प्रदेशात बाराबंकी येथे बीबीएसएसएल टिशू कल्चर सुविधेचे भूमिपूजन, एनसीडी- 3.0 ची सुरुवात आणि जीओ-टॅग मोबाईल अॅप, एनडीडीबी म्हणजेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या दूध पुरवठा आढावा डॅशबोर्ड पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कोऑपरेटिव्ह इनपुट्स अँड सर्व्हिसेस डिलिव्हरी मल्टी-स्टेट लिमिटेड अंतर्गत दुभत्या जनावरांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. याशिवाय बहुराज्यीय दुग्ध उत्पादक सहकारी संघटना मर्यादित, आणि गोमय बहु राज्यीय सहकारी संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या दोन महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचेही अनावरण करण्यात आले. यामध्ये सहकार सीबीएस ही केंद्रीकृत कोअर बँकिंग प्रणाली आणि सहकार सहयोगी हा नागरी सहकारी बँकांसाठी विकसित करण्यात आलेला संवादात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मंच यांचा समावेश आहे.

याशिवाय, 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्था यांचे ई-पॅक्स (e-PACS) मध्ये यशस्वी रूपांतर झाल्याचा महत्त्वपूर्ण टप्पाही या कार्यक्रमात साजरा करण्यात आला. तळागाळातील सहकारी संस्थांच्या डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.


माधुरी पांगे/शैलेश पाटील/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2281824) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Kannada