MIFF banner

एक प्रदेश, अनेक आवाज : 19 व्या मिफ्फमध्ये ईशान्य भारतातील चित्रपटांसाठी विशेष विभाग


खासी टेकड्यांपासून, ते मणिपूरच्या तरंगत्या गवताळ प्रदेशांपर्यंत, मिफ्फ 2026 मध्ये भारताच्या ईशान्येकडील प्रदेशांची समृद्ध परंपरा, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारशाचे मनोहारी दर्शन घडणार

मुंबई, 17 जून 2026

 

मुंबईत 15 ते 21 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ 2026), सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या ईशान्येकडील राज्यांमधील लघुपट आणि माहितीपटांसाठी समर्पित एक विशेष विभाग समाविष्ट करण्यात आला आहे. हे चित्रपट भारताच्या ईशान्येकडील समृद्ध परंपरा, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा प्रदर्शित करतात. असामान्य व्यक्तींचे जीवनपट, चिरस्थायी परंपरा, विविध समुदाय, आणि बदलते परिप्रेक्ष्य, यांच्या चित्रणातून, हे चित्रपट भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून देतात. खासी, नागामीज, आओ, कोकबोरोक, भूतिया, आसामी, मणिपुरी आणि मिझो यांसारख्या स्थानिक भाषांमधील या चित्रपटांमधून महोत्सवाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांना या प्रदेशाचा वारसा, ओळख, लवचिकता आणि या प्रदेशातील दैनंदिन जीवनाची लय साकारणारा निसर्ग, याचा मनोहारी संगम पाहायला मिळतो.      

का पातेंग (खासी)

संकिरंग एल. खोंगविर यांनी दिग्दर्शित केलेला आणि 'नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'साठी पोनविशाल चिदंबरनाथन यांनी निर्मिती केलेला 'का पातेंग' (KA PATENG) हा भारताचा 30 मिनिटांचा खासी-भाषेतील लघुपट आहे (2023).

हा चित्रपट एका कुटुंबातील आईच्या मृत्युनंतर अनेक वर्षांपासून दुरावलेली तिची तीन मुलं पुन्हा एकत्र येतात, त्यानंतरचं कथानक उलगडतो. सर्वात मोठा भाऊ शहरात दीर्घ काळ वास्तव्य करून, घरी परतला आहे, मधला भाऊ, बालपणीच्या वेदनादायक आठवणींचं ओझं घेऊन जगतोय,  आणि सर्वात धाकट्या बहिणीने एक गुपित लपवलं आहे, त्यामुळे तिच्या मनात लवकरच आई बनण्याबद्दल काही शंका आहेत.  

लेंटिना आओ – अ लाईट ऑन द ईस्टर्न होरायझन  (इंग्रजी, नागामीज, आओ)

संजिब परासर आणि नीलाक्षी मेधी यांनी दिग्दर्शित केलेला आणि 'नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'ची निर्मिती असलेला 2023 सालचा हा माहितीपट, इंग्रजी, नागामीज आणि 'आओ' (Ao) या भाषांमध्ये सादर करण्यात आला आहे. नागा लोकांच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या लेंटीना आओ या सामाजिक कार्यकर्त्या स्त्रीचा असामान्य जीवनप्रवास आणि वारसा या चित्रपटात पाहायला मिळतो. 1955 मध्ये दुर्गम नागा हिल्समध्ये सुईण म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या लेंटिना आओ यांनी आपल्या समाजाच्या सेवेसाठी अनेक दशके समर्पित केली, या काळात त्यांना अनेकदा सामाजिक अन्याय, खोलवर रुजलेले पूर्वग्रह आणि वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागला.

माय लास्ट फेस: फ्लॅट-नोज (माय लास्ट फेस: कुंगबारा) (कॉकबोरॉक, कौब्रू)

सुजित देववर्मा आणि प्रणव ज्योती देका यांच्या द्वारे दिग्दर्शित आणि प्रणव ज्योती देका, दिलीप देववर्मा आणि सुजित देववर्मा यांच्याद्वारे निर्मित 2024 मधील हा माहितीपट कॉकबोरॉक आणि कौब्रू या भाषांमध्ये निर्माण करण्यात आला आहे. त्रिपुरामधील हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट रेयांग समुदायाची पारंपरिक वेशभूषा आणि दागिने यांच्या माध्यमातून या समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा शोध घेतो. केवळ सजावटीचे साहित्य न राहता ही वस्त्रे आणि दागिने विविध कहाण्या, श्रद्धा तसेच पूर्वजांकडून मिळालेले ज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे चालवत नेणारी, सौंदर्य, अध्यात्मिकता, ओळख आणि संरक्षण यांची चिरंतन प्रतीके म्हणून कार्य करतात. या जीवन परंपरांचे दस्तावेजीकरण करून हा चित्रपट, या समुदायाच्या सांस्कृतिक पद्धतीविषयीचे बारकावे सांगतो तसेच सामुहिक स्मृती आणि ओळख जपण्यात या पद्धतींची महत्त्वाची भूमिका समजावून देतो.

शांग्रीला – द हिडन पॅरॅडाईज [सिक्कीमीज (भुतिया)]

सामतेन भुतिया यांनी दिग्दर्शित केलेला आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने निर्मिलेला हा 2025 मधील माहितीपट म्हणजे सिक्कीमीज (भुतिया) भाषेतील एक 90 मिनिटांचा चित्रपट आहे.हिमालयातील सिक्कीम राज्यात, कांचनजुंगा पर्वताच्या छायेत घडणारा हा चित्रपट या प्रदेशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळखीची निसर्गदृश्ये आणि पर्यटन यांच्या पलीकडे पोहोचून या क्षेत्राचा कमी ज्ञात इतिहास, संस्कृती आणि भूगोलाचा शोध घेतो. या राज्याचा वारसा आणि अस्मिता यांच्या गहन परीक्षणाद्वारे हा माहितीपट जिचा समृध्द वारसा अजूनही मोठ्या प्रमाणात उघड झालेला नाही अशा भूमीचे चित्रण करतो.

टीन्स ऑफ 1942 (बियाल्लीसर लराली) (आसामी)

वर्ष 2023 मध्ये तयार झालेला “टीन्स ऑफ 1942” हा माहितीपट समीरण देका यांनी दिग्दर्शित केला असून त्याची निर्मिती समीरण देका आणि भास्कर ज्योती दास यांनी केली आहे. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षांना मानवंदना म्हणून तयार केलेला हा चित्रपट भोलानाथ नगरिया आणि राधा बोरा या स्वातंत्र्यसैनिकांच्या असामान्य देशभक्तीचा सन्मान करतो. त्यांच्या विखुरलेल्या आठवणींची संवेदनशील पुनर्रचना करण्यातून हा माहितीपट या धाडसी पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या योद्ध्यांच्या कथांचे जतन करून आणि त्यांचे धैर्य, समर्पण आणि देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाप्रती कटिबद्धतेद्वारे आगामी पिढ्यांना प्रेरित करून या नायकांचा गौरव करतो.

द हीलिंग प्रिस्ट (पुइथियाम) (मिझो)

नेपोलियन आरझेड थांगा दिग्दर्शित, 2026 मधील हा मिझो भाषेतील 9 मिनिटांचा लघुपट, परंपरा, श्रद्धा आणि समकालीन चिंता यांचा वेध घेतो. 'दाइबावल' या प्राचीन मिझो उपचार विधीवर हा चित्रपट आधारित आहे. या विधीत पुइथियाम (उपचार करणारा पुजारी) आजारपणास कारणीभूत मानल्या जाणाऱ्या दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी विशिष्ट विधी करून 'लेंगलेप' टांगत असे. हा चित्रपट भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारा आहे. आपल्या आजारी वडिलांना बरे करण्याचा मार्ग शोधणाऱ्या एका निराश तरुणाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पारंपरिक उपचार पद्धती आणि निरामय आरोग्यासंबंधी आधुनिक इच्छा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात उलगडण्यात आला आहे. या कथानकाच्या माध्यमातून, हा चित्रपट मिझो सांस्कृतिक वारसा तसेच आजारपण आणि उपचारांभोवती आजही टिकून असलेल्या चिरस्थायी श्रद्धांची एक झलक सादर करतो.

मणिपूर ब्राऊ ॲंटेलर्ड डिअर (संगाई) (मणिपुरी आणि इंग्रजी)

आकांक्षा सूद सिंग दिग्दर्शित, रोशनी नाडर मल्होत्रा आणि ऋषिकेश आत्माराम चव्हाण निर्मित हा 2025 मधील 30 मिनिटांचा द्विभाषिक माहितीपट मणिपुरी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये बनवलेला आहे. हा चित्रपट मणिपूर राज्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या संगाई या हरणाच्या लुप्तप्राय उपप्रजातीची कथा सांगतो. वांशिक आणि राजकीय तणावांनी ग्रासलेल्या प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर चित्रित हा माहितीपट, राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण तरंगत्या गवताळ प्रदेशातून मुक्त संचार करणाऱ्या या सुंदर प्राण्याचे चित्रण  करतो आणि त्याच्या अस्तित्वासाठीच्या दीर्घ संघर्षावर प्रकाश टाकतो. संगाईच्या कथेच्या माध्यमातून हा चित्रपट वन्यजीव, अधिवासाचे संवर्धन आणि त्या प्रदेशातील सामाजिक-राजकीय वास्तव यांच्यातील नाजूक संबंधांवर प्रकाश टाकतो.

Click here to access the press releases and high-quality photos of daily events at MIFF.

19व्या मिफ विषयी

19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.

  • या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या. 
  • महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते. 
  • जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
  • चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.

प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा  माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026!  कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राजश्री आगाशे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2274117   |   Visitor Counter: 24